असेलही नसेलही : डॉ.राज रणधीर

               
                           

                     आवडीच्या पुस्तकांचे रसग्रहण करणे कोणाला नाही आवडणार? तसा मी काही समीक्षक नाही परंतु हा गझलसंग्रह जसा हातात पडला तसा तो पूर्ण वाचूनच काढला. एकेक एक गझल हृदयाच्या तारा छेडत गेली. असे म्हणतात जाणिवेपासून शब्दापर्यंतचा प्रवास म्हणजे शायरी. हाच प्रवास करतांना कधीकधी आयुष्य कमी पडते, नाही का ?
        या गझलसंग्रहात एकापेक्षा एक सरस रचना आहेत.वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटणार नाही इतकी सुंदरता प्रत्येक गझलेत सफायिदारपणे प्रत्येक शेर मध्ये आलेली आहे.गझलेचे विविध अंग हीच ख-या गझलकाराची खासियत असते.आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवच अगदी सफायिदारपणे शेरात मांडणे हेच त्या गझलकाराच्या यशस्वीतेचे गमक. शब्दामधून परकाया प्रवेश करण्याची कला फक्त मोजक्याच गझलकारांना लाभते त्यातलेच एक नाव म्हणजे सौ.हेमलताजी पाटील यांच्या गझलसंग्रहातील मला विशेष भावलेले काही शेर पेश करतो...
         प्रेमाच्या त्सुनामीमध्ये भल्याभल्याचे हृदय निकामी झाले आहे आणि त्सुनामी पोहता येणा-यालाही पोहण्याचा वेळ देत नाही हे शेरातून अगदी छान पैकी मांडले आहे..


तुझी प्रीत की ती त्सुनामी वगैरे
हृदय त्यात झाले निकामी वगैरे
 हा शेर बघा,

तिथे युद्ध लढता किती ठार झाले
इथे फक्त त्यांना सलामी वगैरे


       सीमेवरती युद्ध लढणारे सैनिक देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र कडक ऊन किंवा रक्त गोठवणारी थंडी असो ते तठस्थ असतात आणि इथे आपण शहीद झालेल्या वीरांना फक्त सलामीच देवू शकतो किंबहुना ते ही देतांना आपण टीव्हीचे चॅनल बदलत असतो ही शोकांतिका आहे ती या शेरातून सहजरीत्या मांडली गेली आहे. आणि हा शेर तऱ बघा ...
मी दिवसभर थोपवू शकते स्मृतींना
रात्र झाली की सुरू होतो पुकारा

पावसा,बाहेर ती येणार नक्की
येवढा घालू नको तू येरझारा


          पावसाचे ढग जणू तिच्या बाहेर येण्याचीच वाट पाहता आहे आणि ती जशी आली ते टपूनच बसलेले आहेत तिला भिजवण्यासाठी. बरेच काही राहून जाते करण्याचे या जन्मी.अशी काही स्वप्ने प्रत्येकाच्याच वाट्याला आली असेल .. हो न...

जसे वाटले तसे नव्याने जगून पाहू पुढल्या जन्मी
मनातलेही मनासंगती करून पाहू पुढल्या जन्मी
        
आसक्तीने तहानलेल्या किती घागरी रित्या राहिल्या
पाणवठ्यावर पुन्हा येवुनी भरून पाहू पुढल्या जन्मी

           काही स्वप्ने पूर्ण करतांना कोणाचे आभार मानायचे पण राहून जातात.या आयुष्याकडून इतके करून घेतले पण त्याबदल्यात त्याचे आभारपण मानायला आपल्याला वेळ मिळत नाही.


इतक्या लवकर काळ सरकला,निरोप देण्या सांज उभी ही
आयुष्याचा हिशोब चुकता करून पाहू पुढल्या जन्मी


        हा शेर हृदयाच्या तारा अलवारपणे छेडतो.शेर कसा सुचला असेल या विचारातच मी पडलो आणि  wow असे म्हणावे असा हा मुकर्रर मतला ...

वृंदावनात जळल्या तुळशीसमान झाले
आयुष्य आज माझे पुरते स्मशान झाले


      स्री च्या जीवनावर अनेक शेर लिहिले गेले पण आजही दुर्दैवाने स्री कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला नाही हे या शेरातून स्पष्ट होते .
क्षमता समान आणिक कीर्ती महान असुनी
दर्ज्यात स्थान स्रीचे का मग लहान झाले

मला विशेष भावलेला शेर आहे हा ... की


सा-या जगास भिजवत आजन्म राहिला जो
मी त्याच पावसाची व्याकुळ तहान झाले

अहाहा !! आणि हा तर नितांतसुंदर ...


भाग्यवान तो जगा पोसण्या हाती त्याच्या नांगर आहे
विश्वाचा तो पोशिंदा पण त्यावर रुसली भाकर आहे


नव्या योजना नव्या घोषणा रोज दावती नवी गाजरे
इथे बळीचे भविष्य अवघे शासनावरी निर्भर आहे


          शेतकऱ्यांची कैफियत मांडणारा शेर आजही शेतकरी एक पाऊस आणि दुसरे शासन यांच्यावरच निर्भर आहे आणि त्यांच्यावर इथे राजकारणी आपल्या पोळ्या भाजण्याचे काम करते आहे.
    हा शेर बघा महिलांना संदेश देणारा मुकर्रर शेर आहे 


होत सबला दहन रावणाचे करू
आग इतकी उरी पेटली पाहिजे

   आणि पुढे त्या कलयुगीं नारीची खबर घेत काय म्हणता बघा...


लेकरू जर असावे शिवाजी परी
तू जिजाऊपरी वागली पाहिजे
वयात येणा-या मुलींना संदेश देतांना..

जपून उमला येतांना बाहेर कळ्यांनो
वासनांध नजरा घुटमळती बघण्यासाठी

आणि त्या हा संदेश देताना हेही सांगतात की

रक्षक तुझ्या शिलाचे व्हावेस तूच नारी
प्रत्येकदा न येती धावून चक्रधारी

स्त्रियांचे समाजातील स्थान अधोरेखीत करणारे काही नितांत सुंदर शेर हेमलताताईंनी सहज लिहिले आहेत... 

दुर्गा नि अंबिकाही स्री देवताच होत्या
का मंदिरास त्यांच्या झाला विटाळ होता

 आज काल प्रत्येकाला आई,बायको,बहिण,मैत्रीण पाहिजे पण घरात लेकीचे स्थान काय हे त्या पुढील शेरातून सांगतात.....
  
जीवनाला सुखाची हवी जोड तर
लेक अपुल्या घरी जन्मली पाहिजे


         वारशाचा हट्ट धरणा-यासाठी ही चपराक आहे.मुली शिवाय घरात सूख नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. आयुष्यावर शेर लिहिताना त्या म्हणतात

कधीही लावले नाही मला ओढून हृदयाशी
असा माझ्यावरी झालास का नाराज आयुष्या


फळेना मेहनत माझी नकोशी वाटते फरफट
यशाचा घोट एखादा मला तू पाज आयुष्या


                       हेमाताईंचे गझल लिखाणातील वैशिष्ट्ये म्हणजे खयालाची वैविध्यता अन्याय अत्याचार विषमता या सर्व बाबींवर त्या अलवार हृदयस्पर्शी लिहितात...आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोण आणि दु:खातही एक नजरेने पाहाण्याची त्यांची वृत्ती ही गझलेला एका नव्या उंचीवर नेवून ठेवते  ...
आणि हा शेर बघा
सोडुनी चालले मी जगाला तुझ्या
शेवटी या मुखी बस् तुळस पान दे

हेमलताताई भ्रष्टाचा-यांवर देखील वार करतात...
विकुनी इमान जर का केलीस तू दलाली
लाजून हा तिरंगा घालेल मान खाली

             महापुरुषांना जातिधर्मात वाटून घेणा-यांना आणि नुसताच नावाचा जयजयकार करणा-यांना विचार करायला लावणारा हा शेर चपखलपणे बसला आहे....

प्रतिमा पूजन करण्यापेक्षा विचारातुनी रुजवू शिवबा
अशाप्रकारे शिवरायांना अभिमानाने घालू मुजरा

 जीवनात आईची महती सांगणारा हा शेर बघा...

आईच प्रेरणा अन् आईच मार्गदर्शक
आईशिवाय कुठला घडणार शाम नाही



          हेमलताई आईची महती सांगताना आपल्या मुलांवर देखील भार होऊ ईच्छित नाहित...

नोंदले आत्ताच आहे नाव मी वृद्धाश्रमी
माय म्हातारी कुणावर व्हायला निर्भर नको 

                             निव्वळ अप्रतिम आणि नितांतसुंदर अशा एक से एक रचना या गझलसंग्रहात वाचायला मिळतात. शेवटी एवढेच सांगेन हा गझलसंग्रह वाचून गझलेच्या प्रेमात माणूस पडलाच पाहिजे इतक्या छान रचना या संग्रहात समाविष्ट आहेत. आम्हा रसिकांसाठी हेमाताई आपण अशीच मेजवानी देत राहाण्यासाठी भरभरून लिहित रहा आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

.............................................
डॉ.राज रणधीर

असेलही नसेलही
गझलसंग्रह
सौ.हेमलता पाटील
 स्वागत मूल्य१५०/           

No comments:

Post a Comment