शिवकुमार डोईजोडे : पाच गझला


१.
पुढ्यात माझ्या काय वाढले माहित नाही
तुझ्यापुढे का हात जोडले माहित नाही

शुन्यामध्ये नजर लावुनी बसला आहे
मनात नक्की काय चालले माहित नाही

मी मातीच्या गर्भामध्ये स्वप्न पेरले
तिने कुशीतुन काय रुजवले माहित नाही

घट्टच होती पकड मनावर कायम माझी
मुठीतून ते कसे निसटले माहित नाही

भरभरून मी बोलत गेलो पत्रामधुनी
तिने काय अन् किती वाचले माहित नाही

नकळत माझा हात तिच्या हातास लागला
तिला नेमके काय वाटले माहित नाही

आठवणींच्या मधमाशांचे पोळे उठले
नाव तिचे का कुणी छेडले माहित नाही

प्रेमालाही लागत असते का ओहोटी ?
कधी किनारे दूर सरकले माहित नाही

२.
आठवणींचे टिपुर चांदणे जगणे म्हणजे
ओल्या जखमांचे पाझरणे जगणे म्हणजे

रोज रोजची देत रहावी सत्वपरिक्षा
पण टोकाचा संयम असणे जगणे म्हणजे

ईच्छा मेल्या नंतर उरते राख मनाची
कणाकणाने होते मरणे जगणे म्हणजे

नवीन वाटा शोधत असता इतके कळले
तशीच वळणे तेच हरवणे जगणे  म्हणजे

प्रवासात या कधीच नसतो कुठला थांबा
अज्ञाताच्या मागे पळणे जगणे म्हणजे

हिशोब नाही कधीच जमला आयुष्याचा
चुकल्या नंतरचे चुकचुकणे जगणे म्हणजे

जगताना जगतोच तसेही आपण सारे
मरणानंतरही दरवळणे जगणे म्हणजे

३.
तू ओठांनी ओठांवरचा टिपला पाउस
किती वेगळा होता तेव्हा दिसला पाउस

आभाळत गेल्या डोळ्यांच्या कडा अवेळी
त्यानंतर या ओळींमध्ये सुचला पाउस

तडजोडींनी वाळवंट केले हृदयाचे
कुठला श्रावण त्याच्या भाळी कुठला पाउस

गोड मिठीचा दिसे पुरावा शर्टावरती
आठवणीने तुझ्या आजही भिजला पाउस

किती गुलाबी कोडी अन् रेशमी शहारे
खोल मनाच्या आत तुझा मी जपला पाउस

मला निरर्थक वाटत गेली रिमझिम त्याची
तू नसताना जेव्हा जेव्हा पडला पाउस

पाउस म्हणजे आभाळाचे दुःख कोवळे
अजूनही तितकासा नाही कळला पाउस

दिसती आता मसनवट्यागत डोंगर राने
कत्तल केली झाडांची घाबरला पाउस

गुरे वासरे घरे नि शेते वाहुन गेली             
भेदरलेल्या डोळ्यातुन कोसळला पाउस

कसा दाखवू चिल्यापिल्यांना पाउस म्हणजे
आता केवळ कवितेमध्ये उरला पाउस

४.
छळू लागतो एक शहारा नंतर नंतर
मखमालीचा रुतेल काटा नंतर नंतर

जमवत बसतो एकेकाने हौसेपोटी
नको वाटतो असा पसारा नंतर नंतर

गोपनीय जे वाटत होते आधी आधी
त्याचाही झाला बोभाटा नंतर नंतर

ज्याच्यासाठी भटकत असते नाव मनाची
दूर लोटतो तिला किनारा नंतर नंतर

ज्या खांद्यावर विसावल्याने बरे वाटले
हरवत गेला असा सहारा नंतर नंतर

मानमरातब होता जेथे एकेकाळी
हसू लागला तोच चव्हाटा नंतर नंतर

अनवट वाटे वरती गेलो चालत आपण
मनात हळव्या झाल्या वाटा नंतर नंतर

५.
रंगवाव्या तेवढ्या खुलतात भिंती
खूप आता वेगळ्या दिसतात भिंती

गिरवलेली अक्षरे चित्रे फुलांची
बालपण हृदयामध्ये जपतात भिंती

रंगलेल्या, भंगलेल्या खूप कणखर
त्या तशा दिसतात पण नसतात भिंती

ऊन वारा पावसांने खंगलेल्या
आजही काळासवे लढतात भिंती

वेगळी झाली घराची दोन दारे
वाटणीने आतवर हलतात भिंती

भेटण्या जातो घरी गावात मी
ओळखीच्या आजही हसतात भिंती

पाखरे जाती उडुन दाही दिशांना
सोबतीला तेवढ्या उरतात भिंती
.............................................
शिव डोईजोडे, उदगीर.

No comments:

Post a Comment