रविप्रकाश : तीन गझला



१.
रडतो किती सुगंधी..मज सांगता न आले.
माझ्या  परी फुलांना , गंधाळता  न आले !

क्रोधास हाय केव्हा , फेकून  मौन मारू ?
आम्हा नजाकतीने का भांडता न आले ?

घेऊन  जीव माझा.. शस्त्रास  दुःख झाले.
दोनासवे  जगाला ,पण  ढाळता  न आले !

कर्जापरीस  मजला  ,  देतात  चार खांदे?
मज  दोन  पावलेही  का  चालता न आले !?

दुःखास शापमुक्ती मिळणार सांग कैसी ?
मजभोवती  व्यथेला  घोटाळता  न आले !

पत्रिकेपरी  मनोहर...संसार  होत नसतो.
काळीज मज कुणाचे का चोरता न आले?

बांधू  कसा  व्यथेच्या   पायात  घुंगरे  मी ?
अद्याप  दुःख  मजला , शृंगारता  न  आले!

मृत्यो , तुलाच वेड्या , मी  मारलेच नसते?
थांबून ये म्हणालो...तुज थांबता न आले!

आजन्म खेळलो मी,मस्तीत विस्तवाशी..
लाचार लाकडांना ,मज जाळता न आले!

२.
जरी चालताना.. तुला वाट डसते.
तुझ्या पावलांना..फुटो राजरस्ते !

तिच्या सावलीला  बसा  सुर्यदेवा,
कळू द्या तुम्हाला कशी माय असते!

तिच्या सोसण्यावर..रडे वेदनाही.
तिच्या दिल्लगीवर,किती दुःख हसते!

कशी प्रेयसी तू..जशी मत्स्यगंधा?
कितीदा धरावी..तरीही निसटते !

तवंगापरी  'मीपणा'  वर  तरंगे...
बुडाल्याविना काय जीवन समजते!

३.
नशीबाने ललाटावर हजारो स्वाक्षऱ्या केल्या.
भुकेल्या लाख हाडांच्या तरी मी बासऱ्या केल्या !

लगोरी ती रचे कैसी भिडे जी थेट गगनाला..?
अहो,चंद्रास भेटाया ,मुलीने पायऱ्या केल्या!

जरा डोकावता..खालीच पडण्याची भिती वाटे.
खळी पाहुन सखीची हो,निसर्गाने दऱ्या केल्या !

दगड कापून दुःखाचा,अजिंठा कोरतो प्याला.
कधी का मद्यशाळेने जुन्या जख्मा बऱ्या केल्या !

खुजे दिसता, तरी घेता,तुम्ही कैसे गगनचुंबन ?
कणा मोडून कोणाचा,हवेवर पायऱ्या केल्या!

तुका तुकड्यात वर आले.. अनाथांचेच घर झाले.
बुडालेल्या अभंगाच्या नदीने डायऱ्या केल्या!
.............................................
रवि प्रकाश  चापके

No comments:

Post a Comment