जयवंत वानखडे : तीन गझला




१.
ढकलून रोज देतो माझी जबाबदारी
शिकलो कुठून आहे ही मी नवी हुशारी

चर्चेत खूप आहे खोटे इथे अताशा
माझी इमानदारी वाटे मला बिमारी

चुकते हिशोब सगळे झाले कसे म्हणू मी
श्वासागणीक चढते श्वासा तुझी उधारी

धास्ती पराभवाची या पांगळ्या मनाला
पंखातल्या बळाने घेवू कशी भरारी

घेऊन हात हाती सोबत असू म्हणाली
विसरून दु:ख सारे आली मना उभारी

२.
जन्मणे होते कुठे हातात माझ्या
भोग हे लिहिले कुणी नशिबात माझ्या

मी कुणाला वाटतो पुतळा सुखाचा
दु:ख सारे लपवतो हसण्यात माझ्या

भीत नाही संकटांना कोणत्याही
एक योध्दा जन्मलेला आत माझ्या

प्रश्न जनतेचे कसे सुटणार सांगा
लोकनेते भ्रष्ट जर देशात माझ्या

नेहमी दु:खापुढे होतो पराभव
भूक,बेकारी इथे संघात माझ्या

भूक माझी झोपल्यावर झोपतो मी
रोज येते भाकरी स्वप्नात माझ्या

मी कधीचा शोधतो आहे स्वतःला
मी कधी नसतो जरी असण्यात माझ्या

३.
ओठावरती ओठ टेकता घडले होते बरेच काही
जरा लाजुनी ती पुटपुटली मनात होते असेच काही

सकाळ होता सूर्य विचारी कशी सजवली रात्र कालची
फक्त जोडले मनामनाला घडले नाही कुठेच काही

कुणाकुणाला माझ्या सांगू कथा व्यथांच्या इथे सारख्या
विरंगुळा हा त्यांचा ठरतो.... नसते दुसरे खरेच काही

थाट मांडुनी गटागटाने गझल बोलते मंचावरुनी
अहंकार बघ किती पोसती खुजी माणसे इथेच काही

प्रेमाखातर मेघदूत तो जन्मा आला... अमर जाहला
सदा वाटते कार्य करावे मी अजरामर तसेच काही

.... ........................................
जयवंत वानखडे,
कोरपना, जि.चंद्रपूर
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

No comments:

Post a Comment