जयदिप विघ्ने : पाच गझल


१.
देह पायास भार झाल्यावर
दैव म्हणते तरंग पाण्यावर

हाक साधी दिली कुणी नाही
फार चिडले निघून जाण्यावर

पाखरु एकटक बघत होते
जीव जडला असेल जाळ्यावर

बोलली गझल पोटतिडकीने
पोट भरणार काय टाळ्यावर

घास घासातला दिला असता
नजर माझीच झाडपाल्यावर

२.
भेट तर होणेच नाही, तडफडू दे
पायरीचे प्रेम कळसावर जडू दे

हात आखडले जराशा मागणीवर
मागणी इतकीच होती की रडू दे

शेवटी वैताग म्हटला पक्षिणीचा
एकदा खोप्याससुद्धा तडफडू दे

पाहिले फुलपाखरू तेव्हा समजले
का मला घुसमट म्हणाली बागडू दे

सहज होते साध्य मग सोकावतो तो
आज देहाला जरासे अवघडू दे

३.
व्यावहारीक व्हायचे ठरले
श्वास मोजून घ्यायचे ठरले

त्यास हटकून तेल पाजावे
ज्या दिव्याचे विझायचे ठरले

आणखी भेट व्हायची आहे
आणि लवकर निघायचे ठरले

बैल विणवत धन्यास होता की
आपले तर जगायचे ठरले...?

४.
एक गाणे सुरातही नव्हते
पण मनातून जातही नव्हते

फास होता गळ्यात हारांचा
आणि पुतळ्यास हातही नव्हते

हा गुन्हा आपसूक घडलेला
'हात दाबू' मनातही नव्हते

जे खडे भांडतात जात्याशी
ते खरेतर सुपातही नव्हते

जवळ येऊन लागला हमसू
थेंब थोडे ढगातही नव्हते

५.
भान देऊ नको मजेसाठी
स्पर्श साधाच दे त्वचेसाठी

छेदला कोथळा चमकली मग
ढग कुठे सरकला विजेसाठी

मुर्ख आहे मुकाबिका नाही
तोंड उघडेल तो टिकेसाठी

शेवटी कान तृप्त झाले रे
भार झालो म्हणे चितेसाठी

दुःख समजू नकोस भक्तांचे
विठ्ठला उतर त्या विटेसाठी
.............................................
जयदिप विघ्ने
7972449691

No comments:

Post a Comment