विजय जोशी : दोन गझला

Image may contain: 1 person, smiling
१.
अन्यायाशी झगडत गेलो विचार केला नाही
आयुष्याचे पत्ते पिसले जुगार केला नाही

सुख दुःखाचे खडतर जीवन लढता लढता जगलो,
स्वार्थ साधण्या कुठेच खोटा प्रचार केला नाही

सत्य अहिंसा शांती नीती मनात भरली आहे,
घाव सोसले शत्रूचे पण प्रहार केला नाही

दोस्त भेटले भले बुरेही अनेक जागोजागी,
व्यसनांचा मी कधीच कोठे स्विकार केला नाही

प्रत्येकाचा धर्म वेगळा जात वेगळी येथे,
देव मानला माझ्यापुरता प्रसार केला नाही

निर्मळ जीवन झऱ्यासारखे देतच गेले मजला,
आनंदाने घेतच गेलो नकार केला नाही

२.
नको गर्व त्या उच्च पदी ते शाश्वत नाही,
डावी कडील शुन्यालाही किंमत नाही

पोटापुरते तसे अताशा उगवत नाही,
चक्रव्याढने कर्ज वाढते संपत नाही

रुसवे फुगवे हवेच थोडे दोघांमध्ये,
नसेल भांडण संसारी तर गंमत नाही

नकोस शोधू पळवाटा तू पराभवाच्या,
पाठ दावुनी पळून जाणे हिम्मत नाही

कितीक घे तू सुरेल ताना सुरावटीने,
विना भैरवी मैफिल काही रंगत नाही


प्रगती केली विज्ञानाने कितीक मोठी,
कुठून येतो मृत्यु अचानक समजत नाही

प्रश्नांची का उगाच जमते मांदीयाळी,
मनासारखे उत्तर येथे गवसत नाही !!

आठवणींनी शिवार सारे फळते फुलते,
तुझ्याविना बघ "विजू"स आता करमत नाही

.............................................
विजय जोशी
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२

No comments:

Post a Comment