अकराव्या वर्षीचा
'गझलकार' सीमोल्लंघन २०१९ चा प्रस्तुत अंक जगभरातील मराठी गझलच्या रसिक वाचकांपुढे सादर करताना आनंद होणे स्वाभाविक आहे.
घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले की
नेहमीच समाधान लाभते.
अर्थात अंकात सहभागी गझलकार,
अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे अभ्यासक,
संगीतकार-गायक ह्यांच्या लेखन सहकार्याशिवाय अंक साकार होणे अशक्य होते ,याची नम्र जाणीव संपादकांना आहे.
म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक
संपत आले असताना
मराठी गझलला आलेल्या समकालीन आत्मभानाच्या काही नोंदी
गंभीरपणे मराठी गझल लिहिणाऱ्या-वाचणाऱ्यांच्या चर्चेसाठी उपलब्ध करून देणारा हा अंक आहे.
उर्दू गझलसंस्कृतीत रूढ असलेल्या
'इस्लाह' ह्या संकल्पनेचे सोदाहरण विश्लेषण करणारा प्रसिद्ध गझलकार स्व.धनश्याम धेंडे ह्यांचा लेख ज्येष्ठांसह नवोदितांना संदर्भासाठी कायम कामी पडत रहावा असा आहे.
मराठी गझलला स्वर काफिया आता नवीन राहिलेला नाही. परंतु स्वर काफियाला रदीफची साथ नसल्यास
वजा होणाऱ्या पद्यात्मक लालित्याची जाणीव करून देणारा हेमंत पुणेकरांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे.
दीर्घ गझल लेखनासाठी उपयोगी असणारा स्वर काफिया रदीफसह आल्यावर एका प्रदीर्घ गझलचे सृजन होते.त्याचे एक स्वतंत्र,दर्जेदार पुस्तक मुनव्वर रानांच्या नावावर जमा होते.
त्या 'मुहाजिरनामा' ह्या पुस्तकाचा परिचय श्यामनाथ पारसकरांनी
मराठी वाचकांना ह्या अंकात करून दिला आहे.
दीर्घ गझलसाठी स्वर काफिया गरजेचा असतो असेही नाही. अंकातली हेमलता पाटील ह्यांची ५१ शेरांची मराठी गझल
स्वराक्षर काफियाची आहे.
गझलगायनातील सौंदर्यस्थळांचा वेध घेणारे गझलगंधर्व सुधाकर कदम आणि डाॅ.संगीता म्हसकर यांचे लेख
आवर्जून वाचावेत असे आहेत.
गझललेखनातली अनेक नवीन नावे
ह्या अंकात आहेत. सुरेश भटांनी दिलेली 'बाराखडी'आता त्यांच्यासाठी पुरेशी नाही. मराठी गझलविचार अधिक प्रगल्भ करणारा श्रीकृष्ण राऊत यांचा 'बाराखडी नंतर..' हा लेख.ह्या लेखातील मुद्दे मराठी गझललेखनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरावेत.
कला कोणतीही असो तिची मूळं
जशी परंपरेत घट्ट रोवलेली असतात
तसेच तिच्या विविध शाखा नवतेच्या आकाशाकडे सतत झेपावत असतात.
परंपरा आणि नवता
म्हणजेच मूळं आणि शाखा
ह्यांची फारकत करू बघणारी कला
फार काळ जिवंत राहू शकणार नाही.
ह्याचे भान मराठी गझललेखन कलेला आले तर ते खऱ्या अर्थाने समकालीन म्हणण्याजोगे व्हावे.
२०११ ते २०२० हे दशक संपताना
जुने सुटत चालले आहे आणि जे नवीन हाती लागल्यासारखे वाटते त्याचे समाधान कोरडे आहे.अशा संधिकालातून जात असलेली मराठी गझल तावूनसुलाखून निघेल. ताजी टवटवीत होऊन ती नवनवे उन्मेष
आपल्या अंगाखांद्यावर मिरवेल.
फक्त त्याकरिता आपल्याला एकच केलं पाहिजे; तथाकथित फालतू कलात्मक आग्रह बाजूला सारून, तिच्या भविष्याची व्यर्थ चिंता न करता, सजगपणे उघड्या डोळ्यांनी जरा वाट पहायला हवी.
हॅपी फ्रेंडशिप डे चे रंगीत बॅन्डस्
आपल्या मनगटावर बांधताना
मित्र-मैत्रिणींच्या दोषांकडे थोडी डोळेझाक केली तर निखळ हसरा स्नेह कसा आकर्षित करतो असा जीवाभावाचा मैत्रभाव प्रकट करणारे
आपले छायाचित्र मुखपृष्ठाकरिता दिल्याबद्दल हिन्दी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम पटकथा लेखिका मनिषा कोरडे यांचे सौजन्य आभारातीत आहे.
'गझलकार सीमोल्लंघन'च्या अंकाला
जगभरातल्या वाचकांनी आजवर भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्या सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दिवाळीच्या
अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
■
○संपादक○
सुरेशकुमार वैराळकर
श्रीकृष्ण राऊत
अमोल शिरसाट
No comments:
Post a Comment