हेमलता पाटील : पाच गझला


१.
रात्रभर तिच्या सोबत जागे असतात म्हणे
विरहामध्ये तारे सुद्धा जळतात म्हणे

अडवून किती ठेवतील त्या बळजबरीने
धरणाच्याही भिंती ओल्या खचतात म्हणे

भरकटलेली,दुरावलेली जरी पावले
सायंकाळी घराकडे ती वळतात म्हणे

संकट समयी चमकतात हे काजवे कसे?
दिवसा ढवळ्या अश्या चांदण्या दिसतात म्हणे

कुणास चुकले सुख दुःखाचे वादळवारे
उठतात तशी पुन्हा वादळे शमतात म्हणे

ओळखता का खरेच येते अशी थोरवी?
पाय पाळण्यातच बाळाचे दिसतात म्हणे

मुरवायाला वेळ द्यायला हवा पुरेसा
लोणच्यापरी चविष्ट नाती टिकतात म्हणे

२.
एक निघाल्यावर दुसराही फसतो आहे
दलदलीतुनी पाय कुठे हा निघतो आहे

सुन्न डहाळी हलताना का दिसते आहे?
आठवणींचा पक्षी बहुधा झुलतो आहे

सांत्वन त्यांचे कसे करावे मला कळेना
अश्रू अश्रू हमसून किती रडतो आहे

स्वप्न रेशमी, सुखे मखमली माझ्याभवती
पण तू नसल्याचा काटाही सलतो आहे

आकांत तिचा उरात टाहो फोडत आहे
मौनामधुनी एक उसासा झरतो आहे

स्मृती नकोशी दरवाज्यावर असेल आली
उघडायाला म्हणून तो कुरकुरतो आहे

बाहेरूनच डोकावत तो निघून जातो
एक कवडसा मनास माझ्या छळतो आहे

३.
अशीच वरवर भुरभुर करुनी गेला सुद्धा
आर्त व्यथेचा भिजला नाही शेला सुद्धा

दुःख नशेने चूर होउनी बोलत होते
व्यथा ऐकुनी रडला होता पेला सुद्धा

नवी नेहमी फक्त पाहिजे चव जीभेला
आकर्षित मग करतो साधा ठेला सुद्धा

पोवाडे गाऊन शुरांना वंदन केले
कठीण समयी वार उरावर झेला सुद्धा

उभा जन्म तो मुकाट ओझे वाहत होता
कुणास कळले नाही केव्हा मेला सुद्धा

गुरू राखुनी डाव ठेवतो अपुल्यापाशी
माहित असते वरचढ ठरतो चेला सुद्धा

मी कष्टाने कमावली ही धन संपत्ती
बाप ठेउनी गेला नव्हता ढेला सुद्धा

४.
जशी चालेल डोंबारी चिमुकली पोर तारेवर
तसे कापेल हिमतीने जिण्या मरणातले अंतर

थवा उतरून पक्ष्यांचा टिपाया लागला दाणे
सडा सोडून उरलेला उडाला पोट भरल्यावर

जरी पत्ता न मी हुकमी भले असणार बिनकामी
तरी हा पलटतो बाजी पुन्हा पत्त्यातला जोकर

कडू वाटे जगाला मी कधी जर सत्य वदले तर
म्हणूनच मी शिकत आहे जिभेवर ठेवण्या साखर

दळाया लागते आई जसेही धान्य जात्यावर
तिच्या ओवीतुनी येते व्यथा आतील ओठावर

तिची नुकतीच पन्नाशी स्वतःमध्ये जरा रमली
जगाने घेतली हरकत तिच्या स्वच्छंद जगण्यावर

समजती लोक पुर्वीची,तशी कमजोर नाही मी
मला बलवान करते आपल्यांची नेहमी ठोकर

५.
तुझ्या नभातल्या छटा निहाळते हळूहळू
मनातल्या मनात त्या चितारते हळूहळू

तुझ्या स्मृती,तुझे तरंग वाटती हवेहवे
निहाळते,सुखावते,स्थिरावते हळूहळू

भिडे पहाट गारवा तशी शहारते किती
तुलाच पांघरून मग उबारते हळूहळू

असून सूर्यही नभी,धुके कितीक दाटले
दिशा दिशा तुझ्यामुळे प्रकाशते हळूहळू

मनास मारुनी किती निभावलीत बंधने
तुझ्यामुळेच ती अता झुगारते हळूहळू

कळीस स्पर्शिताच तू उधाणते मनात ती
फुलारते हळूहळू सुवासते हळूहळू

दिव्यास मालवून ही तरूण रात जाहली
तुझ्याच चांदण्यास ती पुकारते हळूहळू

.............................................
सौ. हेमलता पाटील.

No comments:

Post a Comment