हात नाही सोडला पण वादळाने
राग आळवला मना पासून मी..
पण ऐकले नाही जराही पावसाने
लेक आहे त्याच बापाला विचारा
सोसले आहे किती त्या काळजाने
मी तुझ्या स्वप्नात जेंव्हा येत होते
ऐनवेळी घात केला पैंजणाने
पुरत नाही वीज जर का माणसाला
वाढवावा वंश आता काजव्याने
सोडले माहेर होते ज्या क्षणाला
दु:ख होते त्या क्षणाच्या आठवाने
२.
पापे धुवून जावे गंगेत नाहल्यावर
माझ्यातल्या मला मी पाण्यात सोडल्यावर
घालू तरी कशाला पायात पैंजणांना
माझ्यावरी जगाने जर बंध लादल्यावर
कळले मला जरी हे प्रेमात काय आहे
कळते कुठे मनाला पण जीव लावल्यावर
राहून शांत बघतो घोडा किती वराती
चढता कधी न आले त्यालाच बोहल्यावर
तू घेतलास जेंव्हा अलवार हात हाती
मी सावरू कसे रे स्वप्नात भेटल्यावर
ठेवू कसा भरोसा मी सांग ना तुझ्यावर
डोळ्या समोर माझ्या वचनास मोडल्यावर
३.
जन्म आहे लाभला जर माणसाचा
चालवावा वारसा का दानवाचा
पावसाने चिंब केले एकटीला
राग यावा मग तुला का पावसाचा
राहिली माझ्या मनाची एक ईच्छा
ऐकला पावा कधी ना माधवाचा
दु:ख माझे सहन होईना अखेरी
वेदनांनी हट्ट केला जाळण्याचा
सांगते मी दखल माझी घेत जा तू
भरवसा आहे कुठे या जीवनाचा
............................................
अश्विनी विटेकर
No comments:
Post a Comment