संदीप पाटील : दोन गझला


१.
नको येऊस आता तू जवळ चल जा
पुन्हा उठणार बघ छातीत कळ चल जा

जसा आहे तसा स्वीकार कर माझा
नवी टाकू नको कुठलीच गळ चल जा

तुझा रस्ता पुढे वळणार वळणावर
दिसत नसला तरी आहे सरळ चल जा

तुझ्या प्रेमात मी पडणार नाही पण
तुझी पडते मला आहे भुरळ चल जा

तुझ्या आहेत जखमा खोलवर मुरल्या
नवा शोधू नको कुठलाच तळ चल जा

मरु भूमीत आहे जन्मलो मीही
कुठे काटयात फुलतो का कमळ चल जा

मला आकाशगंगेचा नको समजू
जशी उल्का निखळते तू वगळ चल जा

कधीचा थांबला अंधार जागेवर
दिव्याची वात हो अवघे उजळ चल जा

२.
ही तुझी वाटचाल कायमची
सोबतीला मशाल कायमची

रंग नाही तुझा दुजा कुठला
लावते तू गुलाल कायमची

तू कधी ओठ स्पर्श करते का?
मागते फक्त गाल कायमची

रोज मी ऐकतो तुझी कामे
तू समजते हमाल कायमची

रोज घेते तशी परीक्षा पण
देेत नाही निकाल कायमची

शोधला  कृष्ण तू मनापासुन
हरवली तूच काल कायमची

हसवते खूप अन रडवते पण
तू विसरते रुमाल कायमची

.............................................
संदीप पाटील

No comments:

Post a Comment