कैलास गांधी : पाच गझला


१.
सहजच्या बोलण्यातुनही तुझे भाषण दिसत आहे
तुझ्या वृत्तीत लपलेले छुपे धोरण दिसत आहे

तुला का लागली चिंता पिके बहरात येण्याची?
अरे! स्वप्नातही त्यांना तुझी गोफण दिसत आहे

म्हणे उंचावतो आहे जरा आलेख प्रगतीचा
कुठे आतुन होणारी उभी घसरण दिसत आहे?

दिला तू पेन वैतागुन जुना शाईच नसलेला
तरी हातात तुटलेले तुझ्या टोपण दिसत आहे

भले तू मोज बेलाशक गळाला लागले मासे
कुणी लावून बसलेला इथे रापण दिसत आहे

नवा बोलावतो रस्ता, पुन्हा मग ओढते मागे
घराला काय होणारी पुढे वणवण दिसत आहे?

दिल्या हुलकावण्या इतक्या, समजलो राहिला मागे
दमुन मी पोचलो शेवट, तिथे तो पण दिसत आहे

बिचारा शेवटी तो ही पळाला शेपटी हलवत
अशाने खिन्न वाड्याची उदासी पण दिसत आहे   

अजुनही भाकीते होतील उत्पत्ती कशी झाली
युगाच्या आज अंताचा समोरच क्षण दिसत आहे 

२.
हटून बसला होता इतका दारी दिवस
जा जा म्हणता जातच नव्हता काही दिवस

काळोखाची संततधार सूरू होती
कुठून आला मधेच मग अवकाळी दिवस ?

भलत्यावेळी कार जशी पंक्चर झाली
डोळ्यासमोर उडवत गेला गाडी दिवस

जमिनीवरले पाणी का पेटून उठले ?
लावत होता आभाळाला काडी दिवस

शरमेने तर नजर सुद्धा उठली नाही
बसून होती कोपऱ्यात ती तिन्ही दिवस

ऑफीसातही खुंट कुणाला खुपले का,
करून आला गुळगुळीत का दाढी दिवस ?

संध्याकाळी वातावरण भरून आले
दूर चालला होता कुठल्या गावी दिवस ?

वाटत होते रात्र आता संपूच नये
दावत होता तेव्हा कसली भीती दिवस ?

बघता बघता हलवत हात निघून गेले
शेवट उरला होता एकच हाती दिवस

३.
इथले सगळे डोंगर कोणी उष्टे केले?
नदीत दिसले हात कुणाचे खरकटलेले?

उधाणलेल्या दर्या तर गोंधळला होता,
कुठे नेमके न्यावे तारू भरकटलेले?

सुरुवातीला टुकारही अनुयायी नव्हता
कसे भेटले नंतर इतके खमके चेले?

उभे राहिलेल्यांना झोप अनावर झाली
उठून बसले कसेबसे पेंगत पडलेले

काय बाटलि आणखी एक रिकामी केली?
कसल्या धुंदित पुन्हा पुन्हा मग भरले पेले?

बोळकांडितुन पत्ता शोधुन शोधुन दमलो
समोर दिसले अखेरीस घर गुदमरलेले

कुणी स्वतःहुन वाट अडवली होती थोडिच,
स्वतःहून तर ते त्याच्या वाटेला गेले

वेळो वेळी सहज वापरून घेत असावा,
कपडे देतो खुशीत सगळे वापरलेले

खूप पुढे गेला का धावत, त्यांना सोडुन?
मागे फिरले सगळे का, मागे गेलेले?

४.
पद्धत माझ्या कामाची का पसंत पडते इतकी ?
एक दोन महिन्यांनी माझी होत रहाते बदली

आजकाल तर त्या बाजूला कुणीच फिरकत नाही
अधुन मधुन पण पडका वाडा उघडुन बघतो खिडकी

टाळुन जाते नजर नेहमि रंगवलेले चेहरे
लक्ष तरिही वेधून घेते बावरलेली मुलगी

कोण नेमके दर्याचे या रक्त उकळते आहे?
मिळालीत काठावर काही आज लाकडे जळकी

क्षणा क्षणाला स्टेशनला हा प्रश्न सतावत आहे
गर्दी पकडते ट्रेनला, की ट्रेन पकडते गर्दी?

बंडाची सुरुवात म्हणू की परंपरेला चकवा?
शुभ्र मण्यांची माळ घालते, लावत नाही टिकली

एका हंड्यासाठी जर का गाव भांडते आहे
पुढे पुढे तर भांडण करतील फक्त रिकामी मडकी

५.
पिढ्यांपिढ्या जे शाबूत होते त्याला गेले तडे कसे?
कुणीच का हे सांगत नाही घर हादरले जुने कसे?

माना डोलवणारी गर्दी बोलवली आहे कोणी,
परिट घडीचे कपडे घालुन इतके जमले बघे कसे?

वर्गामधली मक्तेदारी मजबुत आज कशी झाली
मॉनीटर होता होता मग नेते झाले टगे कसे?

एक पान पडल्याने पूर्वी आरपार फाटत होती
शिकारीत वाघाच्या आता नाव निघाले पुढे कसे?

कपडे नव्हते त्यांना नव्हती फिकीर नंगे असल्याची
कपड्यांनीच हा बाऊ केला अजुन हे नागडे कसे?

नावडतीचे मीठ अचानक खारट आज कसे झाले
आवडतीच्या जेवणात अन चार मिळाले खडे कसे?

इथे पुरावा शिल्लक राहिल असे काय शिजते आहे,
नॉनस्टीकचे सापडले मग खुडबुडताना तवे कसे?

सुरुवातीला वग रंगवला कुबड्यांनी आधाराचा
नाटक केले बेमालुम मग स्वतः रहावे उभे कसे

स्वतःचीच प्रतिमा जपणारी काच तडकली होती का,
क्षणात दुस-या गोंधळलेले फुटले मग आरसे कसे?

.............................................
कैलास गांधी

No comments:

Post a Comment