विशाल ब्रह्मानंद राजगुरु : चार गझला


१.
वाटला दुःखी जगाने टाळल्यानंतर
पण सुखी झाला स्वतःला भेटल्यानंतर

शूर तो आहे किती? जर माहिती नाही
भेट मग जमल्यास दारू प्यायल्यानंतर

हीच चिंता बळ असावी मायबापाचे
काय होइल लेकरांचे आपल्यानंतर?

रात्रपाळीने जगाशी तोडले नाते
जाग येते पण दिवस अंधारल्यानंतर

एकटेपण फारसे नाही छळत आता
पुस्तकांशी रोज गप्पा मारल्यानंतर

वाटते गर्दीत सुद्धा फार एकाकी
माणसांमध्ये नकोश्या थांबल्यानंतर

वेदना जी काल समजावून सांगितली
ती कळाली ठेच त्यांना लागल्यानंतर

तो फुले जपतोय आता फार प्रेमाने
शेवटी पायात काटा मोडल्यानंतर

२.
जमेल तितके हसू स्वतःचे वाटत गेलो लोकांना
हेच असावे कारण की मी जमवत गेलो लोकांना

अखेर कंटाळलेच ते अन निघू लागले हळू हळू
तेव्हा कळले दुःख उगाचच सांगत गेलो लोकांना

एकटे पणा हवा वाटला इतकी गर्दी झालेली
वजा करत बसण्यापेक्षा मग भागत गेलो लोकांना

नजर न लागो ह्या भीतीने माझेही चुकलेच जरा
लोकांपासुन मीही माझ्या लपवत गेलो लोकांना

समजेनासे झाले होते काही केल्या लोक मला
डोळ्यांमध्ये डोळे घालत वाचत गेलो लोकांना

३.
चालत नाही बोलत नाही गप्पा मारत नाही
कुणीच येथे हृदयाचा दरवाजा उघडत नाही

मीच खरातर वाया गेलो आहे हे कळल्यावर
कुणीच आता मला येथला टुकार वाटत नाही

शहरामधल्या लोकांना गावाची ओढ भयंकर
अन गावाच्या गावकऱ्यांना गावी करमत नाही

शहरामध्ये वावरताना हे लक्षात असावे
चालाखीच्यापुढे तिथे कष्टांना किंमत नाही

नका विचारू मला कुणी की कसे वाटते आहे?
बरे वाटण्याइतके येथे बरेच वाटत नाही

मीच इथे माझ्या जातीला श्रेष्ठ मानतो आहे
मीच तरी म्हणतो आहे की जाती पाळत नाही

दिवसा बघीतलेली स्वप्ने अंकुरल्याच्यानंतर
मी रात्रीला चुकून सुद्धा स्वप्ने मागत नाही

काजवा दिव्याला म्हणतो मी स्वयंप्रकाशित आहे
दिवा म्हणाला तुला कुणी मग का ओवाळत नाही?

धुक्यात अडकू नकोस, दिसले जरी तुला ते सुंदर
वाट लागते अशी त्यात की वाट सापडत नाही

४.
मला पाहुनी जखम एवढी का भळभळते आहे
सांग कोणत्या आठवणीची खपली निघते आहे?

बरे वाटते आहे अगदी बरे वाटते आहे
तुझ्या मिठीने एकाकीपण पूर्ण उपसते आहे

मला वाचवा मित्रांनो वाहून चाललो आहे
डबडबलेल्या डोळयांनी ती मला पाहते आहे

अशीच अंधारात येत जा दिवा होउनी माझा
तुझ्या हसूने माझे घर आतून उजळते आहे

वाऱ्या इतका वेग कमी केला आहेस कशाला
पायांना ह्या धुळीकणांची व्यथा टोचते आहे

.............................................
विशाल ब्रह्मानंद राजगुरु

No comments:

Post a Comment