गणेश शिंदे : चार गझला



१.
प्रश्न असतो ओल नात्यांतून मिळण्याचा
कोरडा दुष्काळ नुसता काय कामाचा

वाटणी झाली...मिळाली उत्तरे सगळी
प्रश्न पण कायम उगाचच माय-बापाचा.

वाहते वारे असो वा कमकुवत फांद्या
बांधते सुगरण तिथे खोपा दिलाश्याचा

वेधशाळेसारखे मन वागते हल्ली 
हासण्यातुन काढते अंदाज दुःखाचा.

पुस्तकांतुन वाचलेल्या करपल्या गोष्टी
रोजच्या जगण्यात होता जाळ मरणाचा

फाळ रुतला काळजा जेथे शिवाराच्या..
उगवला तेथे पहा अंकूर जन्माचा

दे सरी काही सुखाच्या चिंब होवू दे..
फार छळतो एरवी दुष्काळ जन्माचा

ही मनाची पोकळी निर्वात जर झाली
मग कसा वाढेल तेथे वाद शब्दांचा

आठवांची केवढी गर्दी मनाशी ही
गच्च फुललेला जणू बाजार शहराचा

२.
देह पाचोळा खरोखर व्हायच्या आधी
आतला शोधा ऋतू बदलायच्या आधी

ओळखीचा ठेवला मी चंद्र डोक्यावर
आठवण आता तुझी विझवायच्या आधी

ते तुझे डोळे, तुझा तो स्पर्श, ते हसणे
आठवत असते तुला विसरायच्या आधी

तू कला शिकलीस कोठे जीव घेण्याची
सांग इतके.... वेगळे सांगायच्या आधी

श्वास सांगत राहतो ही गोष्ट नियमाने
भोग ना आयुष्य हे संपायच्या आधी.

तू तुझी दुःखे कशाला ठेवते लपवुन
जाणतो आई तुला जन्मायच्या आधी

एवढे लक्षात घ्यावे...घ्यायच्या आधी
खूप घेतो देव तुमचे द्यायच्या आधी 

३.
सांग का भावूक असते आठवण
का मनाची भूक असते आठवण

स्पर्श झाला की निघावे पोपडे
एवढी नाजूक असते आठवण

लाख नाही लाखमोलाचा तरी
आजिचा संदूक असते आठवण

येत नाही एकटी केव्हा,कधी
चांगली घाऊक असते आठवण

वळ मिटत नाही कशाने ही तिचा
चामडी चाबूक असते आठवण

बोलते स्पर्शात वा स्पर्शाविना
बोलते पण मूक असते आठवण

तेवढे डोळ्यास कळते का कुठे
लख्ख की अंधूक असते आठवण

भेट घेते रोज स्वप्नातुन प्रिया
त्याक्षणी कामूक असते आठवण

शेवटी मी ठोकताळा लावला
चूक नसते,चूक असते आठवण

४.
जसे पाहिजे तू तसे फक्त कर
जरा वेगळा पण तुझा ठेव स्तर

मला आठवाच्या झळा लागल्या
किती त्रास देते गुलाबी शहर

पुन्हा टाकली सावल्यांनी सुटी
पुन्हा त्यामधे या उन्हाचा कहर

उन्हाची नको काळजी एवढी
उन्हातूनही येत असतो बहर

मनाने विसरली तुझी वाट पण
व्यथा राहिली एक आयुष्यभर

.............................................
गणेश शिंदे दुसरबीडकर

No comments:

Post a Comment