Showing posts with label आत्तम गेंदे. Show all posts
Showing posts with label आत्तम गेंदे. Show all posts

आत्तम गेंदे : तीन गझला


१.
दिसते म्हणे जगाला त्या विठ्ठलात आई...
का मग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात आई...?

आई तुझ्या मुलाला कोळून पाज शिवबा
त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रुपात आई...

पाहत असेल बहुधा आई मला नभातुन...
डोई पदर ढगांचा धरते उन्हात आई

उसना उजेड ते घर नसते कधीच मागत...
असते स्वतःच तेवत जोवर घरात आई....

काळानुसार गेल्या बदलत पिढ्या मुलांच्या
होती तशीच आहे सगळ्या युगात आई..

आता सुखात त्याची नांदत असेल पत्नी...
सोडून काल गेला वृद्धाश्रमात आई....

पिल्लू  तुझे तुला का विसरून जात आहे...?
झाली कुठून भेसळ निक्क्या दुधात आई...?

वेळीच काढ कचरा...टाळू नको खड्यांना...
धान्यासमान पाखड मुलगा सुपात आई..

२.
जात, धर्म, वंशाचा जेव्हा जागर झाला
साधा भोळा माणुस सुद्धा कट्टर झाला

तुमच्या आधी प्रयोग हा माझ्यावर झाला
औषध म्हणून चक्क विषाचा वापर झाला

माझे मरणे आधी केवळ अशक्य होते
माझा म्रुत्यू निश्चित जन्मानंतर झाला

फार खुबीने आधी खोटे बोलत होता
सत्यवान तो एका प्याल्यानंतर झाला

माझ्यापूर्वी फार उंच तो वाटत होता
किती ठेंगणा तो मी आल्यानंतर झाला

कुणी मारले नसते तर तो मेला असता
अजरामर तो त्याच्या हत्येनंतर झाला

३.
पाळ तू फक्त ते एक साधे वचन
जे दिले ते वचन.., पाळण्याचे वचन

बोलण्याचे अम्ही पाळले ना नियम...
पाळले..  ओठ ना खोलण्याचे वचन

घेतले ना कधी मद्य हातात मी
ती नजर पाळते पाजण्याचे वचन

हात हातावरी ठेवणे टाळतो...
द्यायचे ना पुन्हा भेटण्याचे वचन..

जे दिले ना कधी, ते तिने पाळले
सर्व वचने जुनी मोडण्याचे वचन..

मी स्वतःला सदा सांगतो की विसर...
आठवावे किती विसरण्याचे वचन 

.............................................
आत्तम गेंदे,
परभणी