शरद धनगर : पाच गझला




१.
विश्वासाला बेघर करतो
संशय नाते जर्जर करतो

अन्यायाशी संकर करण्या
तो न्यायाचा वापर करतो

प्रेमामध्ये माणुस मरतो
म्हणुन प्रेम मी वरवर करतो

नियम कायदा आळस देतो
पैसा कामं लवकर करतो

तूच तारली गाथा तुकया
काय?कुणाचा? जागर करतो

हत्या होते रोज फुलांची
त्या रक्ताचे अत्तर करतो

कुटुंब अपुले जगण्या करता
बाप बिचारा मरमर करतो

कोण म्हणतो कविता करतो?
व्यथा वेदना सादर करतो

तोच तारतो तोच मारतो
काय?पुरावे सादर करतो

कोण?कुणाला?इमान विकतो
त्यावर निर्णय निर्भर करतो

२.
लाऊ नको ना लळासारखा
डोळ्यातल्या काजळासारखा

नुसती तिची याद आली तरी
दाटून येतो गळासारखा

तरबेज डोळे शिकारी तिचे
ती लावते सापळासारखा

झाल्यावरी ही डिजीटल पिढी
रडतो खडू अन् फळासारखा

लाथाड ओलांड तुडवून जा
मी लांघल्या तांदळासारखा

गरिबी उपाशी जरी राहिली
तो शोधतो कावळासारखा

नादात झालो निकामी तिच्या
मी पावल्या नारळासारखा

मातीसही देव पावेल का?
त्या पार्वतीच्या मळासारखा

नाही मिळाला किनारा मला
मी वागलो वादळासारखा

३.
तिचे पाहणे ही असरदार आहे
उभा गाव माझा गझलकार आहे

विसरतो मला मी तिला पाहिल्यावर
असा देखणा एक शेजार आहे

उगा काळजाला कसा दोष देऊ ?
जगा तेवढा मी समजदार आहे

जसा साथ देतो नदीला किनारा
तशी साथ आजन्म देणार आहे

तिची छेड काढू नको ना फुला तू
तुझ्यागत तिचा देह अलवार आहे

मला पापणी आज संकेत देते?
तिची भेट बहुतेक घडणार आहे

पुन्हा सांगतो मी निराधार नाही
सगे सोयरे तूच घरदार आहे

अदांनी मला रोज घायाळ करते
अशी देखणी एक तलवार आहे

तिने चुंबनाला दिला आडफाटा
म्हणे सोड ना आज रविवार आहे

४.
तुझ्याशी जरी जन्मभर वाद केले
सखे मी मनोमन तुला याद केले

नका दोष देऊ तिला यार कोणी
मला मीच प्रेमात बरबाद केले

(अपेक्षा न ईच्छा कशाचीच उरली
तिने प्रेम इतके मनमुराद केले)

जरी भाव शब्दात आले अनावर
तिने फक्त ऐकून इर्शाद केले

कुठे मी रुबाई गझल शेर लिहिले?
स्मृतींशी तिच्या फक्त संवाद केले

जरी ही नदी कोरडी ठाक आहे
तिने त्या समुद्रास आबाद केले

लळा लागला एवढा पिंजऱ्याचा
तिने मुक्ततेशीच प्रतिवाद केले

भुकेचा तुला अर्थ कळणार नाही
कितीही जरी मुक्त अनुवाद केले

५.
पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही
माझे इमान कोण्या दारी गहाण नाही

जो जिंकणार होता दुनियेस काल सा-या
बाकी कुठेच त्याचे नामो निशाण नाही

मी पोट भागवाया करतो जरा लबाडी
लाचार भूक करते; मी बेइमान नाही

या नागडेपणाचा करतो खरा खुलासा
मी कास्तकार आहे सलमान खान नाही

असतील शौर्य गाथा तुमच्या पराक्रमाच्या
चारित्र्य मात्र तुमचे शिवबा समान नाही

चिंता तुझ्या भुकेची जो वाहतोय भाळी
पायात आज त्याच्या तुटकी वहाण नाही

छप्पन्न इंच छाती माझी नसेल कारण
माझ्याकडे दिखाऊ देशाभिमान नाही

सोडून मायबापा का चारधाम जातो?
इतके जगात पावन दुसरे ठिकाण नाही

दररोज जीव जर का जातो इथे बळीचा?
नक्कीच देश तुमचा शेती प्रधान नाही

तो फक्त भ्रष्ट आहे पण पक्षनिष्ठ आहे
ही एकमेव ख्याती त्याची किमान नाही

ज्या पुस्तकात थारा नाही समानतेला
तो धर्म ग्रंथ आहे ते संविधान नाही

.............................................
शरद धनगर,
करणखेडे,
ता.अमळनेर,
जि. जळगाव,
मो.8600161600

No comments:

Post a Comment