Showing posts with label कीर्ती संजय इंगोले. Show all posts
Showing posts with label कीर्ती संजय इंगोले. Show all posts

कीर्ती संजय इंगोले : दोन गझला


१.
जीवनावरचा पहारा वाढतो
त्यात मृत्युचा दरारा वाढतो

धावतांना धाप लागे खूप पण
थांबल्यावर कोंडमारा वाढतो

झाकले मागे ढगाच्या तोंड तू
पावसा...ये, शेतसारा वाढतो

स्पर्शूनी जाता मनाला सय तुझी
आठवांचा मग पसारा वाढतो

लाखमोलाचा जरी ऐवज तुझा
वेळ गेल्यावर घसारा वाढतो

तू नको स्वप्नात येऊ सारखा
गोठत्या थंडीत पारा वाढतो

२.
सौदामिनी नभीची साकार होत आहे
हर एक श्वास माझा एल्गार होत आहे

सटवीस मीच देते लिहिण्या नवीन उर्जा
वाढीव त्रास माझा अधिकार होत आहे

लांघून उंबऱ्याला ती अंतराळ फिरली
मुलगी तरी जगाला का भार होत आहे

भाऊ हवा कशाला संरक्षणास माझ्या
माझाच मी स्वतःला आधार होत आहे

स्पर्शू नका तिला रे होईल राख तुमची
आता अशी विजेची ती तार होत आहे

घाई तुला कशाची आहे यमा अघोरी
रे थांब ना जरासा मी स्वार होत आहे

............................................. 
कीर्ती संजय इंगोले,
समृद्धी अपार्टमेंट,
हडपसर पुणे - 411028
9422006871ingolekirti@gmail.com