रघुनाथ पाटील : चार गझला

Image may contain: 1 person, suit

१.
कुणाकुणाशी भिडावयाचे ठरवू नंतर
जगायचे वा मरावयाचे ठरवू नंतर

आधी त्याचा विनोद ऐकुन घेऊ मित्रा
रडायचे वा हसावयाचे ठरवू नंतर

आयुष्याशी मनासारखे चला खेळुया
जिंकायाचे,हरावयाचे ठरवू नंतर

पाठलाग करणा-याचा अंदाज येऊ दे
किती स्पीडने पळावयाचे ठरवू नंतर

फूल म्हणाले, ' जगास आधी सुगंध देतो '
सुकायचे वा गळावयाचे ठरवू नंतर

डोळे भरून सखयीच्या डोळ्यात बघू दे
बुडायचे वा तरावयाचे ठरवू नंतर

दिवस आमचे तरुणाईचे हुंदडण्याचे
प्रेम कुणावर करावयाचे ठरवू नंतर

गझलेचा अंगार साहण्या तयार होऊ
कायकाय मग लिहावयाचे ठरवू नंतर

२.
तुझ्याविना मी शून्य जाहलो जगात आता
आठवणींची रोजच वर्दळ उरात आता

मला मुखवटा कधी घालता येतच नाही
कशास ठेवू उगा आरसा घरात आता 


डोळ्यांमध्ये तुझ्या पाहुनी ओळखले मी
काय चालले आहे मित्रा मनात आता

काळोखाशी झुंज दिली तू प्राणपणाने
तुझ्याचसाठी सजली आहे प्रभात आता

दृष्ट कुणाची हिला न लागो हेच मागणे
गझल मराठी आली आहे वयात आता

हात दिला तू हाती मजला सर्व मिळाले
तुझ्याच नावे मीही केली हयात आता 

एक सावली तुझी पुरेशी जगण्यासाठी
खुशाल जावो सगळे जगणे उन्हात आता

३.
मी स्वतः ला आजही अज्ञात आहे
कोण होतो हे कुठे लक्षात आहे

कोंडला जातो तरी तक्रार नाही
देव ही हल्ली म्हणे मौनात आहे

पावसाळ्याचा उन्हाने घात केला
ही कशाची नेमकी सुरुवात आहे

चिंबतू झालीस पण मी पोळलेलो
श्नावणाचा यात मोठा हात आहे

जिकंण्यासाठी तयांना द्या शुभेच्छा
हारणे माझ्या कुठे रक्तात आहे

मी मनाला काय समजावू कळेना
ते तरी माझ्या कुठे ताब्यात आहे

तू कशाला वाचतो गुणदोष माझे
मी तसाही नेहमी वादात आहे

तू नशा होऊन का छळतेस गझले
एवढा मी का तुझ्या प्रेमात आहे
    
४.
सखीची आठवण येता मनाचा तोल ढासळतो 
उमाळा काळजाचा रोज डोळ्यातून पाझरतो

मला कुठल्याच दुःखाचे न काही वाटते आता
जगाच्या सांत्वना ऐकून हल्ली जीव घाबरतो

क्षणाआधी जसा असतो क्षणानंतर तसा नसतो
जगाचे सोडुनी देऊ स्वतःला मी कुठे कळतो

किती बदमाश तू झालास हल्ली ऐक आयुष्या
पसारा सर्व तू करतोस अन् मी रोज आवरतो

निरोपाची तर्हा बघतो कितीदा मी फलाटावर
प्रवासाला कुणी निघतो कुणाचा जीव बावरतो

सखीच्या मोकळ्या केसात गजरा मी कसा माळू
खट्याळा सारखा वारा तिथे येऊन आदळतो

सुखाचा शर्ट असतो हे जरी ऐकून मी होतो
कळेना का जगामध्ये कुणाला तो न सापडतो

जरा तब्येत ढासळता जगाला केवढी चिंता
नव्याने रोज सल्ल्यांचा जणू पाऊस कोसळतो

............................................. 
रघुनाथ पाटील

No comments:

Post a Comment