प्रशांत पोरे : पाच गझला





१.
वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटत गेलो आपण
वेगवेगळ्या रंगांनी मग बाटत गेलो आपण

दर्ग्यामध्ये, मंदिरातही किती खेळलो तेव्हा
आता मग का अपुले रस्ते छाटत गेलो आपण?

धूर्त जगाने उगी लावली तुझी नि माझी स्पर्धा
उगी एकमेकांच्या दोऱ्या काटत गेलो आपण

दुःख, वेदना उरात ठेऊन जगायला ही शिकलो
घुसमट झाली आणिक नंतर फाटत गेलो आपण

धर्माच्या नावे बरबटला समाज तेंव्हा, आता
युगे युगे का अशी दुकाने थाटत गेलो आपण?

आणि अचानक पुन्हा भेटलो, पुन्हा हरवलो दोघे
कसे आपसुक डोळ्यांमध्ये दाटत गेलो आपण?

२.
गुलाबी, नशीली, जणू बाटली ती
तिला प्यायलो की मला प्यायली ती?

तिला भेटल्यावर पुढे काय झाले?
मुके जाहलो; पैंजणे बोलली ती

नको ना! म्हणाली तरी 'होय' होते
नको बोलताना किती लाजली ती?

नजर रोज शून्यात लावून बसतो
कुठे खोल हृदयामधुन हरवली ती?

सुखाचाच संसार म्हणते अताशा;
तिला ज्ञात कितपत सुखी जाहली ती?

ऋतू कंच हिरवा मला साद घाली
नि खड्ड्यात मी जिंदगी घातली ती

३.
रोज स्टेटस पाहते आहेस तू
माहिती आहे इथे आहेस तू

फोन नाही टेक्स्टही नाही कधी
मी कसे समजू कुठे आहेस तू

रेंज होती, फोन नव्हता लागला
एवढे का टाळले आहेस तू?

काळजाचे दार आहे वाजले
पण कुणी नाही तिथे; आहेस तू?

आजही मिसरा तुझा सुचतो मला
काय गारुड घातले आहेस तू?

शेवटी प्रारब्ध माझे सोबती
अन तरीही वाटते आहेस तू!

४.
अजुन मिळाले नाही उत्तर
कशास पाटी? कशास दप्तर?

घाम गाळला बापाने मग
अमुच्या शर्टावरती अत्तर

नात्यामध्ये दरी वाढता
एकक ना मोजाया अंतर

प्रश्न कोवळा साधा होता!
का अडखळशी, का ही थरथर?

ठाम भूमिका तुझी पाहिजे
घडी घडीला नकोच जर तर

मी नसल्यावर तुझा भाव बघ
शंभर, नव्वद, ऐंशी, सत्तर

मीच काढतो तुझी आठवण
कोण तुलाही माझ्यानंतर?

प्रेम आणखी काही नसते
जादूटोणा, जंतर मंतर

५.
शराबी दोन डोळे अन गुलाबी गाल होवू दे
अताशा प्रेम झालेले जरा जवळीक वाढू दे

तुपाचे बोट लावुन का कुणाचे ओठ सावरले
तुझ्या तांबूस ओठांचा जरासा संग  लाभू दे

तुझ्यावाचून आहे व्यर्थ ही माघातली थंडी
तुझे तारुण्य अंगावर मला ओढून घेवू दे

कुण्या वळणावरी घसरेल माझा पाय मी सांगू
मला वळणे तुझी सारी जरा निरखून पाहू दे

जरी झालो किती उत्कट तुझा ना थांग सापडला
तुझ्यासोबत प्रवाही कर मला एकात्म पावू दे
.............................................
प्रशांत पोरे

No comments:

Post a Comment