महेन महाजन : पाच गझला


१.
एवढ्यासाठीच मीही बोललो नाही खरे..!
मी कसे द्यावे स्वतःच्या 'मी'पणाला हादरे..?

वाजवी नाहीत शंका ज्या मुलांनी घेतल्या..
बाप होतो मी म्हणोनी टाळली बघ उत्तरे..!

मुखवट्यांचा फक्त वावर ह्या सुखाच्या भोवती..
आतुनी आहेत दुःखी हासणारे चेहरे..!

व्यापुनी मेंदूस उरली एक इच्छा कोवळी..
हासता रडता कधीही जी मनाला पोखरे..!

सावली आजन्म माझी राहिली परकी कशी..
काय मी नव्हतो तिचा, की ती उन्हाला घाबरे..?

सावकारा.. ठेव तारण ! 'पेरण्या पण बीज दे..'
फाळ, नांगर, तिफण, डवरा, बैल, दावे, कासरे..!

२.
भाळतो जो तो तुझ्यावर..मी कुठे नाही म्हणालो..!
मानले पण तू मला 'वर'..मी कुठे नाही म्हणालो..!

ओठ ओठांना भिडू दे गोड होऊ दे मनाला,
देह नांगर, पेर साखर.. मी कुठे नाही म्हणालो..!

बघ फुगा तू "मी पणाचा" एकदा फुटणार नक्की,
पाहिजे तितकी हवा भर..मी कुठे नाही म्हणालो..!

रोजचा संशय नको हा, एकदा बोलून घे तू..
तू तुझे म्हणणे खरे कर..मी कुठे नाही म्हणालो..!

प्रेम द्यावे लागते मग प्रेमही मिळते खरोखर.,
त्या विना कोणी न साक्षर..मी कुठे नाही म्हणालो..!

घास मजला दे भरू तू ह्या भुकेल्या माणसांना,
मग भले तू फाड छप्पर..मी कुठे नाही म्हणालो..!

३.
आरतीला दुःख घेते अन् मला ओवाळते..!
वेदना इतकी कशी ही माझियावर भाळते..?

झाड तुटण्याची तिला दिसली असावी शक्यता..
एक चिमणी सारखी घरट्यापुढे रेंगाळते..!

मी कुठे केली न चर्चा की मला तू भेटली..
मग अशी का शहरभर ही बातमी घोटाळते..!

पाहिली नुसतीच आपण ज्या दिव्याची काजळी..
त्या दिव्याची वातही बघ सारखी तेजाळते..!

काय आपोआप त्याची बंडखोरी थांबली..?
पाहुनी खुर्चीस ज्याची वासना बोकाळते..!

एरवी जे शांत असते मौन माझे लाघवी..
एकटे असता अचानक का बरे किंचाळते..?

जी कहाणी वाचली, पटली, समजली, भावली..
तीच आता माणसाला पाहुनी ओशाळते..!

४.
बेसावध एक वासरू उंडारते रानामधे..!
एकटीच गाय हंबरे अस्वस्थ ह्या गोठ्यामधे..!

हाक माझी पोचली पण साद साधीही मिळेना..
काय देवा येत नाही आर्तता आवाजामधे..?

आपल्याश्या वाटलेल्या इंद्रधनूच्या स्वप्नांनी..
जीव का द्यावा मुक्याने डोळ्यातल्या डोहामधे..?

कोमेजल्या रानामधे नवा फुलोरा बहरू दे..
अन् दे जरासे बळ पुन्हा पाखरांच्या पंखामधे..!

राग तो पाहून त्यांचा मी फुलांनी वार केले
स्पर्श होता तलवारही शांत बसली म्यानामधे..!

५.
चंद्र वेडे चांदणे अन गंध वेडी पाकळी..!
अन् कुठे ह्या काळजाला बोचणाऱ्या बाभळी..!

फार नाही पाळले नाते कधी मी आपले..,
पण तरी सांभाळली तू मी दिलेली साखळी..!

जीवनाची मागणी समजून जेव्हा घेतली..
वाटले जगण्यामधेही मौज आहे आगळी..!

संशयाने केवढी दुनियेत उंची गाठली..
अन भरोसा सोडतो हर एकवेळी पातळी..!

काय मी देऊ पुरावे ध्वस्ततेचे ईश्वरा..
धूळ होती जिंदगी अन जन्म होता वादळी..!
.............................................
 महेन महाजन

No comments:

Post a Comment