१.
उत्तररात्र अघोरी आहे
स्वप्नांची बळजोरी आहे
स्वप्नांची बळजोरी आहे
व्याकुळ झाली दोरी आहे
संपत आले जगणे अवघे
पाटी अजुनी कोरी आहे
पाटी अजुनी कोरी आहे
बोलायाला बंदी नाही
बोलायाची चोरी आहे
बोलायाची चोरी आहे
वेगवेगळे धारावाहिक
एकच त्यांची स्टोरी आहे
एकच त्यांची स्टोरी आहे
ना कोणाशी स्पर्धा माझी
माझ्यावर शिरजोरी आहे
माझ्यावर शिरजोरी आहे
२.
मी धुळीने माखलो, झाडा मला
काजळीतुन बाजुला काढा मला
काजळीतुन बाजुला काढा मला
भूक माझी आजही साधीसुधी
जा, शिळेपाके असो, वाढा मला
जा, शिळेपाके असो, वाढा मला
ढासळाया लागल्या भिंती जुन्या
खायला उठतोय हा वाडा मला
खायला उठतोय हा वाडा मला
त्रास देतो खूप झोपेलाच मी
रात्रभर कोठेतरी धाडा मला
रात्रभर कोठेतरी धाडा मला
फक्त रक्तातील साखर वाढली
गोड वाटू लागला काढा मला
गोड वाटू लागला काढा मला
सोडवत नाही अताशा गणित मी
येत नाही कोणता पाढा मला
येत नाही कोणता पाढा मला
सहन केले मी तयाचे बोलणे
ऐकवाया लागला पाढा मला
ऐकवाया लागला पाढा मला
स्वर्ग बोटे दोन उरलेली अता
द्या मला धक्का तिथुन पाडा मला
द्या मला धक्का तिथुन पाडा मला
३.
ठेच शब्दांसही लागली पाहिजे
अंतरीची व्यथा बोलली पाहिजे
अंतरीची व्यथा बोलली पाहिजे
धाडसाने तिला सर्व बोलेनही
एकदा ती पुन्हा भेटली पाहिजे
एकदा ती पुन्हा भेटली पाहिजे
शंभरावा गुन्हा वाट पाहे अता
एकदा मी सजा भोगली पाहिजे
एकदा मी सजा भोगली पाहिजे
खूप डोक्यावरी लोक घेतीलही
ती घडी फक्त सांभाळली पाहिजे
ती घडी फक्त सांभाळली पाहिजे
वाचणारे जिथे ऐकणारे जिथे
तेथवर ही गझल पोचली पाहिजे
तेथवर ही गझल पोचली पाहिजे
४.
पोचत नाही का देवाच्या कानावरती हाक अता
अजून अमुच्या आयुष्याचे रुतले कोठे चाक अता
अजून अमुच्या आयुष्याचे रुतले कोठे चाक अता
शाळेमध्ये पालक नुसता धिंगाणा घालत येतो
पोरांवरती गुरुजींचाही कुठे राहिला धाक अता
पोरांवरती गुरुजींचाही कुठे राहिला धाक अता
मनात येइल जेव्हा, तेव्हा फोन लावतो कानांना
कुठे पोस्टमन येतो दारी कधी न येते डाक अता
कुठे पोस्टमन येतो दारी कधी न येते डाक अता
सभागृहामध्ये त्यांना तर प्रश्न मांडण्या पाठविले
तोंड कधी जो उघडत नाही दाबा त्याचे नाक अता
तोंड कधी जो उघडत नाही दाबा त्याचे नाक अता
काळ जुना तो गेला निघुनी, झालेला इतिहासजमा
दूध पोळल्यावरती प्यावे फुंकुन फुंकुन ताक अता
दूध पोळल्यावरती प्यावे फुंकुन फुंकुन ताक अता
लाख चांगल्या कर्मांवरती एक चूक भारी पडते
बारिकसारिक चुकांकडेही नकोच डोळेझाक अता
बारिकसारिक चुकांकडेही नकोच डोळेझाक अता
रान उठवुनी ज्या मुद्द्यावर इतका मोठा झालेला
त्याच विसंगत मुद्द्यावरती वाजवितो तो बाक अता
त्याच विसंगत मुद्द्यावरती वाजवितो तो बाक अता
५.
किती जिभेला लगाम घालू
कुणाकुणाला सलाम घालू
कुणाकुणाला सलाम घालू
टुकार ही वर्तमानपत्रे
चुलीत रद्दी तमाम घालू
चुलीत रद्दी तमाम घालू
चुना कमी अन् चमन जरासा
अजून थोडा किवाम घालू
अजून थोडा किवाम घालू
लुटून लोकांस सांगती हे
भिका-यांस ना छदाम घालू
भिका-यांस ना छदाम घालू
मिठीत अल्ला मुठीत जीजस
दिठीत हे राम नाम घालू
दिठीत हे राम नाम घालू
तुपात घोळू जिभेस अपुल्या
दिव्यात त्या फक्त पाम घालू
दिव्यात त्या फक्त पाम घालू
..................................................
कालिदास चवडेकर
कालिदासजी, सुंदर गझला. वाह वाह! हे शेर सविशेष आवडले -
ReplyDeleteबोलायाला बंदी नाही
बोलायाची चोरी आहे
वेगवेगळे धारावाहिक
एकच त्यांची स्टोरी आहे
ढासळाया लागल्या भिंती जुन्या
खायला उठतोय हा वाडा मला
ठेच शब्दांसही लागली पाहिजे
अंतरीची व्यथा बोलली पाहिजे
धाडसाने तिला सर्व बोलेनही
एकदा ती पुन्हा भेटली पाहिजे
खूप डोक्यावरी लोक घेतीलही
ती घडी फक्त सांभाळली पाहिजे
वाचणारे जिथे ऐकणारे जिथे
तेथवर ही गझल पोचली पाहिजे
सभागृहामध्ये त्यांना तर प्रश्न मांडण्या पाठविले
तोंड कधी जो उघडत नाही दाबा त्याचे नाक अता
किती जिभेला लगाम घालू
कुणाकुणाला सलाम घालू
टुकार ही वर्तमानपत्रे
चुलीत रद्दी तमाम घालू
चुना कमी अन् चमन जरासा
अजून थोडा किवाम घालू
तुपात घोळू जिभेस अपुल्या
दिव्यात त्या फक्त पाम घालू