गझलेत रदीफ शिवाय स्वरकाफिया वापरावा का? : हेमंत पुणेकर





                        आपल्या पारंपारिक काव्यशास्त्रात यमक ही संकल्पना आहे. दोन शब्दांच्या शेवटी समान शब्दांश असल्यास त्यांच्या उच्चारात समानता येते. त्याला यमक असे म्हटले आहे. व्याख्या करायला जरी किचकट शब्दांचा वापर करावा लागत असला तरी यमक समजणे आणि त्याचा आनंद घेणे अगदी सोपे आहे. आपल्या बालगीतांमधे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. किंबहुना यमकाशिवाय बालगीत लिहिणेच अशक्य! 
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा 

ये गं ये गं सरी 
माझे मडले भरी 
सर आली धावून 
मडके गेले वाहून 

हे मराठी भाषे पुरते सीमित नाही. गुजरातीत -
आव रे वरसाद
घेबरीयो परसाद
ऊनी ऊनी रोटली ने 
कारेलानुं शाक 

आणी इंग्रजीत -
ट्विंकल ट्विंकल लिट्टल स्टार
हाउ आय वंडर वॉट यू आर 
अप अबाव द वल्ड सो हाय
लाइकं डायमंड इन द स्काय 

म्हणजे काय तर चिमुरड्यानां दुसरे अलंकार कळो न कळो यमक छान कळतो आणि त्याची मजा ते भरभरून घेतात. कवितेशी फारसा संबंध नसलेल्या होम मिनिस्टर खेळणाऱ्या बायकांना पण हा अलंकार कळतो आणि उखाणा घेतांना त्याचा वापर ही त्या करतात. त्या ही कधीतरी चिमुरड्या होत्याच की! 

वाटीत वाटी, चांदीची वाटी 
मिस्टरांचे नाव घेते आदेश भाउजींसाठी

तर एकूण काय, ध्वनीसमानता ही माणसाच्या पटकन लक्षात येणारी आणि त्याला आनंद देणारी बाब आहे. 

आता अरबी-फारसी परंपरेतून आलेल्या गझल या काव्यप्रकाराने याच यमकाची एक दूसरी शक्यता आपल्यासमोर आणली. यमक हा एका शब्दा पर्यंत सीमित का असावा? एकाधिक शब्दांचा यमक ही असू शकतो. 
होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है 

ईश्क कीजिये फिर समजिए ज़िंदगी क्या चीज़ है


निदा फाज़लींच्या या शेराला आपल्या पारंपारिक पिंगळाच्या यमक या संकल्पनेने तपासल्यास "बेखुदी क्या चीज़ है" आणि "ज़िंदगी क्या चीज़ है" अश्या "शब्दावलींचा यमक" म्हणायला हरकत नाही. अरबी-फारसी परंपरेने या शब्दांचे दोन तुकडे करून त्यांना काफिया (बेखुदी, ज़िंदगी) आणि रदीफ (क्या चीज़ है) म्हटले, ज्यांना आपण यमक आणि अंत्ययमक म्हणतो. तर हे दोन तुकडे जरी असले तरी त्यांचा हेतू तीच ध्वनीसमानता निर्माण करण्याचा आहे जो आपला यमक करतो. या गोष्टीचा विसर पडल्याने मराठी गझलेत बराच गोंधळ होतोय असं मला वाटतं. 
                       निदा फाजलींच्या शेराचेच उदाहरण घेतले तर "बेखुदी" आणि "ज़िंदगी" मधे जरी फक्त "ई" इतकीच समानता असली तरी "क्या चीज़ है" सारखा रदीफ त्या काफिया-रदीफ युग्माची ध्वनी समानता वाढवण्यात महत्वाचा ठरतो. आणि म्हणून ती ज़मीन कानाला रुचकर वाटते. बरेचदा "क्या चीज़ है" सारखा बंधनकारक रदीफ चालवायलाच कवि मुक्त काफिया निवडतो. एकीकडे आवळलं तर दुसरी कडे मोकळं सोडलं, एवढंच! तर माझा स्वरकाफियाला बिलकुल विरोध नाही. पण रदीफ नसल्यास जमीन बऱ्यापैकी लूझ होते. ते ही एकवेळ चालू शकतं जर तुम्ही खोटा, मोठा, ओटा, पोटा. गोठा सारखे काफिये वापरणार असाल तर. या शब्दांमधे शेवटून दुसऱ्या व्यंजनाचा स्वर ही समान असल्याने काफियाला एका प्रकाराची "चुस्तता" येते. पण अगदी माझा, पैसा, तुमचा, टीळा, केला, हिसका, चूरा असे शब्द फक्त शेवटचा आ समान आहे म्हणून रदीफ शिवाय वापरले तर ते खरंच यमक म्हणण्यायोग्य आहेत का हा विचार व्हायला हवा. 
                       उर्दू गझलेत मूळात रदीफ नसलेल्या गझलाच कमी आहेत. त्यात आणखीन फक्त स्वरकाफिया असलेल्या गझलांचे प्रमाण खूप कमी असावे असा माझा अंदाज आहे. बाकी जाऊ द्या, तुम्ही एखाद्या लहान मुलाशी खेळतांना वर नोंदलेल्या शब्दांचा वापर यमक म्हणून केला तर त्याला मजा येईल का? आदेश बांदेकर अश्या शब्दांचा यमक म्हणून वापर केल्यास उखाण्यासाठी पॉईंट्स देतील का? याचं उत्तर माझ्या मते नाही असेच आहे. 
                       आनंद देणारी कला पहिली. मग तिचा अभ्यास. त्यातून नियम. पण कलातत्त्व इतके सूक्ष्म आहे की सर्वग्राही नियम तयार करणे अशक्य. पण नियम हाती लागले की आपण उलट प्रक्रिया सुरू करतो. नियमांना धरून कला तयार करतो. तसं करायला हरकत नाही पण तसं करतांना तो आनंदाचा मूळ धागा आपण जपलाय का हा प्रश्न प्रत्येक रचनाकाराने स्वतःला विचारायला हवा. काय वाटतं तुम्हाला? 

.........................................
हेमंत पुणेकर

No comments:

Post a Comment