रमेश अरुण बुरबुरे : चार गझला

Image may contain: 1 person, standing, beard and outdoor

१.
खरी विश्वशांती जगी आणणारा
मिळो पिंपळाची बिजे लावणारा

नको युद्ध आम्हा हवा बुद्ध आहे
उभ्या या जगाला अता तारणारा

अहिंसा असू दे उरी आपल्या तू
अशी मानवाला दिशा दावणारा

असो कार्यकर्ता सदा जिंकणारा
रणी कोणत्याही नको हारणारा

हवे उंच डोके नभाच्या दिशेने
कुणाही पुढे तो नसो वाकणारा

२.
काळजाची कापणी कर
मग धुऱ्याची वाटणी कर

कोठुनी धोका पिकांना
कुंपणाची राखणी कर

कोण अपुले कोण परके
एवढी तू.....चाचणी कर

खूप झाले.....लाड त्यांचे
संगराची.....आखणी कर

बंदुका...भरपूर झाल्या
पुस्तकांची...मागणी कर

३.
हे ढगा देऊ नको तू चाट आता
लोचनी उसळेल माझ्या लाट आता

वावराला लांघुनी पाऊस जातो
पाळतो ढगही बघा ना बाट आता

टाकले गर्भात मातीच्या बियाणे
लावतो पाण्याविना का वाट आता

फेडणेही शक्य नाही व्याज यंदा
मुद्दलाला फक्त बाकी ताट आता

आसवांनी शक्य असते सिंचने तर
पाहिली नसती मृगाची वाट आता

जे मला बोलायचे ते बोललो मी
पाहिजे तर मान माझी छाट आता

.
शांत बसण्याचा नव्हे हा काळ पोरी
लेखणीचा वारसा सांभाळ पोरी

नाळ मातीशी असू दे घट्ट अपुली
गाठले जर तू कधी आभाळ पोरी

पाहिजे लावायला झाडे धरेवर
जर नको आहे तुला दुष्काळ पोरी

बुद्ध तत्वाने लढावी तू लढाई
चाकुचा उपयोग करणे टाळ पोरी

जाहले चवदारचे दूषित जलाशय
स्वच्छ करण्या काढ तिथला गाळ पोरी

जग पुरे जिंकायचे आहे तुला तर
आतमधल्या मी पणाला जाळ पोरी

जीवही गेला तरी चालेल पण तू
भीमरायाच्या प्रतिज्ञा पाळ पोरी

शोध हक्‍काचा असा खांदा इथे अन
आसवे बिनधास्त त्यावर ढाळ पोरी


जीवनी दुःखावरी या मात करण्‍या
बुद्‍ध आणिक धम्‍म आधी चाळ पोरी

.............................................
रमेश अरुण बुरबुरे
रा. निंबर्डा, पो. शिरोली
ता. घाटंजी, जि. यवतमाळ
पिन कोड ४४५३०१
मो नं ९७६७७०५१७०/
         ९८३४६९२८५१
burbureramesh@gmail.com

No comments:

Post a Comment