बबन धुमाळ : पाच गझला

Image may contain: 1 person, smiling, close-up

१.
ती म्हणाली तू मला विसरून जा
आठवांची पण फुले ठेवून जा

काय या जगण्यात आहे सांग ना
काळ हा मागे जरा फिरवून जा

लाभला सहवास मजला तो पुरे
एकदाचे तू मला रडवून जा

वागतो अजुनी कसा बालीश तू
ना पुन्हा भेटायचे ठरवून जा

या जगी जिंकायचे आहेस तर
मी पणाला या तुझ्या हरवून जा

घास ना मिळतो जया राबूनही
त्या भुकेल्या माणसा भरवून जा

२.
दूर का फसवून जावे पावसाने
जाहलो व्याकूळ यावे पावसाने

त्राण ना पंखात उडण्याचे खगांच्या
प्राण या पंखात भरावे पावसाने

रूक्ष माती जीर्ण पाती भोवताली
पावसाळी गीत गावे पावसाने

आसवांचे आटलेले हे झरे बघ
डोह ओढ्यांचे भरावे पावसाने

करपली धाने भुकेला काय खावे
एवढे लक्षात घ्यावे पावसाने

आवडे जेथे तुला तेथे झरावे
काळजामध्ये उरावे पावसाने

३.
राबणारा या जगी लाचार भाऊ
भामटा लावून फिरतो धार भाऊ

लाच देण्याला नसे पैसा तयाचा
पोरगा गावी फिरे बेकार भाऊ

दंड ठोकू दे कितीही पामराने
नोंदली त्याचीच जाते हार भाऊ

लाख पाठिंबा असू द्या माणसांचा
लागते घ्यावी इथे माघार भाऊ

धावलो मागे सुखाच्या भेटले ना
वेदना होते अता आधार भाऊ

लागला त्याच्या बळाने तो पळाया
तू उगी खातोस येथे खार भाऊ

पोरगी पळवून नेली काल ज्याने
वाळला नाही तयाचा जार भाऊ

नाद दे सोडून गोंडस या पिलांचा
उंच आकाशात फिरते घार भाऊ

४.
संकटानी घेरले होते
संयमाने पेलले होते

मीपणाचे बोलणे त्यांचे
काळजाला झोंबले होते

स्व घराची वाट धरल्यावर
आठवांना टाळले होते

आप्त सारे दूर गेल्यावर
मी मला सांभाळले होते

भाव गडगडले अचानक अन्
स्वप्न जपले भंगले होते

दूर गेल्यावर.... दुराव्याने
नाव त्याचे खोडले होते

का नको तेव्हा इथे आला
मी मला समजावले होते

५.
कळाया दुःख अपुल्यांचे फुटावा लागतो पाझर
उरी दाबून सारे सल बनावे लागते ईश्वर

जरी मी बोललो नाही जरा समजून घ्यावे ना
सुखाच्या आड दुःखाचा किती मी सोसतो वावर

जराशी चूक झाली तर तुला रे भांडता येते
मला रडता कुठे येते कसा होवू गडे कातर

कधी तू पाहिले नाही मला कष्टात रमल्याचे
तुला नाही कळायाचे किती मी कापले अंतर

सदा झोळी पसरताना मनाचा फाटतो पडदा
तुझ्या उधळ्या स्वभावाला जरासा घाल ना आवर

धरावी लागते आशा उद्याच्या गोड स्वप्नांची
तुझे कायम उद्याचे ते नको आता बघू नंतर

..........................................................
बबन धुमाळ.
आलेगाव.ता.दौंड.
मो नं. 9284846393.
व्हाटस अप नं. 7066156207.

3 comments:

 1. राबनारा या जगी लाचार भाऊ
  भामटा लावुन फिरतो धार भाऊ
  !!अगदी सही!!!

  ReplyDelete
 2. अप्रतिम शब्दरचना

  ReplyDelete
 3. अप्रतिम गझल .👌👌👌👌

  ReplyDelete