चिता पेटली वा सरण हे कळेना
विधीचे अनादी वळण हे कळेना
उगा व्यर्थ आकांत जीवा कशाला
कुठे आदि अंतिम ..मरण हे कळेना
किती भरडल्या वंचना काळजाच्या
कसे थांबवावे दळण हे कळेना
रित्या होत जाती पखाली मनाच्या
चितेचे मनाच्या जळण हे कळेना
नभी दुमदुमे नाद जयघोष अवघ्या
कुठे रंगले मग भजन हे कळेना
कधी लांघते आज रेषेस सीता
कसे होत जाते हरण हे कळेना
अशी लोकशाही चमत्कार दावी
कधी बदलले मज चलन हे कळेना
२.
तुला बोलायचे नाही मला ऐकायचे आहे
तुझ्या त्या मौन शब्दांशी मला भांडायचे आहे
नको गाळूस तू मजकूर डोळ्यातून एकांती
मनाच्या चोर कप्प्याला मला वाचायचे आहे
तुला बिलगून येताना बहरतो श्वास झुळुकेचा
तुझ्या स्पर्शात धुंदीने पुन्हा उधळायचे आहे
कळी तू मोग-याची गं अशी सुकुमार गंधाची
जपूनी कोवळ्या गंधा तुला लहरायचे आहे
नको जावूस कोमेजून ग्रिष्माच्या झळांनी तू
पुन्हा उमलून अंगांगी तुला बहरायचे आहे
तहानेने किती व्याकूळ फिरती जीव वनवासी
नदी हो तू .. तृषार्तांना तुला जगवायचे आहे
३.
वळवू नकोस मजला वळणार ना जराही
अन तोल या मनाचा ढळणार ना जराही
सुकताच मी मनाने निर्माल्य होय सारे
घेसी कितीक यत्नें फळणार ना जराही
रुसले जरी अशी मी मज रोष ना तुझ्यावर
प्रेमास प्राप्त करण्या छळणार ना जराही
रे जीवना पुन्हा तू चाळू नकोस मजला
मी पीठ वेदनांचे दळणार ना जराही
जाईन एक दिन मी त्यागून बंधनांना
क्षण कोणता असे तो कळणार ना जराही
येतात लुटवण्या दौलत मंदिरात सारे
श्रध्दे शिवाय भक्ती फळणार ना जराही
डोळ्यात साठवुन मी घेते धुके जरासे
ओलावले जरी ते कळणार ना जराही
..............................................
विद्या देशमुख
No comments:
Post a Comment