स्वाती शुक्ल : पाच गझला१.

असे नाही नकाशा मी कधीही वाचला नाही
तुझ्या माझ्यातले अंतर  दुरावा वाटला नाही!

घरी आलेच नाही अन् कधी येणारही नाही
तुझा पत्ता तरीही मी कधीही फाडला नाही.

तुझ्या अंगावरील परफ्युम् तुझ्या केसातला शँपू
विकत घेऊनही इतका सुगंधी वाटला नाही

कधीही सभ्यतेचा आव मोठा आणला नाही
तुझ्याशी बोलते आहे इरादा चांगला नाही

तुला चोरून बघते हे तुलाही माहिती आहे
तरी दुर्लक्ष केल्याचा अभीनय चांगला नाही!

२.

प्रेम केले एकमेकांवर उधारी सारखे
वेगळे झालो पुन्हा मग कर्जमाफी सारखे

आपले नाते कधीचे ठार मेले पण तरी
घालते घिरट्या तिथे मन रोज घारीसारखे

मान्य सध्या मी तुझी नाही कुणीही पण तरी
बोल ना तू फक्त थोडे आज पूर्वीसारखे

एकदाचे ठरव आणिक सांग बोलू की नको
सारखे पकडू नको शब्दात कात्रीसारखे

राग आल्यावर मला समजून घे तू... शांत हो
सांग कितिदा वाक्य वापरशील ढालीसारखे?

जन्मदात्री अन तरीही वांझ बाई सारखे
वागते आयुष्य हे सावत्र आई सारखे

३.

नव्हतीच रातराणी ना गंध सायलीचा
स्वप्नात भास होतो माझ्या तुझ्या मिठीचा

इतके जवळ नसावे कोणी कधी कुणाच्या
डोळ्यात केस गेला माझ्याच पापणीचा

आरोप मी तुझ्यावर करण्यात अर्थ नाही
आहे कुठे पुरावा,डोळ्यात ओळखीचा?

इतक्याच कारणाने मी टाळला किनारा
आला विचार जर का माझ्या मनी उडीचा

कंटाळले अशी मी खेळात भांडणाला
मांडून मोडला मी संसार बाहुलीचा

माझ्या समोर कोणी नैवेद्य ठेवतो का?
देवा तुझा तु सोडव हा प्रश्न भाकरीचा!

४.

याचसाठी मी तुझ्यावर आजवर लिहिलेच नाही
बाप म्हटला की लिहावे वाटते मग 'बाप' काही!

केवढे बाबा मला बोलायचे आहे तुझ्याशी
दुःख हे की हे कधी आलेच नाही बोलताही

बाप नावाची जरी सत्ता घरावर राज्य करते
या घरातच अर्थ कळला काय असते लोकशाही

जन्मभर बापात दिसले दोष सारे टोचणारे
बाप गेल्यावर कळाले बाप होता चांगलाही

वेगळा नव्हताच बाबा पण तरीही 'बाप' होता
बाप म्हणजे? तोच ठावे ज्या कुणाला बाप नाही

 ५.

घोळ हा नाजुक जरासा आपल्या दोघांत आहे
तू तिच्या प्रेमात आणिक मी तुझ्या प्रेमात आहे

पाहिल्या बदलून वाटा पण तरी उपयोग नाही
रोज दिसते घर तुझे जे नेमके चौकात आहे ..!

एकदा घेईन बदला या तुझ्या मी वागण्याचा
मी तुला सांगेन आता, "मी जरा कामात आहे! "

आळ खोटा घेत नाही झोप माझी चोरल्याचा
घेतली झडती..कळाले,मी तुझ्या स्वप्नात आहे!

ठीक आहे,चल नव्याने एकदा भेटून पाहू
तेवढे सोडून बोलू जेवढे लक्षात आहे..!

फक्त असते प्रेयसी तर सोडले असते तुला मी
एक आई वाट बघते जी मनाच्या आत आहे

No comments:

Post a Comment