५१ शेरांची गझल : हेमलता पाटील


Image may contain: 1 person

धैर्याचाही खांब आतुनी हलला होता
भग्न मनाचा पाया जेव्हा खचला होता

हो..ह्रदयाचा ठोका क्षणभर चुकला होता
फोन अवेळी जेव्हाही खणखणला होता

तिच्या पावली लहरत आला अवखळ वारा
पिंपळ माझ्या अंगणात सळसळला होता

 'या' पदराने 'त्या' अश्रूंना पुसता पुसता
डोळ्यामधुनी थेंब तिच्या ओघळला होता

भरकटले अन् खाली पडले सान पाखरू
पंखांचा अंदाज जरासा चुकला होता

चंद्र झोपला अता जाउनी आड ढगाच्या
तुझी रात्रभर वाट पाहुनी थकला होता

पडल्यावरती कुणी उचलले नाही त्याला
मुलगा माझा स्वतःच उठणे शिकला होता

तिने खुबीने तोच नेमका विषय टाळला
 मौनामधला नकार त्याला कळला होता

एकांताशी गप्पा मारत बसतो हल्ली
रस्ता त्याचा असा अचानक वळला होता

कुचंबणेने राख मनाची केली तेव्हा
लाल निखारा डोळ्यामध्ये फुलला होता

तिने चुंबिला आवेशाने माथा त्याचा 
धारातीर्थी वीर शिपाई पडला होता

जिथे बेरजा करावयाच्या तिथे भागले
आयुष्याचा हिशोब सारा चुकला होता

अर्ध्या रात्री मी शब्दांची गुंफण केली
झोपेमध्ये खयाल उमदा सुचला होता

पुन्हा कळीच्या उरात काटा रुतला होता
पदर तिचाही अश्रूंमध्ये भिजला होता

खिन्न होउनी धुळीत गजरा पडला होता
भर सांजेला बहर व्यथांचा पिकला होता

जीव तान्हुला हाती जेव्हा आला त्याच्या
कधी नव्हे तो बाप होउनी रडला होता

फुटके मडके, रितीच कणगी, भूक अधाशी
दारिद्र्याचा वेढा नशिबी पडला होता

ओठांवरती सहज उलाही उमटत गेला
मिठीत त्याच्या सानी जेव्हा सुचला होता

काळाने तर नेम लावला अचूक होता
गतजन्माच्या पुण्याईने हुकला होता

कोसळले रे छत अन् भिंती उभ्या घराच्या
तू गेल्यावर पाया पुरता खचला होता

दोन किनारे बनून दोघे सोबत चालू
मला तुझा पर्याय शेवटी रुचला होता

क्षितिजावरती उगवत गेले चंद्र चांदणे
अंधाराचा संभ्रम गळुनी पडला होता

मन भिजण्याचा ऋतू परतुनी आला नाही
ती गेल्यावर श्रावण त्याचा सुकला होता

कर्ता धर्ता लेक निघाला तिरडीवरुनी
विश्वास तिचा देवावरुनी उडला होता

एकांताने सूर छेडला असेल बहुधा
मौनाचा स्वर जेव्हाही गुणगुणला होता

तिथे वासना उंची बोली लावत होती
नव्या फुलांचा बाजार जिथे भरला होता

नंतर नाही मनी बहरला वसंत माझ्या
तू गेल्यावर मोहर सारा झडला होता

देह पाहिला जळतांना मी सरणावरती
जगण्याचा मग अर्थ खरा मज कळला होता

चालत होते जीवनभर पण पोचत नव्हते
पायांसाठी रस्ताही हळहळला होता

छातीवरती दगड ठेवला होता त्याने
शेताचा तो तुकडा जेव्हा विकला होता

आनंदाला दुःखद जडली किनार होती
लेकीसाठी दारी मंडप सजला होता

मनास मारत अनेक गोष्टी तुझ्या ऐकल्या
पदर किती मी साडीचा चुरगळला होता

वठलेल्या का झाडाचेही हिरवळले मन?
ऋतू मनाचा जरी अकाली झडला होता

युगायुगांच्या जुनेपणाला फुटे नव्हाळी
कुणी आपला स्वप्नी या भिरभिरला होता?

सोडवूनही कधीच गुंता सुटला नाही
नात्यांमध्ये पाय किती गुरफटला होता

तिनेच माझ्या रागावरती विजय मिळविला
गनिमी कावा अश्रूंचा वापरला होता

नियती उधळत आली जो दुःखाचा बुक्का
भाग्यावरती जास्तीचा तो पडला होता 

लहानगी बालीश जरी ती वाटत होती
ओंगळवाणा स्पर्श तिलाही कळला होता

होता माझा सुप्त मनाचा कागद कोरा
तुझ्या स्मृतींनी क्षणात सारा भरला होता

विश्वासाने हात दिला मी जेव्हा हाती
त्यावेळी का हात तुझा थरथरला होता?

मांज्यानेही ढील दिलेली जास्त असावी
पतंग म्हणुनी उंचावर भरकटला होता

अस्तित्वाच्या खुणा निनावी उरल्या होत्या
नदीकाठचा औदुंबर अवघडला होता

गच्च फुलांनी भरली फांदी झुकली जेव्हा
कण कण तेव्हा त्याचाही दरवळला होता

दरवळला तो श्वास प्रियेचा तिकडे कोठे
या हृदयाचा ठोका इकडे चुकला होता

मोहापायी कमळ तोडण्या धावत सुटले
चिखलाने त्या देह पुरा बरबटला होता

पत्नी असुनी क्षणभर त्याची आई झाले
'थकलो आहे' नवरा जेव्हा म्हटला होता

विरहामध्ये वात रात्रभर जळली बहुधा
ह्रदयाचा कंदील किती धुरकटला होता

कळले तेव्हा रस्ता माझा चुकला होता
मखमलीतही काटा जेव्हा रुतला होता

कुठे स्वतःची मर्जी होती पाचोळ्याला
वाऱ्यासंगे इथेतिथे तो फिरला होता

वसंत जेव्हा फिरकत नव्हता माझ्या दारी
ऋतू मनाचा अवकाळी मोहरला होता

विद्ध मनाने उरात जपते आर्त व्यथांना
पर्याय कुठे  दुसरा आणिक उरला होता

No comments:

Post a Comment