डॉ. शुभा प्रशांत लोंढे : दोन गझला



१.

मीच माझ्या वेदनांचे गीत होते.
वाटलेले दुःख शब्दातीत होते

आजही आवर्त का माझ्या मनाचे
वेदनांच्या जाणिवा जनरीत होते

वाट जेव्हा सापडे, स्वर व्यक्त होतो
हे खरे सृजनातले संगीत होते

घेउनी काळीज जेव्हा मी फुलांचे
वाटले फुलपंख मी उधळीत होते.

काळ पोखरतो कसे घर पाखरांचे  .
दुःख झालेले तसे वस्तीत होते.

लाख प्रश्नांचेच तांडव आज झाले
उत्तरांचे प्रश्नही गणतीत होते

वेदनांच्या मौक्तिकांचा शोध घेता
वेदनांचे शिंपले भरतीत  होते.

२.

सोसणे टळलेच नाही
टाळणे कळलेच नाही

भान आहे आरशाचे
मुखवटे जमलेच नाही

लाभलेले सुख कसे मी
ओंजळी भरलेच नाही

ओल नात्यातून जपली
फसवणे पटलेच नाही

आयुष्याची सांज झाली
चांदणे सजलेच नाही

.............................................
डॉ. शुभा प्रशांत लोंढे,
आनंद नगर, पुणे

No comments:

Post a Comment