Showing posts with label रत्नाकर जोशी. Show all posts
Showing posts with label रत्नाकर जोशी. Show all posts

रत्नाकर जोशी : तीन गझला


१.
सांगणे माझे तुला आहे निरंतर
तूच माझा प्राण तुजविण मी कलेवर

बोलली नाहीस का मनमोकळी तू
सांग कुठले घेतले दडपण मनावर

कोणत्या विश्वात रमलो काय सांगू
भूतकाळातील फोटो पाहिल्यावर

मल्मली तारुण्य सरले जख्ख झालो
लाभला जो देह तो आहेच नश्वर

दर्शनाला मी तुझ्या दिंडीत आलो
विठ्ठला येऊन जा तू पायरीवर

२.
लाभला जर गुरू सारथ्यासारखा
ठेव विश्वास तू अर्जुनासारखा

निर्मिकाचे नियम पाळती श्वापदे
माणसा वाग तू माणसासारखा

ज्ञान सूर्यासवे तळपला या जगी
पुत्र एकच हवा त्या भिमासारखा

हात हाती धरू एक होऊ पुन्हा
वेळ दवडू नको वेंधळ्यासारखा

धर्म पंथातुनी मुक्त हो माणसा
हेतु निर्मळ असो आरशासारखा

३.
आयुष्याची किंमत राजा मरणानंतर कळते.
लाख सोयरे; प्रेत एकटे सरणावरती जळते

कुणी थांबले दारापाशी कुणी स्मशानी येते
कायमची ती सल आईच्या अश्रूमधुनी ढळते.

मरण दिसावे डोळ्यांपुढती हात अचानक जुळती
मी मी म्हणता मिजास सरली आज बोबडी वळते

परवड झाली आयुष्याची पैसा पैसा करता
संचीताचा हिशोब होतो कर्मच येथे फळते.

स्तुती चालली मरणाराची जगणाऱ्याची निंदा
किती चांगले वागा दुनिया जगणाराला छळते

नातीगोती सर्व पसारा एकाएकी जमतो
नजर ठेवुनी संपत्तीवर दळण गुणांचे दळते

अपवादाने भलेपणा ही दुनिया जपते आहे
हात सोडुनी संकटकाळी सुखात मागे पळते
...........................................
रत्नाकर जोशी, जिंतूर