पंडित वराडे : तीन गझला

Image may contain: 1 person, outdoor

१.
समीप आली आयुष्याची संध्या बघता बघता
जगून घ्यावे इथे सुखाने जीवन सरता सरता

नदीकाठच्या झाडाखाली प्रेमी निवांत बसती
नकळत सरते रात तयांची गप्पा करता करता

पुन्हा एकदा दुष्काळाने डाव साधला कैसा
शेतकऱ्याची रात संपते अश्रू झरता झरता

काळ बदलला, जाते गेले, गाणे ओव्या सरल्या
स्वयंपाक तो होतो फिल्मी गाणे म्हणता म्हणता

किती करावी प्रपंचात या ऊर फुटेतो धडपड
उभा जन्म हा व्यर्थ जायचा पाणी भरता भरता

कर्म शिदोरी सोबत घ्यावी आयुष्याच्या अंती
शांत मनाने प्रवास व्हावा अंती निघता निघता

ऐक 'पंडिता' भले बुरे तुज अनुभव येती कैसे
सुख दुःखाची सांगड घालू जीवन जगता जगता

२.
हा कोणता नराला आजार होत गेला
मनुजात राक्षसाचा संचार होत गेला

औषध, खते, बियाणे, अन्  कर्ज सावकारी
डोळ्यापुढे बळीच्या अंधार होत गेला

काष्ठी, जळी, स्थळी जो हृदयात वास करतो
त्याच्याच दर्शनाचा बाजार होत गेला

चैतन्य, प्रेम, स्फूर्ती, फुंकर हळूच बसता
निस्तेज कोळशाचा अंगार होत गेला

स्त्रीच्या समर्पणाला दुबळी नकाच समजू
येता प्रसंग दुर्गा अवतार होत गेला

अधुराच पावसाळा, मालास भाव नाही
वैतागुनी बळी हा लाचार होत गेला

धिक्कारले प्रियेने, विश्वासघात केला
हृदयास वेदनांचा आधार होत गेला

कवितेत मांडले मी दुखास जीवनाच्या
माझा म्हणून का हो सत्कार होत गेला

जन्मास घातले अन् सांभाळले जयांनी
त्यांच्याच जीवनाचा का भार होत गेला

३.
डोळे मिटून कुठवर बसणार पांडुरंगा
केव्हा तुझ्या मुलांना बघणार  पांडुरंगा


जो भाबड्या मनाने वारीस नित्य येतो
त्याचे नशीब केव्हा फळणार पांडुरंगा

मातीत फेकले बी केवळ तुझा भरोसा
विश्वास सार्थ केव्हा ठरणार पांडुरंगा

पाहून वाट थकले हे नेत्र पावसाची
पाऊस सांग केव्हा पडणार पांडुरंगा

प्रत्येक स्त्री जनाई बनुनी तुलाच भजते
दुःखे कधी तिचे तू दळणार पांडुरंगा

'नारी न भोगदासी, पुजनीय मान तिजला'
केव्हा नराधमांना वदणार पांडुरंगा

दारात भक्त आले वीटेवरी उभा तू
भक्तांस भेट केव्हा घडणार पांडुरंगा

मी वीट पायरीची व्हावे, मनात आले
माझाच 'मी'पणा मज नडणार पांडुरंगा

आहे जसा तसा घे पदरात 'पंडिताला '
अंतीम ही मनीषा असणार पांडुरंगा

.............................................
पंडित वराडे, औरंगाबाद

No comments:

Post a Comment