बाळ पाटील : चार गझला


१.
सागरकेन्द्री तहानलेला
पाणी पाणी करून मेला

ती आशेची असेल जादू
अर्धा प्याला भरून गेला

त्याला देखिल गुरू मिळाला
शोधत होता खुशाल चेला

मोफतसुध्दा नकोस भेटू
भाव तुझा जर वधारलेला

हे जग चाले विमान वेगे
वाहन नडले यमास हेला

२.
जेथे आश्रय वाटत नाही
ते देवालय वाटत नाही

जगताना छाती धडधडते
मरणाचे भय वाटत नाही

ती जाताना रडली नाही
केली हयगय वाटत नाही

फारच टाळ्या त्या ओळींना
आहे आशय वाटत नाही

रागाने गातो बहुधा तो
रागाची लय वाटत नाही

केवळ साता जन्मापुरते
नाते अक्षय वाटत नाही

३.
नडले माझे मीपण कळले नाही
केव्हा गेला श्रावण कळले नाही

रडण्या आधी खूपच हसलो होतो
त्या हसण्याचे कारण कळले नाही  

धुतला तांदुळ तैसे मन हे झाले
कुठला होता साबण कळले नाही

माझ्यातच तर होती ती दडलेली
का फिरलो मी वणवण कळले नाही

निसटुन गेला काळाच्या ओघाने
कुठला पकडावा क्षण कळले नाही

४.
चव येण्याला लवण लागते
थोडेसे बालपण लागते

गर्वाने तू नको पाजळू
सुर्यालाही ग्रहण लागते

वरवर वाटे मुके प्रेम हे
आळवण्याला कवण लागते

गोंधळ घालू  म्हणे सारखा
त्यालाही जागरण लागते

लाड जिवाचे नको फारसे
या जगण्याला मरण लागते
.............................................
बाळ पाटील

No comments:

Post a Comment