विनोद गहाणे : पाच गझला


१.
वंदणारे  हातही  मागे  वळाया लागले
मंदिरातुन देवही आता पळाया लागले

पावसाशी  फारसे  माझे  कधी ना भावले
का पिकांना मेघ हे आता छळाया लागले

भेटण्याला येत नाही ओळखीचे दुःखही
आठवांचे पानही हिरवे,गळाया लागले

जंगलाला आग बहुधा माणसांनी लावली
वाघ ही गावाकडे  आता वळाया  लागले

गोड  बोलूनी गळा माझा खुबीने कापला
माणसांचे गुपितही आता कळाया लागले

२.
ऐनवेळी श्रावणातच,आटतो हा पावसाळा
पंख माझ्या या पिकांचे,छाटतो हा पावसाळा

पान हिरवे रान हिरवे शेत हिरवे बहरले की
ओलसर संसार न्यारा,थाटतो हा पावसाळा

दूर आकाशात हसते,वीज ती वेड्यापरी अन्
रोमरोमी माझिया मग,दाटतो हा पावसाळा

कारणे सांगून वेड्या,येत नाही भेटण्याला
प्रेमवेड्या प्रेमिकेसम,वाटतो हा पावसाळा

लाज लज्जा सोडुनी जर वागला वेड्याप्रमाणे
माय बापाच्या मुखी मग बाटतो हा पावसाळा

.............................................
विनोद गहाणे

1 comment:

  1. खूपच सुंदर गझल विनोदराव

    ReplyDelete