कारुण्य माणसाला संतत्व दान देते : डॉ.गणेश गायकवाड


     
                                                     
                                                      
                                      श्रीकृष्ण राऊत आजच्या काळातील मराठीतील एक प्रथित यश, मातब्बर, लोकप्रिय, गझलकार आहेत. त्यांनी मुक्त छंदामध्ये कविताही लिहिल्यात आणि वाचकांनी त्याला पसंतीही दिली. परंतु त्यांच्या प्रतिभेचा खरा प्रत्यय, त्यांच्या मनातील व्यथा, वेदनेचा खरा इझहार त्यांच्या गझलांमधून होतो. सुरेश भटांच्या नंतर मराठी गझल कुठे पोहोचली, तिचा विस्तार कसा झाला, ती भटांच्या प्रभावाखालीच आहे का ?की तिने आपली वेगळी वाट जोपासली यावर राऊत सरांची बारीक नजर आहे. गझल लेखनाव्यतिरिक्त ते गझलच्या छंदशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत.  
                                  गझल ही शायरीची अनोखी विधा आहे. गझल मध्ये दोन अधिक दोन म्हणजे चार होत नाहीत. येथे भावना व्यक्त करण्याला महत्व नसून तुम्ही किती नजाकत व सांकेतिक भाषेमध्ये कमीत कमी शब्दात भावना व्यक्त करता, याला महत्व आहे. गझल ही इशारे, रहस्य, सांकेतिक शब्द, पॅराडॉक्स यांचा वापर करून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याची कला आहे. आणि ती कला श्रीकृष्ण राऊत सरांनी गझलच्या माध्यमातून लीलया साधली आहे. सरांच्या नवीन गझल संग्रहाचे नाव आहे 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते '. हा त्यांच्या एका गझलेचा मिसरा आहे आणि राऊत सरांच्या एकंदरीत गझलेचा बाज, त्यांची मानवतावादी भूमिका हे शेर आणखी स्पष्ट करतात.

'मृत्यू समोर दिसता विसरून वैर जावे 
बसण्याजवळ घडीभर मित्रास बोलवावे

कारुण्य माणसाला संतत्व दान देते 
आपापल्या परीने हृदयात वाढवावे '

                                         श्रीकृष्ण राऊत यांचे जीवन विषयक अनुभव काय आहेत ? त्यांच्या शायरीचे विषय काय आहेत ? त्यांच्यासाठी आपबीतीच सर्व काही आहे का ते जगबीतीला ही महत्व देतात ? की त्यांची आपबितीच जगबीती होऊन गझलेत व्यक्त होते ? त्यांचा मिजाज प्रेमभावना पूरक आहे की सामाजिक समस्यांनाही त्यांच्या गझलेत स्थान आहे ? या सर्व प्रश्नांची  उत्तरे हवी असतील तर खालील शेर बघा.

'जातीत वाटलेला, धर्मात वाटलेला
सोयीनुसार मानव भेदात वाटलेला '


'त्याला मनाप्रमाणे जगता कधी न आले
प्रत्येक श्वास त्याचा नात्यात वाटलेला '


'आत्महत्या पाप आहे खूप झाले सांगणे 
पोटभरल्या चोचल्यांचे खूप झाले सांगणे 
बदलतो आहे ऋतू तू पेरणी बदलून घे 
कोरड्या ठण पावसाचे खूप झाले सांगणे'


'जितेपणी उपवास किती 
मेल्यावरती घास किती '


'तुझ्या हासण्याचे दिवाने किती
तुझे चाहते कोण जाणे किती


मला नाव माझे स्मरेना प्रिये
तुला पाठ झाले उखाणे किती '


                                                  श्रीकृष्ण राऊत सरांचा एकंदरबाज सामाजिक अभिव्यक्तीचा आहे. त्यांच्या गझलेमध्ये 'जदीदियत' (आधुनिकता वाद) ही आढळतो. परंतु राऊत सरांचा समावेश दोन्ही प्रकारच्या शायरांमध्ये करता येत नाही. एवढे खरे की त्यांच्या गझलेवर दोन्ही प्रवृत्तींचा प्रभाव वाचतांना जाणवतो. त्यांच्याकडे एक संवेदनशील हृदय आहेच. आणि त्यांची स्वतःची एक जीवन विषयक दृष्टी आहे. जीवनाची त्रासदी, स्वप्नभंग, शहरी व ग्रामीण जीवनातील वाढती दरी, दूर आकाशात पसरलेले आगीचे लोळ आणि पृथ्वीवर कवडशाएवढ्या प्रकाशासाठी आसुसलेला माणूस, उदास चेहरे, माणसाच्या घरापर्यंत पोहचलेले राजकारण हे सर्व राऊत सरांच्या गझलातून व्यक्त होते. परंतु असे असले तरी हे फार संयतपणे व्यक्त झाले आहे. येथे एका घायाळ मनाची अभिव्यक्ती असेलही परंतु त्यात केवळ तक्रार नाही तर एक नजाकत आहे. गझल हा सादगी व सभ्यपणे व्यक्त होणारा काव्यप्रकार आहे. याची खात्री श्रीकृष्ण राऊत सरांची गझल वाचतांना कळते. त्यांच्या गझलेत शब्द आरडाओरडा करत नाहीत. छाती बडवत नाहीत, ओरडून आभाळ डोक्यावर घेत नाहीत, तरीही त्यांचा प्रभाव फार खोलवर होतो. 
                                      आजचा काळ हा द्रोहकाल आहे. सामाजिक व्यवस्था आमचं जगणं कठीण करू पाहत आहे. अन्याय व अत्याचाराची वेगवेगळी रूपं समोर येत आहेत. या सर्वांनी आमचं जीवन एक दु:स्वप्न करून टाकलं आहे. त्यामुळे अशा वातावरणावर राऊत सर जेव्हा शेरांमधून भाष्य करतात तेव्हा काहीच न बोलणाऱ्या ओळी आम्हाला खूप काही सांगून जातात.
  
'नाही कधी कुणाची होणार राजनीती
वेश्येपरी बदलते आचार राजनीती


प्रेमात रोज सौदा, मैत्रीत रोज धोका
करणार भावनांचा व्यापार राजनीती '


'लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे
चौकात मांडलेला आमचा लिलाव आहे '

'येथे असा कसा हा सांगा वसंत आला
बागेतल्या फुलांचा उमलून अंत आला'


झाली हसावयाची हल्ली इथे मनाई
तो थेंब आसवांचा घेऊन खंत आला '


                                          आजच्या काळाचे वैशिष्ट्य  हे आहे की आता समाज हा चिंतनाचा विषय नाही. परंतु त्या समाजात वास्तव्य करणारा 'माणूस ' हा चिंतनाचा, चर्चेचा, उपहासाचा, दयेचा विषय झाला आहे. आणि हीच गोष्ट राऊत सरांच्या गझलांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्यासाठी माणूस, त्याचे नातेसंबंध, त्याचे त्रस्त होणे, तुटणे, पुन्हा सावरणे हे सर्व महत्वाचे आहे, म्हणूनच मानवी नातेसंबंधावर भाष्य करतांना श्रीकृष्ण राऊत म्हणतात,
'रक्तात वाहणारे आई तुझेच गाणे
प्रत्येक पावलावर करते मला शहाणे '


'समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते
मी पण अवघे किमत भारी प्रेम मागते ' 
                                           श्रीकृष्ण राऊत सरांच्या गझला वाचतांना एका गोष्टीची खात्री पटल्याशिवाय राहत नाही की मराठी गझलेचे भवितव्य उज्ज्वल आहे. सुरेश भटांनी जे गझलेचे रोपटे लावले होते त्याचा आता एक डेरेदार वृक्ष झाला आहे. आणि त्या वृक्षाला श्रीकृष्ण राऊत सरांच्या रूपाने एक असे फळ आले आहे ज्याची चव पुढील अनेक वर्षे मराठी वाचक चाखत राहतील.

'तुटले नाते, सुटली मैत्री, छान आपला ग्लास भरावा
मन मेले तर मरो बिचारे खुशाल त्याला खांदा द्यावा


कवितेच्या सुंदर ओळींनी सजवावी लग्न पत्रिका
वधू चांगली कमावती अन वरून नगदी हुंडा घ्यावा '


                            अशा प्रकारे मोठ्या बहर मध्येही  सरांची गझल चांगलीच बहरत आहे.  सरांच्या उज्वल आरोग्यासाठी प्रार्थना करून त्यांच्या पुढील लिखाणास शुभेच्छा देतांना एवढे सांगावेसे वाटते...
'खुदा करे सभी को तेरी निगाह मिले
तेरी निगाह से दुनिया हसीन लगती है

बडे अनोखे तरीके से लिख रहा है गझल
पुरानी बात भी ताजा तरीन लगती है '
.............................................
डॉ.गणेश गायकवाड,
हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शायर
बुलडाणा

No comments:

Post a Comment