काळाची सामंती निगरण : डॉ. राम पंडित





                 
समकालीन जीवनातील उद्विग्नतेची बुद्धिगम्य मीमांसा
                       गजल विधेतील प्रत्येक शेर हा स्वतंत्र व परिपूर्ण कविता असणे आवश्यक असते. लय दृष्ट्या गजलेत संगीतात्मकता अपेक्षित असते. म्हणजे प्राधान्य काव्य-विचारास आहे. अन्य निकषांनुसार यातील समग्र शेरात एक आंतरिक सुसूत्रता विद्यमान असणे व शेराचा आशय संप्रेषीत होणे नितांत आवश्यक मानले जाते. 'भोगा हुआ यथार्थ' तगज्जुलसह पेश करणे हीच गजलची खासियत गणली जाते. बहुतांश गजलकार 'विरोधाभास' हेच गजलचे लक्षण मानतांना दिसतात. ते मुशाय-यातील तात्कालिन टाळ्याखाऊ शेरांचे लक्षण होय. समकालीन मराठी गजल मधील जे मोजकेच कवी अश्या तकलादू गजल सर्जनाकडे वळले नाहीत, त्यातील एक नाव आहे समीर चव्हाण.
                   काही वर्षांपूर्वी पुण्याला, भूषण कटककर, अजय जोशी व समीर चव्हाण या तीन कवींच्या गजल संग्रहांचे मी विमोचन करतांना, त्यांच्या गजलांची परिचयात्मक व आस्वादक समीक्षाही केली होती. त्यावेळीही या तिघांच्या गजलचा मफहूम व लहजा लक्षणीय होता. त्यांच्या समकालीनांहून पृथकही जाणवला. आता प्रदीर्घ कालावधीनंतर समीरचा एकशे सहा गजलांचा दुसरा संग्रह 'काळाची सामंती निगरण' या वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकाने मराठी काव्यविश्वात दाखल झालाय. गजल विधा मानवी अंतःकरणाचे दु:ख, आर्तता, चिंता, हूरहूर इ.भाव, सकारात्मकतेहून अधिक प्रभावीपणे संप्रेषीत करते. अन् विशेष म्हणजे तिच्यात हमखास साकारणारा 'मी'बहुधा व्यष्ठीतून समष्टीकडे जात 'आपण' बनतो. समीरचे बहुतांश शेर याच वैशिष्ट्याची साक्ष देतात. समकालीन जीवन, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इ. समग्र स्तरांवर एका अनाकलनीय उद्विग्नतेने ग्रासले आहे. याला कारणीभूत असलेल्या विविध प्रवृत्तींची कारणमीमांसा प्रत्येक कलाशिल्पी आपापल्या सर्जन क्षमतेनुसार करीत आहे. रंग, स्वर, अक्षरे ही त्यांच्या अभिव्यक्तीची साधने आहेत. समीर चव्हाणने आपल्याला उद्विग्न करणा-या तरीही प्रेयस गोष्टींची केलेली बुद्धिगम्य मीमांसा म्हणजेच हा गजल संग्रह होय.
                     या संग्रहाच्या शीर्षकाद्वारे समीरला निश्चितच 'Preservation of contemporary aristocracy' अभिप्रेत असावी. ही सामंती व्यवस्था प्रणाली जीवनाचे सगळे स्तर पोखरत आहे. अन् संवेदनशील कविमन व्यथित होत, आपल्यात उद्भवलेल्या उद्विग्नतेला लेखणीतून वाट देतं. पिडीत जनसामान्यांची स्थिती सामंती व्यवस्था प्रणालीत आगामी काळाबद्दल नेहमीच साशंक असते.
एक संदेह मला स्वस्थ बसू देईना
काय होणार,पुढे काय,दिसू येईना
अन् मग यातून उद्भवलेल्या नैराश्याने जो तो स्वतःलाच विचारत असावा -
सांग मी उदासीला ह्या, कोठवर निभावत नेऊ,
का विकल्प माझ्यापाशी चांगला, बरा, कुठलासा
विकल्पांबाबत संभ्रमित झाल्यास विचलित मन म्हणतं -
निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे
हे वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या बुद्धिजीवी वर्गालाच पडणारे नव्हेत तर सामान्य नागरिकांनाही भेडसावणारे प्रश्न आहेत. दैववादी नसलेली व्यक्ती देखील अवतीभवतीच्या विदीर्ण करणा-या परिस्थितीत
जाऊ तर जाऊ, आपण कोठे जाऊ
फार फार तर नशिबाच्या मागे जाऊ
अश्या विचाराप्रतही येऊ शकते. जीवन, दुनिया, इच्छा आकांक्षा, ही आयुष्याची अविभाज्य घटके होत. विचारप्रवण व्यक्ती या घटकांचा मागोवा घेतांना विचार करतो-
वर्षानुवर्षे चाललो नव्हतो दिशाहीन
शून्यातली आवर्तने नुसतीच नव्हती
तरीही कां? -
खोलखोल जातांना आपण
भासत जाते गहरी दुनिया
मात्र बुडबुडे आपण काही
बसू न देते खाली दुनिया
या निष्कर्षाप्रत पोहोचतो. अन् अनेकदा -
काही तरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते
उरली न आता जिद्द जगण्याची जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते
                          आय.आय.टी कानपूरच्या प्राध्यापक पदी कार्यरत असलेली म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्थैर्य असलेली व्यक्ती जेव्हा असे विषादपूर्ण विचार मांडते, तेव्हा ते व्यष्ठीचे नव्हे तर समष्टीचे प्रतिनिधित्व करीत असतात. चांगला कवी, साहित्यकार समाजाला 'तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो' असेच मागणे मागतो. या व्यथेला तो आपल्या लेखणीने बोलकं करीत असतो. अर्थात त्याच्या शब्दांचे सामर्थ्य, आशयाची क्षमता, भावनेतील लालित्य व आर्तता यावर अवलंबून असतं. त्या व्यथेचं जनमानसात संप्रेषीत होणं. समीरची समकालीनांहून विलग होणारी ही गजल थेट संवाद साधते. वास्तव अधोरेखित करताना उपमा, रूपकं इ. अलंकारांचा अती सोस ती बाळगत नाही. याच सुबोध शैलीला 'सहले-मुम्तिना'म्हणतात. उर्दूत मुहम्मद अलवी मरहूमची हीच शैली होती. समीरचे या शैलीचे काही शेर मुलाहिजा हो-
एक परी येईल कहाणी सांगुन जाइल
नक्षत्रांची सगळी गाणी गाउन जाइल 
*
गेली वर्षे बदलत कपडे महिन्यांचे
बघत राहिली इच्छा नखरे महिन्यांचे
*
विझून गेल्या वाती दोन्ही डोळ्यांच्या
रस्त्यावरच्या फुटलेल्या ह्या लॅम्पप्रमाणे
*
घट्ट धरावी काठी आणिक मस्त आपले भटकत जावे
पकड एकदा सुटली की मग फिरण्याची लज्जत कोठे हो
गजलची सुगमता म्हणजे सपकता नव्हे. तरवाचक वा श्रोत्याला त्यातील शेरांनी हाॅन्ट करणे. अमूर्त शेर अगम्य असले तर ती रचनाकृती वाचकांस अनुभूती व आनंद देऊच शकत नाही, मग फक्त शब्दसंपदेचं कौतुक करणं उरतं. समीरच्या गजलेचा पोत आत्मसंवादी असतांना ती रचना ऐकण्यापेक्षा वाचण्यासाठी असते, म्हणजे नुसती ऐकून तिच्यातला आशय मनबुध्दीवर अंकित होऊ शकत नाही, तो डोळ्यावाटेच यावा लागतो. उदाहरणार्थ हे शेर पहा-
नसेल बहुधा वर्तुळात मी फिरत राहिलो
वलयांच्या व्योमात विहरणे कधी साधले
*
कित्येकदा देहात सळसळले ऋतू
नजरेत भोगाची फुले नुसतीच नव्हती
*
उभे आयुष्य आकाशात रमणा-यांतला तू
नभाचा रंग पंखाला न लागावा नवल हे
वर्तमान उर्दू गजलप्रमाणे मराठी गजलही गीतांपेक्षा कवितेच्या अंगाने जात आहे ती अशी. आता शब्दांतील लयलालित्यापेक्षा आशयघनतेला प्राधान्य दिल्या जात आहे. अशात यातील काही गजलात या दोन्हीचा समन्वय साधलेला आहे -
पात्र दु:खाच्या नदीचे लोचने माझी
वल्हवी स्वप्ने तरीही स्पंदने माझी
*
रात्र होता आस बांधत स्वप्नतारा चमकतो ना
गंधवाही कल्पनांचा सोनचाफा उमलतो ना
*
आपापल्या परीने चालू प्रयास राहो
श्वासात जीवनाचा निर्मळ सुवास राहो
इश्किया रंगाचेही शेर या ग़ज़लांत अनेक आढळतात. त्यात सकारात्मक व नकारात्मक अश्या दोन्ही छटा आहेत . खरं तर हे दोन भाव रुसलेल्या प्रेयसीप्रमाणे एकमेकांच्या पाठमोरे असतात. त्यामुळेच गजलेत नशीब, आस, उदासी, प्रतिक्षा, या मन: स्थिती आलटून पालटून येत राहतात.
जमू लागले आपले एवढ्यातच
तुला पाहतो मी मला पाहण्यातच
*
सये एवढा जीव लावू नकोस
दुरापास्त होईल जाणे निघून
*
तुझी आठवण येतायेता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते
समाधानाची गोष्ट म्हणजे, नैराश्याच्या अंधुकतेत आशादायी उज्वलतेचे शेरही साकारले आहेत -
क्लेष अंधारात ठेवू
दिस समाधानास नेवू
*
खणून आस पुढे पाहता निरास मिळे
'समीर'एक दिवा हालतो अजून तिथे
*
लागणार तळ आज ना उद्या
हात पाय मारत राहू या
'अधिक आयुष्य सुंदर होत आहे' असे कवीला जेव्हा जाणवते तेव्हाच हे असे शेर शब्दरूप होतात. या रचनांना दार्शनिक स्पर्शही असल्याचे दिसून येते. ती बरीचशी मिथ्यात्व व चिद्विलासाचा रंग लेऊन आली आहे-
तळ पाहिला ख-याचा कोणी तरी खरोखर
केव्हा तरी दिसावा ही एक आस आहे
*
तमा नाही, सुखाचे ऊन नाही तर
व्यथातुर मेघ तृष्णेचा चला आहे
*
ह्या दुनियेच्या आत वेगळी दुनिया वसते
बघता येते कुठे, फार तर कळत राहते
*
नजरेनजरेला दिसते वेगळेच बहुधा
जे दिसते ते असते, जे ना तेही असते
समीरची काही शब्दशिल्पे पहा -'संभावनांची जंगले', शून्यातली आवर्तने', 'तुक्याचे भूत',' देह बीज इच्छेचे', 'वलयात वलये', 'मुंग्यासमान दुनिया'. या गजलकाराने 'आयुष्याची बंद दारे सताड उघडून पाहिली ' आहेच, शिवाय त्यातील पंचमहाभूतांना सखोल वाचलंही आहे. त्यामुळेच यातील 'विचारांस पोक्तपणा' लाभला आहे. ज्या देशात साहित्यकार कलाकार यांच्या सर्जनातुन अशी उद्विग्नता, नैराश्य, विवशता साकारते, तेव्हा समजावं की विद्रोहाचं द्वार किलकिलं झालंय. कोणत्याही क्षणी ते सताड उघडू शकतं- पण समीरच्या या उदास माहोलच्या रचना वाचून त्याच्याच शब्दात सांगायचं तर -
अजूनही का गतकाळाचे मेघ दाटती
वाटतेय मनमोर पुन्हा नाचेल कदाचित

-डाॅ. राम पंङित 'पद्मानन्दन'
4,Atlanta, Sector40, Seawood ,Nerul -W,
Navi Mumbai 400706

गझलसंग्रह - काळाची सामंती निगरण
गझलकार - समीर चव्हाण


No comments:

Post a Comment