धनाजी जाधव : दोन गझला

Image may contain: 1 person, text and close-up
१.
सजतात रोज येथे त्यांचेच राजवाडे,
झेलून दुःख सारे जगतात गावगाडे!

हे सांगती जगाला,करतोय देश सेवा,
देशास पोखरूनी खातात ही गिधाडे

अन्याय रोखण्याला तलवार काढता मी,
माझ्यावरी पुन्हा मग होतात रे निवाडे

पुजतात ते शहाणे दगडास मंदिराच्या,
उपदेश थोर संता करतात हे पिदाडे

सोडून धर्म जाती माणूस आज झालो
जातीत माळशी तर दावीन कोंडवाडे


बाजार देवतांचा रस्त्यात मांडती ते,
देवास मुक्त केले तोडून मी कवाडे

जेव्हा विजय पताका लहरून सैन्य आले,
किल्ल्यावरी खुशीने मग वाजले नगाडे

२.
सारेच लोक येथे झाले कसे दिवाणे,
जगतात जीवनाला येथे गुन्ह्याप्रमाणे

पोटास हाक आली जेव्हा कधी भुकेची,
घेऊन माय आली चोचीत चार दाणे

होती उसंत कोठे मज भेटण्यास राणी,
कळले मनास होते सारे तुझे बहाणे

सोडून जिंदगीला गेलीस दूर जेंव्हा,
झाले हळू हळू मग जगणे उदासवाणे

देतात लाच जे ही खालून टेबलाच्या,
त्यांचेच शेवटाला गातात लोक गाणे

आकार जीवनाला येईल आज माझ्या,
झटकून देत आहे दुखणे जुने पुराणे

सोडून चाकरी ही झालोय मुक्त आता,
जगणार यापुढे मी माझ्या मनाप्रमाणे

.............................................
धनाजी जाधव

1 comment:

  1. वास्तव दर्शी
    अभिनंदन......

    ReplyDelete