गिरीश श्याम जोशी : तीन गझला


१.
सांजवेळी सुगंधी कहर पाहिजे
मोग-याची जगाला कदर पाहिजे

आज रस्त्यात उद्यान फुलवेन मी
साजणी यायची बस खबर पाहिजे

फार घाईत सौंंदर्य पाहू नका
पाहताना जगाचा विसर पाहीजे

डाव मृत्यू तुझा फोल ठरवेन मी
फक्त तेव्हा तिथे ती हजर पाहिजे

प्रेयसीच्या नकारास पचवायला
जीवघेणे हलाहल जहर पाहिजे

वृत्तपत्रामध्ये लोक घेतील रस
'प्रेम' ह्या शिर्षकाचे सदर पाहिजे

मी कुणाला मनाची व्यथा ऐकवू?
मोकळे व्हायला एक घर पाहिजे

रूक्ष दगडासही लाभते देवपण
एवढा प्रार्थनेचा असर पाहिजे

ह्या स्मशानासही स्वर्ग बनवेन मी
बाजूला प्रेयसीची कबर पाहिजे

२.
कस्पटांच्या सोबतीने वाढला गेलो..
वाढ झाल्यावर विळ्याने कापला गेलो..

मी न माझा राहिलो गझले तुझा झालो..
तू जिथे नेशील तिकडे खेचला गेलो..

मी जरी गंधाळलेले फूल चाफ्याचे..
कंटकांच्या सोबतीने माळला गेलो..

टाळले नाही मला दुसऱ्या कुणी किंतू..
आपल्या लोकांकडूनच टाळला गेलो..

तू मला केलेस गझले केवढे सक्षम..
जाळला गेलो कधी ना गाडला गेलो..

ठेवला दारी तिच्या प्रस्ताव प्रेमाचा..
फाडला गेलो कधी फेटाळला गेलो..

बंधुता,समता कुठे दिसली मला येथे?
दंगलींना पाहता रक्ताळला गेलो..

नागडे दुःखास गझलेतून केल्यावर
वाहवा झाली..किती ओवाळला गेलो

३.
मोजू नये कुणीही विस्तार पावसाचा..
बघताक्षणी बदलतो आकार पावसाचा,

रिमझिम कधी बरसतो वा मुसळधार पडतो,
असतो किती निराळा अवतार पावसाचा..

नटला किती उन्हाळा,सजला किती हिवाळा,
जमला कुठे तयांना शृंगार पावसाचा..

तू लावशील जेव्हा येथे चिकार झाडे,
तेव्हा मिळेल मोठा आधार पावसाचा..

तू अडवशील पाणी अन भिजवशील राने,
तेव्हा घडेल मित्रा सत्कार पावसाचा...

बेचैन ह्या मनाची मैफल फुलून येते,
कानी हळूच येता मल्हार पावसाचा..

मृगही निघून गेले,आर्द्रा सरून गेले,
आला अजून कोठे होकार पावसाचा?

भिजण्यास सांजवेळी आली सखी अचानक
बहुतेक आज ठेका चुकणार पावसाचा..

पिकल्यात आत्महत्या  पाऊस आटल्याने,
करतो म्हणून आम्ही धिक्कार पावसाचा..

.............................................

गिरीश शाम जोशी
सिम्फनी A-9 देवळाई रोड औरंगाबाद
९२२६७५०६२१

No comments:

Post a Comment