संजय विटेकर : चार गझला

Image may contain: 1 person, close-up
१.
तुझ्यासारखी तूच बेजार बाई
म्हणे यौवनाचा तुला भार बाई

तुझे दुःख काही कुणाला कळेना
तुझा नेमका सांग आजार बाई

अशी का पहातेस डोळ्यात माझ्या
कितीदा मुकी हाक देणार बाई

तुझा ताल नखरेल सांगून जातो
घराणे तुझे उंच असणार बाई

अशी आडपडद्यात राहून येथे
तुझे बंद केलेस तू दार बाई

तुझ्या खोल नजरेत पाहून वाटे
तुझे दोन डोळेच लाचार बाई

२.
ऐकले तर ऐकले, सांगून पाहू
ऐकले नाहीच तर, भांडून पाहू

ताल सुंदर वाटतो बघ जिंदगीचा
श्वास चालीवर तिच्या घेऊन पाहू

चेहरा होता कुठे त्या मैफलीला..?
वाटले थोडे तिथे थांबून पाहू

पुस्तकाला वाचल्यानंतर,  जरासे
माणसाला माणसे जोडून पाहू

खेळ माझा जिंकलो नाही कधी मी
डाव आता चल तुझा खेळून पाहू

वाट मरणाची पहाण्याऐवजी, या
जिंदगीला एकदा जाळून पाहू

३.
अशी आतल्या आत राहू नको
नवे मुखवटे रोज लावू नको

नजर फार बोलून जाते तुझी
तसे शब्द ओठात आणू नको

जरा ठेव ओठात साखर तुझ्या
खरे काय पोटात सांगू नको

म्हणे गाव प्रेमात आहे तुझ्या
अता फार कोणास चघळू नको

तुला सांगतो प्रेम असते कसे
मला फक्त वेडयात काढू नको

४.
दिसावी कशी ओल डोळयात माझ्या
कुणी जात नाहीच खोलात माझ्या

तसा मीच बरसून जाणार आहे
ऋतू फक्त यावेत गावात माझ्या

कितीदा तरी हारली आवडीने
असावी तिला ओढ खेळात माझ्या

तशी धार नजरेत आलीच आहे
अता ठेवतो तीच भात्यात माझ्या

सुखाच्या घरी दुःख नांदत नसावे
व्यथेचेच दे दान पदरात माझ्या

कितीदा तरी ठार केले मला मी
तरी काळ येणार दारात माझ्या‍
.............................................
संजय विटेकर

2 comments: