१.
सुरू आहेत का ठोके अता हेही कळत नाही
ह्रदय शाबूत असल्याचा पुरावा सापडत नाही
दिली फेकून मीही शेवटी ती फाटकी चप्पल
असू दे वाट काटेरी फरक आता पडत नाही
अताशा फेसबुकवर नेहमी असतो पडिक आम्ही
तसे तर आपल्यांसोबत घडीभरही बसत नाही
कुठे असतील ते रॅपर्स उष्ट्या चॉकलेटांचे
तिलाही आठवत नाही मलाही आठवत नाही.
तसे तर राहते आईविनाही लेकरू तान्हे
कुणावाचून कोणाचे जरासेही अडत नाही
जरा चिमटीत येतो शेर आणिक वृत्त गडबडते
करू मी काय गझलेचे मला आता सुचत नाही
२.
तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही
तू गेल्यावर कुणी फारसे स्वप्नांचा तळ गाठत नाही
सजावटीच्या वस्तूंनी भरलेली खोली आत मनाच्या
त्यात एकटी एक बाहुली दार मनाचे उघडत नाही
बाप व्हाटस्अप- माय फेसबुक - ट्विटरच्या नादात लेकरे
भरलेले घर असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नाही
संशय जेव्हा नात्यामध्ये रुजु लागतो कणाकणाने
अशा विषारी मातीमध्ये कधी बियाणे उगवत नाही
कसे बिचारे उंच भरारी हवेत घेइल खुल्या मनाने
नाजुकशा पंखांना इतके भारी दप्तर तोलत नाही
३.
फार भारी वाटतो उपकार एखादा
हेलपाट्यांनीच होतो ठार एखादा
बंद कर जन्माप्रमाणे रोजचे छळणे
कर जरा मृत्यूप्रमाणे वार एखादा
हेच ते आहेत का साहेब अच्छे दिन
रोज येतो तुघलकी जी आर एखादा
तोंड दाबुन भेटतो मग मार बुक्क्यांचा
मांडतो जेव्हा खरी तक्रार एखादा
सोड आता तू तुझे हे व्यर्थ गाऱ्हाणे
या व्यवस्थेवर दगड तू मार एखादा
राहते पाणी कुठे पाणी तसे साधे
स्पर्शही असतो किती चवदार एखादा
४.
शरीरात जहराचे लक्षण वाढत गेले
जेव्हा जेव्हा मनात मीपण वाढत गेले
संध्याकाळी घरटे एकाकी पडल्यावर
झाडाचेही उदासलेपण वाढत गेले
घाव आतले दाखवताही आले नाही
सोसत गेल्याने मोठेपण वाढत गेले
आत भुकेची भाकर बहुधा करपत होती
पोटावरती चटक्यांचे व्रण वाढत गेले
माझ्या नकळत वागत असतो तुझ्यासारखा
माझ्यावरचे तुझे नियंत्रण वाढत गेले
होत राहिला अफवांनी राईचा पर्वत
बघता बघता मग 'ते' प्रकरण वाढत गेले
.....................................................
अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
Badhiya bhai
ReplyDeleteSissy gelyane mothepan badhata gele
ReplyDeleteChhan!!!!!
माझ्या नकळत वागत असतो तुझ्या सारखा
ReplyDeleteमाझ्यावरचे तुझे नियंत्रण वाढत गेले
!!!भाउ संभालो !!!!
जेव्हा जेव्हा मी पण वाढत गेले....व्वा व्वा...बहोत बढीया..
ReplyDeleteअमोलजी, गझला छानच झाल्या आहेत. हे शेर विशेष आवडले.
ReplyDeleteजरा चिमटीत येतो शेर आणिक वृत्त गडबडते
करू मी काय गझलेचे मला आता सुचत नाही
बंद कर जन्माप्रमाणे रोजचे छळणे
कर जरा मृत्यूप्रमाणे वार एखादा
राहते पाणी कुठे पाणी तसे साधे
स्पर्शही असतो किती चवदार एखादा