अविनाश विनायक येलकर : पाच गझला




१.
मी तिच्या डोळ्यातले वादळ कसे सावरू,
पापण्यांना आवरू की आसवांना धरू.

टांगला सदरा तुझा गोठ्यात बाबा तरी,
घास चा-याचा न घेवू लागले वासरू.

वाटते सुंदर गुलाबाहूनही ती मला
सांग गजरा मी तिला कुठल्या फुलांचा करू.

लेकराची पाठ शिल्लक राहिली तेवढी,
पोट तर खाल्ले भुकेने कातरू कातरू.

आपल्या घरच्या स्त्रिया बंदिस्त ठेवू घरी,
पिंज-याचे दार बस चित्रात उघडे करू.

वासना दिसते तुला पण भूक आहे तिची,
लागले सांगू तिच्या पायातले घुंगरू.

जोडतो मी हात बाबा फास घेवू नका,
वेळ आली जर तशी आभाळही नांगरू.

२.
पोट नाही कधी भरलेच वावरावर;
खर्च कोठून मी करणार पुस्तकावर.

या विचारात असते माय जागतांना;
बाप घेणार का गळफास झोपल्यावर.

जाहलो शुष्कपाणा सारखा तरीही;
थाटला मी सुखी संसार वादळावर.

केवढे दुःख माझे जातिवंत होते;
जन्मभर थांबले माझ्याच कुंपणावर.

तू मला सोडले अन् वाढला पसारा;
जाहली केवढी बघ धूळ काळजावर.

३.
चेह-याने जरी आबाद वाटते ती,
वेदनेच्या कळ्या गज-यात माळते ती.

एवढा मी तिच्या डोळ्यात साठलेला,
रोज थोडे मला अश्रूत गाळते ती.

हे तिचे लाजणे आहेच जीवघेणे,
त्यात नजरेतही खंजीर ठेवते ती.

सुर्य आहे तिचे मी क्षितिज व्यापणारा,
तारकांच्या मला गर्दीत मोजते ती.

भेटलो जर पुन्हा होतील खोल जखमा,
याचसाठी मला मुद्दाम टाळते ती.

भेटतो का कुठे गझलेत अंश माझा,
सारखी मग मला मक्तयात चाळते ती.

४.
बागेतल्या कळ्यांचे फुलणे उगाच नाही,
मग त्यात भोव-याचे फिरणे उगाच नाही.

टाळायचे मला हे आधीच ठरविलेले,
इतके तिचे बहाणे करणे उगाच नाही.

केव्हा तरी मनाचा होतीस तूच सागर,
माझे तुझ्या किनारी बसणे उगाच नाही.

इतके कधी कुणीही टाळू नये कुणाला,
माझे तुझ्या सभोती असणे उगाच नाही.

लचके तुला सुखाचे तोडायचेत माझ्या,
दारी तुझे गिधाडा बसणे उगाच नाही.

५.
घे लक्ष्य पाहिलेले जिंकून या क्षणाला;
थोडीच वाट बाकी तू थांबतो कशाला.

सोडून जायचे तर आत्ताच हो रवाना;
चिंता करू नको मी सांभाळतो स्वतःला.

उधळून टाकलेला संसार पाखरांचा;
नाही कधी कळाला उन्माद वादळाला.

दाटून रोज येती डोळ्यात गच्च अश्रू;
तळमळ कधी मनाची कळणार पावसाला.

सारेच रंग येथे झालेत जीवघेणे;
केसात सांग माळू मी कोणत्या फुलाला...!

...........................................................

अविनाश विनायक येलकर
मु.पो.घुसर, ता.जि.अकोला
मो.- 8698209390

1 comment:

  1. अविनाशजी गझला छान झाल्या आहेत. हे शेर विशेष आवडले -

    जोडतो मी हात बाबा फास घेवू नका,
    वेळ आली जर तशी आभाळही नांगरू

    सोडून जायचे तर आत्ताच हो रवाना;
    चिंता करू नको मी सांभाळतो स्वतःला.

    ReplyDelete