सुरेश भटांच्या गझलेतील वेगळी , मनमोकळी आणि लाघवी स्त्री : किरण शिवहर डोंगरदिवे

                                suresh bhat साठी इमेज परिणाम
                                             सुरेश श्रीधर भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी, त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे 15 एप्रिल 1932 रोजी झाला। मराठी कवितेला नवीन वळण देणाऱ्या अग्रणी कवी मध्ये त्यांचे नाव घ्यावे लागते. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.असे एके ठिकाणी मी वाचल्याचे आठवते. त्यांच्या गझला व कविता लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत.

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे 


महाराष्ट्राच्या काव्य प्रदेशांमध्ये खऱ्या अर्थाने गझलेला मानाचे स्थान मिळवून देणारे कवी म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्या रचनेतील स्त्री गझल प्रमाणेच नजाकत आणि सौंदर्याने भरलेली असणार यात शंका नाही. पण सुन्या सुन्या मैफिलीत सारख्या गझल मधून सुरेश भटांनी घटस्फोटिता किंवा परितेक्त्या यांचे दुःख जाहीरपणे मांडले. नवऱ्याने टाकून दिल्यावरही स्त्रीच्या मनामध्ये तिच्या मोडलेल्या संसाराबद्दल, सोडलेल्या घराबद्दल आणि ज्याने टाकून दिले त्या नवऱ्या बद्दलच्या एकत्रित भावना सुरेश भटांनी नेमक्या शब्दांमध्ये टिपलेल्या आहेत. संगीतकार कोण? गायक कोण? आणि ज्यांच्यावर चित्रित केलेली आहे ती अभिनेत्री कोण? या सर्वांचा विचार बाजूला ठेव नेमकेपणाने स्त्री जातीच्या मनोभावना व्यक्त करताना सुरेश भट नेमकी ठसठसणाऱ्या वेदनेवर बोट ठेवून फिर्याद करणाऱ्या शब्दात विचारता ते सरळ अंगावर येणारे दुःख असते.

उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आजर्वे तू 
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे 



पुरुषाच्या मनामध्ये प्रेमाचा सागर असला तरी त्यातील किती थेंब स्त्रीच्या वाट्याला येतात विचार करायला प्रवृत्त करतात. सुरेश भट यांच्या रचनेतील स्त्री खऱ्या अर्थाने बेडर आहे,असेही कधी कधी जाणवते. कवी आणि लेखकाची एकूण जीवन पद्धती जगण्याची भिडण्याची रीत बेडर आणि बिनधास्त तितकीच त्यांच्या साहित्यामधील पात्र सुद्धा बेडर आणि बिनधास्त असतात असे मला पहिल्यापासून वाटते. म्हणूनच सुरेश भटांच्या रचनेमध्ये सुद्धा ती बिनधास्त आणि धाडसी आहे, नव्हे ती तशी असायलाच हवी,
निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच

या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी एकटीच आलेली ही तरुणी निश्चितपणे आपल्या प्रियकराला भेटते आणि आपण एकटेच आले मोठ्या हिमतीने त्याला सांगतो. दिव्यांना कळलावे म्हणणे ही एक सुंदर उपमा याठिकाणी वाचायला मिळते, दिवा म्हणजे प्रकाश त्यापासून काय लपणार... ?? त्याच्यापासून काही लपणार नाही आणि तो सर्वांना सांगणार अशा अर्थाने ज्यांनी कुणी आपल्याला पाहिले असेल त्यांची पर्वा न करणारी ही स्त्री आहे.

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून

                          परत निघताना अजून आपले घरची जागे झाले नसतीलच याची तिला खात्री आहेच पण आपली अंगणातली तुळस मात्र आपल्यावर नाराज झाली असेल असे सुद्धा तिच्यातील पापभिरू स्त्रीला वाटते. एकाच वेळी बेडरपणा आणि पापभिरूपणा अश्या एकत्रित भावना सुरेश भटांच्या कवितेमधून स्त्री व्यक्त करते. सुरेश भटांनी आणीबाणीच्या काळामध्ये जी परिस्थिती होती ती आपल्या कवितेमधून मांडण्याचे लक्षात येते. उषःकाल होता होता ह्या प्रसिद्ध रचनेमध्ये ते म्हणतात, ‘जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला’, ‘कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली’, ‘देवकीचा पान्हा दुधाने जळाला’ या ओळींमधून मातृत्व कधीकधी कसे शापित ठरते, कर्तुत्ववान स्त्रीला किती वेगळ्या स्तरावरून संघर्ष करावा लागतो असेच जणू कवींनी वरील ओळीतून सुचवले आहे असे वाटते. दीपदान या कवितेमध्ये तर सरळ सरळ आणीबाणीच्या काळातील राज्यकर्त्या स्त्री सोबतच सुरेश भटांनी संवाद साधला आहे. अर्थात ही स्त्री कोण हे मी सांगणे गरजेचे नाही. मात्र हातात सत्ता असलेली स्त्री आपल्यासमोर उभी आहे आपण तिच्यासमोर फिर्याद करतो आहोत अशीच जाणीव ही कविता वाचताना सामान्य माणसाला होते.

तुझ्यापुढे न्यायदेवतेने कबूलही पिंजऱ्यात केले-
'तुझ्या चुका वंदनीय होत्या! तुझे गुन्हे पुण्यवान होते

                सत्तेपुढे न्यायदेवता सुद्धा प्रसंगी झुकते की काय? इतकी भयावह स्थिती आणीबाणीच्या काळात होती. त्यांनी केलेली प्रत्येक चूक ही पाठीशी घातली जात होती.

घरोघरी हीच एक चर्चा- तिचे घराणेच राजवंशी!
(जिते न जे बंडखोर ज्यांचे भिकारडे खानदान होते)

अम्हास फिर्यादही खुनाची तुझ्यापुढे आणता न आली
तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते.

अगदी तिच्यापर्यंत फिर्याद न्यावी कशी असा प्रश्नही तत्कालीन काळामध्ये सर्वांना पडलेला होता कारण तिच्या पर्यंत पोहोचवणारे लोक ती फिर्याद सुद्धा व्यवस्थित पोहोचू देत नव्हते. खूप वेगळ्या अंगाने आणि सुचक शब्दातून सुरेश भट आणि तत्कालीन राज्यकर्त्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशीच संवाद साधण्याचे आणि त्यांचे आपल्या शब्दात शब्दचित्र रेखाटले आहे असे आपल्या लक्षात येते. सुरेश भटांनी आपल्या गझलेतून भारतीय समाजव्यवस्थेतील स्त्रियांची घुसमट सुद्धा शब्दांकित केली आहे .

गडे मला बोलता न आले, कुणी कुणी बोललेच नाही
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले

                         अव्यक्त भावना आणि लोकलाजेमुळे होणारी घुसमट ही स्त्रीच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आलेली असतेच नेमका तोच धागा पकडून त्यांनी आपल्या गझले मधून तो भाव व्यक्त केला आहे.

जरी ओठांवरी येती नभाचे शब्द स्वच्छंदी,
मला बोलायची बंदी तुला ऐकायचे बंदी!

कसा घ्यावा तुझ्यापाशी विसावा श्रांत चंद्राने?
तुझ्या डोळ्यात स्वप्नांचा उभा वाडा चिरेबंदी!!

                   अशा शब्दांमधून भारतीय समाजातील स्त्रियांच्या अव्यक्त घुसमटीची कोंडी सुरेश भटांनी जाहीर करत पुरुषप्रधान संस्कृतीला काही अपरिरिहार्य प्रश्न विचारून निःशब्द केले आहे.

जरी दारा पुढे आकाश आले, तुला अद्याप चिंता अंगणाची ;
मला येतात भूमीतून हाका.... उठे सीता नव्या रामायणाची!

                           खरे म्हणजे पारंपारिक रूढी परंपरा सोडून स्त्रियांनी जगण्याच्या नव्या संघर्षाला सामोरे गेले पाहिजे, अग्निपरीक्षा आणि वनवासात जाणारी सीता किंवा भूमीमध्ये गडप झालेली सीता जमिनीमधून पुन्हा उठून बाहेर आली पाहिजे आणि तिने ह्या पुरुषप्रधान संस्कृतीला सामोरे गेले पाहिजे आणि स्वतःचा न्याय स्वतः मिळवला पाहिजे असेच जणू कवीला सुचवायचे आहे.

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

अशा प्रणय गंधित शब्दांमधून प्रियकराला सरळ सरळ आवाहन करणारी स्त्री अभिसारिका बनून सुरेश भटांच्या गझलेमधून मधून रसिकाला कधी आकर्षित करते. तर कधी,

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

                   अशा अलवार प्रणयसूचक शब्दांमधून सुरेश भट यांच्या कवितेतील स्त्री निर्मळ आणि नितळ प्रेमभावनेचा राग आळवत असते त्याच वेळी सीमेवर देशासाठी लढणाऱ्या एखाद्या वीर शहीदाचे कलेवर समोर पाहून त्याची विधवा तरुण पत्नी काय विचार करत असेल याबाबत कल्पना करून सुरेश भटांनी जी रचना केलेली आहे तिला खरोखर मराठी साहित्यातच नव्हे तर वैश्विक साहित्य सुद्धा तोड नसावी. वरवर पाहता धुंद प्रणयगीत वाटणारी ही रचना म्हणजे सुरेश भटांच्या लेखणीचे सामर्थ्य दर्शवणारे गीत आहे.

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे.
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

आपल्या सख्याचे कलेवर समोर असताना तिच्या मनातील आक्रंदन नेमक्या शब्दांमध्ये मांडण्याचे काम कवीने या रचनेमध्ये केलेले आहे. याठिकाणी त्या कुशीवर वळले म्हणजे जन्ममरण अशा दोन बाजू गृहीत धरून त्या कुशीवर म्हणजे मरणाच्या बाजूने असे तर कवीला सुचवायचे नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो.

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

मी जिवंत असताना तू निघून जाणे हे नक्कीच जास्त नाही असे म्हणून ती पुढे म्हणते

ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे. 



अनेक दिवसांपर्यंत या रचनेला मी एक प्रणयगीत म्हणूनच ऐकत आलो आणि दाद देत गेलो मात्र कधीतरी एकदा या गीताचा अन्वयार्थ मृत्युमुखी पडलेल्या सैनिकाच्या विधवेच्या आलापाशी आहे असा उल्लेख एका ठिकाणी वाचला तो वाचून मीही त्या दृष्टीने या गझलेचा विचार केला आणि सुरेश भटांच्या प्रतिभाशक्तीचा वेगळाच पैलू मला गवसला. कृष्ण आणि राधा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू या अनुषंगाने राधा या कवितेमध्ये कृष्णाच्या बरोबरीने राधेचे व्यक्तिचित्रण सुरेश भटांनी अगदी साध्या आणि सोप्या शब्दात केले आहे.

कृष्ण देह राधा बाहू, कृष्ण राई राधा कुहू!!
कृष्ण भाल राधा बिंदी, कृष्ण हात राधा मेंदी!!

                    थोडक्यात कृष्णाशिवाय राधेला आणि राधे शिवाय कृष्णालाही पूर्णत्व नाही, स्त्री-पुरुष समसमान आहे असेही या रचनेतून सुरेश भट सांगतात. माहेरवाशीण गझलेमध्ये मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं असे म्हणतानाच कधीतरी अचानक एखाद्या कडव्यात -

लदबदल्या आवळीस अजून तीच घाई गं
चिमणीच्या दातांची चव अवीट बाई गं


अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
अजून तुझ्या डोळ्यातले मोठेपण कवळे गं!!

अशा शब्दात माहेरपणाला आलेल्या नवतरुण यांचे मनोभाव, जुन्या नव्या आठवणी, वयानुरूप आलेला अल्लडपणा इत्यादी शब्दात मांडून सुरेश भटांनी त्या माहेरवाशिणी कायमस्वरूपी सजीव केलेल्या आहेत. मोहोर, मधुराणी अशा रचनांमधून सुद्धा जाणिवा गडद करणारे कवी भाऊबीज या कवितेमध्ये मात्र कमालीचे अस्वस्थ होतात. बहिणीची आठवण आल्यावर ते म्हणतात, 

कसे बहिणीचे नाते कशी बहिणीची माया,
ओवाळणी मागतसे सालभर भांडूनिया

परक्या नगरात बहिणी पासून दूर असणारा कवी परक्या नगरातील सर्व स्त्रियांना बहिणी समान मानतो मात्र तरीही स्वतःच्या बहिनीची आठवण त्याला तीव्रतेने येत यातच कवीचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःच्या बहिणी वरील प्रेम दोन्ही गोष्टी एकाच वेळी वाचकांच्या लक्षात येतात. भाऊबीज या बहिण भावाच्या सणा सोबतच संक्रात या स्त्रियांच्या महत्त्वपूर्ण सणाची सुद्धा दखल कवीने आपल्या कवितेत घेतलेली आहे. आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले अशा रचना कृष्ण वेड्या गोपिका आपले भाव प्रगट करत आहेत असेच वाचताना वाटते.
तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला;
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला.

                         गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना उद्देशून लिहिलेली सूर ही गझल लता मंगेशकर यांचा संघर्ष अधोलिखित करणारी सुंदर अशी रचना आहे. तितक्याच ताकदीने आशा भोसले यांच्या 60 व्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी केलेली रचना आशा भोसले यांचे व्यक्तिचित्रण करते,
तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो,
वार्धक्य तुझ्या जगण्याला असेच विसरत राहो ;

अमृतमय मद्याचा खळाळता अक्षय प्याला,
एकेक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवत राहो.

                             सुरेश भटांच्या गीतांना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे बोल लाभणे आणि आजही पूर्ण महाराष्ट्रात घराघरातून सुरेश भटांची गीते ऐकायला येणे ही सुरेश भटांची प्रतिभेची साक्ष आहे.
                        सुरेश भट यांचे एकंदरच जीवन हे बिनधास्त, मनात येईल तसे जगणारे, जीवनावर प्रेम करणारे, जीवनाचा आनंद देणारे, सौंदर्यासक्त स्वभाव सर्व गुणांनुसार त्यांच्या रचनेतील स्त्री हीसुद्धा जीवनावर प्रेम करणारी, प्रेमाला सर्वस्व मानणारी, पापभिरू असली तरीही तीतकीच बेडर आणि बिनधास्त आहे. सुरेश भटांच्या

 रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !

                  या ओळीप्रमाणे त्यांच्या कवितेतील स्त्री सुद्धा पूर्णपणे आगळीवेगळी आणि सर्व बंधनातून मोकळी स्वच्छंद जीवन जगणारी आहे हे निश्चितपणे मान्य करावे लागते.


.............................................. 
किरण शिवहर डोंगरदिवे,
समता नगर, वॉर्ड न 5, मेहकर 
ता मेहकर, जि बुलढाणा, पिन 443301
मो 7588565576



No comments:

Post a Comment