१.
मीच माझ्या घरी बेघरासारखा
भग्न खोप्यातल्या पाखरासारखा
घेरले सागरी वादळाने मला
हाकतो नाव मी बेडरासारखा
जीवना जाहला काय पाषाण तू
देवळातील त्या ईश्वरासारखा
फाैज माझ्यापुढे संकटांची उभी
झुंजतो मी इथे संगरासारखा
जन्म माझा कसा राहिला कोरडा
पावसावाचुनी वावरासारखा
हे निळाई मला पाज पान्हा तुझा
हंबरू मी किती वासरासारखा
२.
कुठे ओसाड या रानी नवे घरटे विणायाचे
कसे घायाळ चोचीने तुझे गाणे म्हणायाचे
कितीदा सांजवेळेला तुझे नक्षत्र न्याहाळू
पुढे आभाळ ताऱ्यांचे आता आहे विझायाचे
कशी कोणास सांगावी कहाणी आसवांची मी
उगा काळीज शब्दांनी कोणापाशी चिरायाचे
कळेना शाप मी येथे कशाचा भोगतो आहे
उभे आयुष्य एकाकी मला आहे जगायाचे
तुझ्या आराधनेसाठी किती हा प्राण ओवाळु
सुन्या या आरतीमाजी मला आहे जगायचे
३.
तू वसंत पांघरून भेटशील का मला
गे मनात मोहरून टाकशील का मला
हे कसे तुला उगीच स्वप्न वेड लागले
पापणीत तू जपून ठेवशील का मला
मी खरेच का तुला कळावयास लागलो
चांदण्या लिपीत रोज वाचशील का मला
हारवून टाकलेस सांग तू मला कुठे
अंतरातल्या गुफेत शोधशील का मला
४.
बोलणे खोटे तुझे अन् हासणे खोटे तुझे
जाणतो मी नेहमीचे वागणे खोटे तुझे
सांजवेळी का मला तू भेटशी बागेत या
जीव तू माझ्या जिवाला लावणे खोटे तुझे
रंगल्या ओठी तुझ्या या बोचती काटे मला
हे गुलाबाच्या कळीचे लाजणे खोटे तुझे
पाहशी स्वप्ने नवी तू रोज आकाशातली
चोरट्या डोळ्यातले हे चांदणे खोटे तुझे
मी सखा स्नेही तुझा चर्चा असे चोहीकडे
धुंद वाऱ्यासारखी या वाहणे खोटे तुझे
सांग ना माझे कशाला कापले काळीज तू
फुंक माझ्या वेदनेला मारणे खोटे तुझे
......................................................
ललित सोनोने
No comments:
Post a Comment