लतिका चौधरी : तीन गझला


१.
मनाचा सातबारा मी,अता केला तुझ्या नावे
कधी वाट्यात माझ्या तू,किती येतो कुणा ठावे

मनाची मौज केली तू,जगी चौफेर नाचूनी
धरुनी आस मी नयनी,उभे आयुष्य वेचावे

जरासा सूर्य कलल्यावर,मनाची तार छेडावी
गुलाबी भाव मी माझे,जरा शब्दात गुंफावे

फुलावा सोनचाफा हा,मनाच्या प्रांगणी माझ्या
ऋतू येवो ऋतू जावो,क्षमेने पुष्प अर्पावे

किती रे धावशी पळशी, तुझ्या छायेस सोडूनी
इथेची पूर्ण तू होतो, कसे काही न उमजावे      

२.
असावा गर्व देशाचा,समाजा भान ठेवावे
मिळावा न्याय सर्वांना,नको उजवे नको डावे

मते द्यावी मते घ्यावी,नको बाजार आत्म्याचा
छुप्या बोली लिलावाच्या,अशा जागी कसे जावे

दिली आश्वासने त्यांनी,पदाचा मोह जोडीला
गळाला लागली जनता,जगाने नेत्र खोलावे

जगी या बेइमानीच्या, कुठे फिर्याद मांडावी
अता माझ्याच हक्कावर,बघा ते सांगती दावे

बघावे स्वप्न क्रांतीचे,रुजावे ध्येय शांतीचे
यशस्वी भारताचे ते ,तिरंगी ध्वज फडकवावे

३.
भोवताली लावली बघ आग पोरी
जाळली जातील स्वप्ने जाग पोरी

जीवनाचा काय तो वैशाख झाला
आज तू आषाढ ओला माग पोरी


अंबरीच्या चांदण्या का ध्वस्त झाल्या
काळजीने तू जपावी बाग पोरी

आतल्या त्या तूच तूला  भेट द्याया
आरशावर मग नको तो डाग पोरी

रंग हिरवा अन गुलाबी हाच यावा
खेळशी होळीस ऐसा फाग पोरी

माळते केसात गजरा तो सुगंधी
चंदनी गंधात राही नाग पोरी

बोलते आता, उगा ते प्रश्न लोका
उत्तरे देणेच टाळू लाग पोरी
.............................................
लतिका चौधरी
दोंडाईचा ,जि. धुळे

No comments:

Post a Comment