श्यामनाथ पारसकर :पाच गझला


१.
नवीन गाडी नवा बंगला सुख देईना,
अध्यात्माची गोड कल्पना सुख देईना.

दृष्टांताने परमार्थाचा पचका केला,
अनुभूतींचे वास्तव मजला सुख देईना.

साधे जगणे कठीण केले उपदेशाने,
बोली करणी लांब फासला सुख देईना.


संसाराचे प्रेम घेरते वैराग्याला,
संतत्वाचा सुंदर डगला सुख देईना.

मानप्रतिष्ठा शान झूठ सब वाटे बंधू ,
माल आपला तिजोरीतला सुख देईना.

संतविचारे जगण्याचे बळ मिळे प्रेरणा,
सत्याला शंकेचा विळखा सुख देईना.
            
२.
बापू तुझे अहिंसक हत्त्यार तेज आहे ;
हल्ली उपोषणाला भलतीच क्रेज आहे.

नेता करी उपोषण, मंत्री करी उपोषण ;
हर एक कार्यकर्ता चापून व्हेज आहे.

सेवक करी उपोषण,याचक करी उपोषण ;
बघती कुणास जादा मिडिया फुटेज आहे.

दिसले उपोषकाला मैदान मोकळे तर ;
बसण्यास दैनिकाचे मग फ्रंटपेज आहे.

एखाद बाहुले घ्या,बसवा उपोषणाला;
करण्या गरम हवेला जे अॅव्हरेज आहे.

हल्ली उपोषणाला कारण हवे कुणाला;
रुजवायची जनी ह्या अपुली इमेज आहे.

३.
तुझे नाव घेता मिळे ठाव रामा,
मला वापरू दे तुझे नाव रामा.

कसे परवडावे तुझे नाम आम्हा,
खरेदू कसा मी चढे भाव रामा.

अडवले कुठे ते सुखाचे दिवस तू?
मला घालती लोक घेराव रामा.

गरीबीस माझ्या पडे फार भारी,
तुझ्या सेवकांचा बडेजाव रामा.

तुझ्या राहण्याची बघू सोय काही,
जरा एकदा जिंकु दे डाव रामा.

दिसे फार गर्दी तुझ्या राजद्वारी,
शिराया मिळे का तिथे वाव रामा?

 ४.
राहिले कच्चे गणित का आजवर ;
पास होशिल चांगला अभ्यास कर.

जेवतांना लाज थोडी वाटु दे ;
अन्नदात्याला म्हणे उपवास कर.

सोडले मरण्यास तुजला मोकळे ;
मी तुझ्या पाठीस राहिन फार तर.

वाढ म्हटले तर म्हणाली थांब रे ;
हात आहे गुंतलेला, माफ कर .

एक ठिणगी डोंगराला पेटवी ;
पसरते ती आग साऱ्या रानभर.

जीव हाती घेउनी मी हिंडलो ;
देइना कवडी कुणी बाजारभर.

५.
अरे हे खायचे नाही, अरे ते प्यायचे नाही ;
तुला स्वातंत्र्य आहे पण कुणा सांगायचे नाही.

घसा ओलावण्यासाठी कुणी मागू नका पाणी,
असे राखीव पाणी ते , पिण्याला द्यायचे नाही.

पुजाया देवदेवींना निघे टेचात रुखमाई ;
घरातील विठ्ठला तूही तिला रोखायचे नाही.

नवे ते चौथरे शोधा, बघा त्या तुर्बती कोठे?
अरे तेहतिस कोटींनी पुढे भागायचे नाही.

नको जादा करू गुंता तुझ्या पायात दोरीचा;
तुला धावायचे आहे, कुठे थांबायचे नाही.

.................................................................
श्यामनाथ पारसकर.
अकोला

No comments:

Post a Comment