ग्रामीण गझल लेखनाचा दस्तऐवज : प्रा.डॉ.मधुकर मोकाशी



               बबन धुमाळ  यांच्या ह्या गझलसंग्रहातील आशय आणि अभिव्यक्ती लगेच भावतात आणि  मनात सजून राहतात. गझल लेखनाचा अभ्यास आणि सराव केल्यानंतरच तंत्रशुद्ध पध्दतीने असे लेखन करण्यास येथे गझलकाराला यश मिळालेले दिसते. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या केलेल्या लेखनाला खरोखरच दाद देण्यासारखी आहे. अस्सल जातीवंत अनुभूतीने केलेले लेखन हृदयस्पर्शी झाले यात शंका नाही. कारण गझलकाराने स्पष्टच म्हटले आहे
  हे बंध वेदनेचे जोडून घेतले मी 
  हे दुःख माणसांचे मागून घेतले मी

कष्टकरी शेतकऱ्यांबद्दलची उच्चभू लोकांची धारणा किती चुकीची आहे हे दाखवून देताना गझलकार म्हणतो

  राबणे शेतात माझ्या केवढा आभास आहे 
 गाळल्या घामास म्हणती अत्तराचा वास आहे  

ही अनुभूती आतापर्यंत कोणी लिहली असे वाटत नाही. तरीही शेतकऱ्यांना वाटत राहिलेली सल व्यथीत करते. 
    
 ओल ना मातीत सांगा बी कसे पेरायचे 
 पावसाने का असे वा-यावरी सोडायचे


                   शेतकऱ्याला कोणी वाली नाही असा अनुभव आजच्या समाज जीवनात विविध पातळीवर वेळोवेळी येतच असतो. निसर्गही त्यास अपवाद नाही. हे वरील शेरातून समजते. कलीयुगातील गुणधर्म विशेष आणि वास्तव येथे सांगताना 
 तू बबन ध्यानात घे वारा कलीचा वाहतो हा 
 सारखी बघ ठेव आता रायफल लोडून येथे

                           येथे रायफल अर्थ भलताच संवेदनशीलतेने व्यक्त होतो. भ्रष्ट व्यवस्थेचा दाहक अनुभव घेतला तेव्हाची व्यथा पहा
 भ्रष्ट नेते भ्रष्ट चेले भ्रष्ट सारी यंत्रणा 
 खोलता मी राज त्यांचे बघ दिला नारळ मला

             सामाजिक तथा राजकिय विषयांवरचे भावचिंतन अभ्यासताना गझलकाराने पसायदान ही मागितले आहे.
 प्रत्येक हा माणूस आनंदी इथे नांदावया 
 काही नको माणुसकीचे धन हवे देशात या

संत तुकारामांच्या गाथेची आठवण सहजतेने येताना
  काव्य दुःखी माणसांचे वाचण्याला 
  चाळल्यावर ग्रंथ मी गाथेत आलो

युवा पिढीच्या हातात देशाचे भवितव्य सुरक्षित आश्वासित आहे
 शिकला तुम्ही जराशी समजून घ्या तिढा हा 
 तुमच्यावरीच आता सारी मदार आहे

संताच्या अभंगाशी मिळता जुळता गझलेचा शेर उद्धृत करताना विषादही व्यक्त झाला आहे.
 किती लांबून आलेलो इथे मी दर्शनासाठी 
 किती जाती पुढे माझ्या विठूला काय त्याचे ना

गझलकार मात्र खरोखरच विठ्ठल भेटीसाठी व्याकुळला आहे. सामाजिक सत्य आणि वास्तवाचे धगधगीत विचार पहा. 
 कुणाला मारल्याने प्रश्न नाही सुटत मित्रा 
 पुरा घायाळ झाला धर्म नाही उठत मित्रा

व्यक्ती ही शरीराने मरते पण तिचे विचार टिकून राहतात. कौटुंबिक नातेसंबंधात आलेला दुरावा व कटुता दाखवताना              
 कसे मनाचे क्षितिज जाहले संकुचित हे 
 मुलास होते बापाचीही घरात अडचण
काही सुविचार म्हणीही शेरात विराजमान होताना "नात्यापेक्षा पैसा मोठा" "कोण कोणाचा नसतो बाबा इथला मानव "" कुंपणे खातात आता रान सारे "अरजला तो गरजला  पडला तरी तो"" हात घाली काळजाला "" पुस्तकामध्येच शोभे हे जीवाला जीव देणे " " उगा मी या भुईला भार झालो " " लबाड नुसते तोंडाची ते वाफ घालावी "
उपमा अलंकार -  "   राबून जीवनाचा झालाय कोळसा " " काळजाचा जाहलेला कोळसा मी पाहिला "  
प्रतिमा आणि प्रतिक (काव्यसौंदर्य) -

कसे काळीज इतके जाहले निष्ठूर तुमचे 
कुणाचा घात करताना जरा फाटे न आता

येथे कौंर्य व निष्ठूरतेचा प्रत्यय येतो. ह्याशिवाय
किती दंगल किती कत्तल अराजक माजलेले 
जराही उष्ण रक्ताची नदी आटे न आता

येथे माणूस आणि माणुसकी व मानवतेचा बळी जातो हे समजते
प्रश्नार्थक अलंकार -
स्वप्नावरीच आमच्या देऊन पाय जाता 
आम्हीच पाय तुमचे सांगा कसे पुजावे

मातृभावनेचा व वात्सल्याचा उत्कृष्ट अविष्कार पाहताना
 कुणाची असू दे जरी माय वेडी 
 कधी लेकराला रडू देत नाही

स्त्री मुक्ती व महिला आरक्षणाचे अपयश शब्दांकित होताना
 छेडीस फास पक्का बोलून फार झाले 
 मसुदा पडून नुसता का संसदेत आहे

या बाबतीत अजूनही परिस्थितीत फरक पडलेला दिसत नाही. न्यायव्यवस्थेतील रामशास्त्रींचे अवमूल्यन होताना
                                                         कोणताही न्याय दरबारात मागा  
रामशास्त्री मागतो ते फार आहे 
                                   गझलसंग्रहातील प्रत्येक पानापानावर वेदनेचा हुंकार भरून राहिला असून विद्रोह आणि संघर्षांचाही संदर्भ लक्षात घेण्यास वाव आहे. ह्यातील गझल कथा - व्यथा, दुःख, निराशा, नाराजी, अन्याय, अत्याचार, फसवणूक, शोषण, विषमता यांनी भरून वाहताना हे बंध वेदनेचे शिर्षक समर्पक व यथायोग्य वाटते. शिर्षकाला दुसरे नावही देता येत नाही. या संग्रहातील प्रत्येक गझल ही वेदनेचे जवळचे नाते सांगते. आणि व्यक्तही होते. समाजातील सर्वच घटक (महिला, शेतकरी, सर्वसामान्य माणूस प्रेमीजीव, राजकारणी इ.) वेदनेशी व वर्तुणुकीशी, जीवनशैलीशी जोडताना बबन धुमाळ यांनी संबधीतावर ताशेरे ओढून आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. जीवनमुल्य, नितीमुल्य हरवत चालल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. 
         सामाजिक - राजकीय स्थितीगतीवर भाष्य करताना निरीक्षण शक्ती, अभिव्यक्तीचे सामर्थ्यही बेधडकपणे व्यक्त झाले आहे.
              मला ना आवडे असला जगाचा न्याय उलटासा 
               गुरूला चालवी पायी जिथे गुंडास हत्तीवर
निवडणुकीतील पोकळ अश्वासने, फसवणूक यावरही लिहताना......
                 कर्जमाफी बातमी तू छापली राजा 
                 का दिले हातात नुसते आमच्या गाजर
अस्सल गझल लेखनातील अनुभूतीचा रागरंग, निसर्ग प्रतिमेतून व्यक्त होताना....
                 मागुन काय मागावे आता फुलांनी मागावुनी 
                 मावळतीच्या उन्हातले क्षितिजाचे रंग फिके फिके
               मागण्यांच्या पलीकडचे भावसौंदर्य उत्कट शब्दांनी दाखवून दिले. पावसाला उद्देशून केलेली गझल करूणरस, आर्त भाव दर्शविते.
              जन्म गेला राबता शेतात माझा 
               सोसवेना धोरणाचा मार आता 

               ना तुला बरसायचे तर एवढे कर 
                शेवटाचा पाठवावा हार आता

                                    अशी दुर्दैवी वेळ शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर येताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर समाज अस्वस्थ होतो पण सरकार जागे होत नाही ही वस्तुस्थिती पहावयास मिळते. गझलेतील प्रेमभावनाही नाजूक आणि भावसुंदर कल्पनांना साद घालते हुरहुर दर्शवते

                 एवढी जादू तुझ्या सौंदर्यात आहे 
                  नजर माझी हटत नाही भेटल्याविन

तारूण्यातील प्रेमभावना जपण्यासाठी करावी लागणारी धावाधाव 
           
   किती सहावा तिने दुरावा अतून थोडी दुखावतेही 
   न केस काळे तरी परंतू मनात आशा तरूण आहे

     ह्याच ओढीने एकमेकांना प्रेमाची - सहजीवनाची ताकद मिळते. ह्याच संदर्भात पुढची पायरी म्हणजे मिठीचा नेमका अर्थ पहा....
          छान वाटते मिठीत दंगलो सखे 
          पांघरून घे मलाच गार लागते

ह्या शब्दात शृंगारालाही सहज सजवून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर तिला कुणीही गृहीत धरले नसताना गझलकाराला मात्र
    करून ठेवील काय कोठे कधी कुणाला नसे भरोसा 
     म्हणून हाता धरून हाती मला सदा आवरीत गेली

यातून आत्मविश्वास, आपुलकी आणि प्रेम लक्षणीय ठरले. हाच सखा तिच्यासाठी माळरानातील फूल होऊन राहिला.
               कधीचा उभा मी इथे माळरानी 
                सखे मी तुझ्या रे फुलांचा फुलारी

                                        अशा एकूणच गझल लेखनात वेगवेगळ्या अनुभूतीचे भावविश्व ग्रामीण रंगढंगात सहजतेने तरीही उत्स्फूर्त व्यक्त झाले आहे. त्याशिवाय वास्तवतेचे प्रतिबिंब ही एक जमेची बाजू असून यातील भावभावनांना स्वानुभूतीचे कोंदण आहे. गझलकार बबन धुमाळ हे ग्रामीण विश्वातील प्रतिनिधित्व करीत असून अशा प्रकारे त्यांनी केलेले लेखन अपवादात्मक म्हणावे लागेल. या बाबतीत त्यांनी केलेला अभ्यास आणि व्यासंग यामुळेच त्यांची पुन्हा नव्याने गझलकार म्हणून ओळख झाल्याचे समाधान वाटते. ह्या गझल लेखनातील वेदनांचे बंध अभ्यासताना त्यांचे सुख, दुःख व्यथा, वेदना यांचेशी वाचक सहमत, समरस व एकरूप होऊन जातो हेही तितकेच खरे आहे. ह्या गझला निश्चितच वेदना आणि संवेदनांनी भावरुप झाल्या असून नवोदितांना प्रेरक, मार्गदर्शक ठरतात.
                          अभ्यासू जाणकारांना ग्रामीण जीवनाचा गझल लेखनाशी किती जवळचा संबंध येऊ शकतो हेही लक्षात घेता येईल. शेवटी एका विशेष गझलचा उल्लेख करताना गझलकाराची विनवणी सहृदय वाचकांना गलबलून आल्यावाचून राहत नाही.
          पुरे झाले अता हे शेवटाचे मागणे ऐका 
          सखीचा जन्मभर शाबूत ठेवावा पदर देवा 
..................................................................
प्रा.डॉ.मधुकर मोकाशी, दौंड, जि पुणे
मो नं. 9011565406
हे बंध वेदनेचे (गझलसंग्रह) 
गझलकार - बबन धुमाळ 
परीस पब्लिकेशन - सासवड, जि. पुणे. 
      

No comments:

Post a Comment