आधी सरते पत्रकारिता नंतर सरतो देश खरा
आधी मरते न्याय व्यवस्था नंतर मरतो देश खरा
आधी मरते न्याय व्यवस्था नंतर मरतो देश खरा
खोट्या हाता मध्ये जेंव्हां सत्ता जाते देशाची
खरा असूनी जगी उगा मग खोटा ठरतो देश खरा
खरा असूनी जगी उगा मग खोटा ठरतो देश खरा
बलात्कारही पावन ठरतो जेंव्हां शासन दरबारी
लज्जित होउन मनात अपुल्या मातम करतो देश खरा
षडयंत्राने जिथे जिंकल्या जाते सत्ता देशाची
खरे पाहता तिथेच अपुली अब्रू हरतो देश खरा
पोशिंद्याची दैनावस्था बघतो तेंव्हां अक्षरशः
नजरे मधुनी स्वतःच अपुल्या पार उतरतो देश खरा
धर्माच्या मुस्कटदाबीचा त्रास शिगेला गेल्यावर
आधी मरतो राजधर्म अन् नंतर मरतो देश खरा
२.
डोळ्यात बारमाही गंगा निवास करते
ओठां मधे तरीही कायम तहान असते
ओठां मधे तरीही कायम तहान असते
येणेच शक्य नाही परतून ज्या पिलांना
घरटे उगाच त्यांची दररोज वाट बघते
मदिरालयातही जर करमत नसेल तुज तर
तू सांग जीवना मग कोठे तुला करमते ?
होतात कौतुके बस या दृष्य हिरवळीची
ओलीस अंतरीच्या कोठे महत्व असते ?
प्रत्येक मैफलीला करते जरी सुशोभित
जीवन सदा शमाचे होऊन धूर सरते
वाचाळ वीर ओढे पोटी असून सुद्धा
ओठी समुद्र काया अभिजात मौन जपते
नयनी सतत असू दे राखून दोन अश्रू
वाइट घडी कधीही सांगून येत नसते
३.
इतुक्या साठी मित्रजनांच्या नजरे मधुनी पडलो होतो
मी शत्रूच्या मृत्यूवरती फक्त जरासा रडलो होतो
मी शत्रूच्या मृत्यूवरती फक्त जरासा रडलो होतो
दुर्दैवाच्या फेऱ्यातिल मी पान अभागी होतो बहुधा
पानगळीतुन बचावलो अन् ऐन वसंती झडलो होतो
अस्थिरतेचा शापित होउन भटकत फिरलो अवकाशी मग
मनपंखावर स्वार होउनी स्वैर एकदा उडलो होतो
जीवनभर मग तिचा अबोला जिवास माझ्या छळत राहिला
रागामध्ये जिनगानीवर नाहक थोडा चिडलो होतो
आवडलोना जगास याची खंत कधी मी केली नाही
कारण हे की मीच कधीना मुळी मला आवडलो होतो
४.
अंतरीची एक इच्छा अंतरी राहून गेली
जिंदगीला शोधण्यातच जिंदगी संपून गेली
जिंदगीला शोधण्यातच जिंदगी संपून गेली
गप्प होतो मी तरी पण आजही चर्याच माझी
माझिया आधी तुला माझी दशा सांगून गेली
देशही जाईल झोपी यार पाठोपाठ त्यांच्या
माणसे देशातली जर जाणती झोपून गेली
काल फांद्यांवर जयांचा माझिया होता निवारा
पाखरे ती आज माझ्या केवढ्या लांबून गेली
जन्मभर नव्हतोच मी जर नेमका माझ्या मधे तर
कोण व्यक्ती जन्म माझा मग इथे कंठून गेली ?
शिक्षणाचा गर्व सारा पार मग उतरून गेला
गोष्ट ऐसी ती अडाणी माणसे बोलून गेली
५.
मारा खुशाल मजला सहजी मरेन मी
गझलेत मात्र अपुल्या कायम जगेन मी
गझलेत मात्र अपुल्या कायम जगेन मी
प्रत्येक हार देते लढण्यास बळ मला
द्वेषा पुन्हा तुझ्याशी नक्की लढेन मी
कळलो मुळी न जेंव्हां मजलाच मी कधी
दुनिये तुला बरे मग कैसा कळेन मी ?
होइल यमा तुझ्याशी जेंव्हां मुकाबला
हासून डाव तुजला अर्पण करेन मी
वाणीत माझिया ती असते सतत जशी
मौना मधे तिच्याही बहुधा असेन मी
झाले चकित बघुन मज सारेच नातलग
परक्या घरी चुकुन तर आलो नसेन मी ?
.............................................
मसूद पटेल
९६०४६५३३२२
No comments:
Post a Comment