अल्पना देशमुख-नायक : पाच गझला



१.
कारणा वाचूनही थांबून बघ
तू स्वतःला दोन क्षण  दूरून बघ

खूप झाले वाहणे अश्रूसवे
एकदा दुःखासही रोखून बघ

सुगरणीचा काढला खोपा अता
आस-याचे झोपडे बांधून बघ

आपले परके तुला कळतील मग
अंतरीची वेदना सांगून बघ

कोंडवाड्यातील हे जगणे नव्हे
आखलेली रेष तर लांघून बघ

वेगळा भासेल हा रस्ता तुला
एकदा माझ्याविना चालून बघ

२.
गूढकथांचे हे रोमांचक पुस्तक आहे का?
तो माझ्या हृदयाचा पहिला वाचक आहे का?

वेगवेगळ्या किती भूमिका देतो जगताना
अमुचे जीवन तू लिहिलेले नाटक आहे का?

उपजत असते आईपण रुजलेले हृदयातच
कूस उजवण्यातच जन्माचे सार्थक आहे का?

नर्तन करती पाउसधारा त्याच्या तालावर
वारा म्हणजे कोणी तबलावादक आहे का?

अभिलाषांचा मोह पडेना त्याला आताशा
मन माझेही कुणी तपस्वी साधक आहे का?

अशक्य वाटत आहे क्षणभर नजर काढणेही
डोळ्यांमध्ये केले त्याने बंधक आहे का?

विचारचक्रातच भिरभिरते आहे केव्हाची
या मेंदूला दुसरे कुठले फाटक आहे का?

३.
इलाजाविना तडफडू द्यायचे
ठरवलेस का रे रडू द्यायचे?

रुचीपालटाला हवा गोडवा
किती घोट अजुनी कडू द्यायचे?

पुढे सिद्ध होते खरे नेहमी
जगाला अता बडबडू द्यायचे

नको कौल देऊ मनाजोगता
तुला पाहिजे ते घडू द्यायचे

व्यथा आणती थेट दुनियेपुढे
अशा आसवांना दडू द्यायचे

फुले नेहमी देत गेले तुला
निखारे कसे सावडू द्यायचे?

गुरूमंत्र आहे यशाचा खरा
पडू द्यायचे, धडपडू द्यायचे

४.
रात्रभर डोळ्यात वादळ राहिले
सांगण्यासाठीच काजळ राहिले

राखले सौंदर्य कायेचे किती
पण मनाचे रूप ओंगळ राहिले

धीर शब्दांनी दिला आहे तुला
आसवांचे दोन ओघळ राहिले

वागते कायम शहाण्यासारखे
बालपण आता न अवखळ राहिले

ही तुझी जागा रिकामी राहिली
वाटते आयुष्य पोकळ राहिले

एकही इच्छा तशी ठेवू नको
मागणे इतकेच केवळ राहिले

चेहरा भेसूर झाला आतला
वागणे वरतून सोज्वळ राहिले

माखले आहेत माझे हात पण
सांग येथे कोण निर्मळ राहिले?

पाय थकले अन् उसवला श्वासही
यायचे हातात मृगजळ राहिले

५.
खंत इतकी वाटते की स्पर्श करता येत नाही
लांबणा-या सावलीला थांब म्हणता येत नाही

काळजावर लागलेला डाग पुसता येत नाही
आवडीचा रंग या चित्रात भरता येत नाही

घेतलेला एक झोका उंच जातो एवढा की
गुंतते पाऊल पण मागे परतता येत नाही

फार प्रेमाने जरी मी बोलते आहे तुझ्याशी
राग,नाराजी मला माझी लपवता येत नाही

वेदना शालीन आहे, दुःख अब्रूदार माझे
आसवांना त्यामुळे बाहेर पडता येत नाही

या समस्येवर जरासा वेगळा पर्याय शोधू
यापुढे लक्षात ठेवू जे विसरता येत नाही

वाटले अवघड तरीही सत्य हे स्वीकारले की
फक्त आशेच्या दिव्यांनी घर उजळता येत नाही

.............................................

अल्पना देशमुख-नायक

1 comment:

  1. छान गझला अल्पनाजी! हे शेर विशेष आवडले -

    कारणा वाचूनही थांबून बघ
    तू स्वतःला दोन क्षण दूरून बघ

    वेगवेगळ्या किती भूमिका देतो जगताना
    अमुचे जीवन तू लिहिलेले नाटक आहे का?

    गुरूमंत्र आहे यशाचा खरा
    पडू द्यायचे, धडपडू द्यायचे

    माखले आहेत माझे हात पण
    सांग येथे कोण निर्मळ राहिले?

    वेदना शालीन आहे, दुःख अब्रूदार माझे
    आसवांना त्यामुळे बाहेर पडता येत नाही

    वाटले अवघड तरीही सत्य हे स्वीकारले की
    फक्त आशेच्या दिव्यांनी घर उजळता येत नाही

    ReplyDelete