Showing posts with label ममता सिंधुताई सपकाळ. Show all posts
Showing posts with label ममता सिंधुताई सपकाळ. Show all posts

ममता सिंधुताई सपकाळ : पाच गझला

१.
घुसमटीला आत ठेवूया
यापुढे लक्षात ठेवूया.!

जीव हा आपापला आहे
एकमेकांच्यात ठेवूया.!

देव झाला जर उजेडाचा
वात अंधारात ठेवूया.!

ना कळू देताच दुनियेवर
लक्ष आरामात ठेवूया.!

यापुढे प्रत्येक धमकीला
आपल्या धाकात ठेवूया.!

हा विषय दोघातला आहे
हा विषय दोघात ठेवूया.!

२.
आयुष्याची घरघर लिहिते
आता फक्त उन्हावर लिहिते.!

खोल मुळाशी घाव तरीही
मी लिहिताना वरवर लिहिते.!

अद्वैताचा अर्थ उमगतो
जाणवणारे अंतर लिहिते.!

शब्द शब्द दरवळतो माझा
तुझे नाव मी अत्तर लिहिते.!

त्या डोळ्यांच्या प्रश्नावरती
ती ओठांनी उत्तर लिहिते.!

असेच कायम वाच मला तू
नेहमीच मी सुंदर लिहिते.!

३.
असे मानवी इच्छा माझी
तरी पाशवी इच्छा माझी.!

हेतू थोडा क्रूर वाटतो
जरी लाघवी इच्छा माझी.!

कुळास बट्टा लावणार ही
जरा यादवी इच्छा माझी.!

दुःख पुरे सरते ना सरते
पुन्हा मागवी इच्छा माझी.!

संपवले तू साती वेळा
तरी आठवी इच्छा माझी.!

तिचा गोडवा काय म्हणावा
जशी काकवी इच्छा माझी.!

मैफिलीतला राग रंग तू
एक भैरवी इच्छा माझी.!

तुलाच ती परवडते म्हणजे
किती वाजवी इच्छा माझी.!

भणंग होवुन गाते आहे
तुझी थोरवी.. इच्छा माझी.!

४.
दिली आहेस आयुष्या जरी वणवण घरी दारी
तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी.!

गुलामी मीच पत्करली पुन्हा माझ्याच सवयीची
तुझ्या दारापुढे नेते मला माझीच लाचारी.!

तुझ्या पायात मी माझा कशाला मोडता घालू
नको आता नको तू ही फिरुन येऊस माघारी.!

व्यथा ना वेदना कुठल्या कशा येतील वाट्याला
तुझ्या नावावरी केलीत मी माझी सुखे सारी.!

नको लावून पाहू तू कधी अंदाज प्रेमाचा
कुणी हलक्यामध्ये जातो कुणाचे पारडे भारी.!

मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागता कळले
किती आकाशगंगा या इथे आहेत शेजारी.!

५.
कुठून कानावर येतो आवाज परत..
कोण मला बोलवते आहे आज परत.!

म्हणालास की विसरशील तू रोज मला
चुकला ना रे काल तुझा अंदाज परत.!

जे सरले त्यावरती कसला खेद करू
जे उरले त्यावरती केला माज परत.!


सुखात नाही जगू द्यायची तुला मला
दुनिया होते आहे कावेबाज परत.!

होता होता टळली आहे भेट पुन्हा
एक बिचारे मन झाले नाराज परत.!
.............................................

ममता सिंधुताई सपकाळ