दिनेश भोसले : दोन गझला



१.
तसे कागदाला कुठे काय कळते?
मुक्या अक्षराला कुठे काय कळते?

असू दे मनाच्या तळाशी निखारा
इथे वादळाला कुठे काय कळते?

किती चालते या जगी कूटनिती!
भल्या माणसाला कुठे काय कळते?

किती कोरडे रान माझ्या मनाचे!
तुझ्या पावसाला कुठे काय कळते?

तुझ्या हासण्याला किनारे हजारो
सखे आरशाला कुठे काय कळते?

२.                     
तुझ्या नजरेत मी मजला पहाया लागता कळले
किती शंका-कुशंकांनी मनाचे कोपरे भरले!

हवे तर जात खोडूया असे जेव्हा म्हणाला तू
धगीच्या कैक लाटांवर मनोरे मी किती रचले !

मनाची जळमटे सारी निघाया लागली तेव्हा
मला माणूस व्हायाचे असे आतून जाणवले


निरागस भाव..निर्मळता तुझी शोधू कुठे आता?
कळेना मज तुझे दोस्ता कशाने विश्व पालटले?

नको भगवा, निळा, हिरवा; तिरंगा  आजमावुन बघ
'मला भारत हवा आहे' तिरंगी टोक फडफडले

कुठे पाऊस मोठा  तर कुठे दुष्काळ पाण्याचा
मरण दोन्हीकडुन माझे मला भेटून कळवळले

............... ...............................................................

दिनेश भोसले
त्रिवेणीनगर, तळवडे

No comments:

Post a Comment