१.
जग बोलते वेड्याप्रमाणे फार वागत राहिले
आली सुखे दारात अन मी दार लावत राहिले!
आली सुखे दारात अन मी दार लावत राहिले!
होतास माझ्या आत तू रक्तात भिनल्यासारखा
मी वेंधळी दाहीदिशांना रोज शोधत राहिले!
मी वेंधळी दाहीदिशांना रोज शोधत राहिले!
तू सात जन्माची मला देणार होता साथ अन
नाहीस आता तू, तुझे हे भास सोबत राहिले!
नाहीस आता तू, तुझे हे भास सोबत राहिले!
आषाढ ओला अंगणी होता उभा माझ्या जरी
मी कोरड्या मेघाकडे पाऊस मागत राहिले!
मी कोरड्या मेघाकडे पाऊस मागत राहिले!
रस्त्यावरूनी त्या तुझ्या आले कधीही ना पुन्हा
तू घातल्या नियमास आवर्जून पाळत राहिले!
तू घातल्या नियमास आवर्जून पाळत राहिले!
२.
वाटते दोघात जर तुलना करावी कर तुला!
मात्र नाही यायची त्याच्या नखाची सर तुला!
मात्र नाही यायची त्याच्या नखाची सर तुला!
जन्मभर वेड्यापरी मी घातल्या हाका तुला
पण कधी फुटलाच नाही शेवटी पाझर तुला!
पण कधी फुटलाच नाही शेवटी पाझर तुला!
एकदा आलो जवळ मिटवून सारी अंतरे
मग पुढे जमलेच नाही द्यायला अंतर तुला!
मग पुढे जमलेच नाही द्यायला अंतर तुला!
पिंजरा तोडून आता..झेप घे तू पाखरा
घालते आहे कधीची साद हे अंबर तुला!
घालते आहे कधीची साद हे अंबर तुला!
जप तुझा, पूजा तुझी चाले मनाच्या मंदिरी
मानते मी देव माझा..मानते ईश्वर तुला!
मानते मी देव माझा..मानते ईश्वर तुला!
जाणते करशील माझी चूक देवा माफ तू
बोलते आहे जरी रागात मी पत्थर तुला!
बोलते आहे जरी रागात मी पत्थर तुला!
थांबना गोळा करू दे एवढ्या काचा मला
काय झाले आरशाचे सांगते नंतर तुला!
काय झाले आरशाचे सांगते नंतर तुला!
३.
ओठावरती जरी अबोला डोळ्यामध्ये आग किती
नाही नाही म्हणता त्याला येतो माझा राग किती!
नाही नाही म्हणता त्याला येतो माझा राग किती!
जसे पाहिले तुला एकदा दारामध्ये उभे तुझ्या
नको विचारू मला तशी तू झोप किती अन जाग किती?
नको विचारू मला तशी तू झोप किती अन जाग किती?
सोडुन आले सारे काही हाकेवर एकाच तुझ्या
कळले आहे किती तुला मी,कळला माझा त्याग किती?
कळले आहे किती तुला मी,कळला माझा त्याग किती?
ओली होती जोवर माती बहरुन आली होती ती
ओल संपली मायेची अन सुकून गेली बाग किती!
ओल संपली मायेची अन सुकून गेली बाग किती!
काही केल्या जाईना तो प्राण आणले कंठाशी
खरे सांगना तुझा राग हा मग प्रेमाचा भाग किती?
खरे सांगना तुझा राग हा मग प्रेमाचा भाग किती?
दिसते आहे इथे कुणाला उजळुन येणे चंद्राचे
जो येतो तो बघतो आहे त्याच्यावरती डाग किती?
जो येतो तो बघतो आहे त्याच्यावरती डाग किती?
४.
आज प्रेमात दे आज लाडात दे
दे,पुन्हा एकदा हात हातात दे!
दे,पुन्हा एकदा हात हातात दे!
तेच ते दुःख मी सांग मिरवू किती
जीवना तू नवा एक आघात दे!
जीवना तू नवा एक आघात दे!
लाभले दुःख उंची मला केवढे
सूख सुध्दा अता एक लाखात दे!
सूख सुध्दा अता एक लाखात दे!
ना उपाशी निजावे कुणीही इथे
फार काही नको घास ताटात दे!
फार काही नको घास ताटात दे!
ना पडावा कधी विसर देवा तुझा
ओढ इतकी तुझी आज श्वासात दे!
ओढ इतकी तुझी आज श्वासात दे!
५.
सकाळ सरते दुपार सरते दाटत जाते कातरवेळी
तुझी आठवण तुझ्यासारखी जाळत जाते कातरवेळी
तुझी आठवण तुझ्यासारखी जाळत जाते कातरवेळी
प्रकाश देतो जो दुनियेला भेदभाव ना ठावे त्याला
त्या सुर्याची माया सुध्दा आटत जाते कातरवेळी
त्या सुर्याची माया सुध्दा आटत जाते कातरवेळी
वाट पाहुनी थके पापण्या आशा विरते तू येण्याची
हळूहळू मग काळिज माझे फाटत जाते कातरवेळी
हळूहळू मग काळिज माझे फाटत जाते कातरवेळी
धागा धागा जोडत गेले नात्यांची मी वीण गुंफली
पुन्हा पुन्हा त्या गुंत्यामध्ये गुंतत जाते कातरवेळी
पुन्हा पुन्हा त्या गुंत्यामध्ये गुंतत जाते कातरवेळी
आठवणींची गर्दी होते कातर कातर जीव भासतो
सुने सुनेही किती मनाला वाटत जाते कातरवेळी
सुने सुनेही किती मनाला वाटत जाते कातरवेळी
............................................
अनिता बोडके
नाशिक
नाशिक
अनिताजी खूपच छान अन् बोलक्या गझला. तसे पाहिले तर मला तुमच्या गझल खूप आवडतात. मी चूकून कुठेतरी वाचल्या होत्या. तेंव्हा पासून आजतागायत तुमच्या गझलांची वाट पहात असतो. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
ReplyDeleteथांबना गोळा करू दे एवढ्या काचा मला
ReplyDeleteकाय झाले आरशाचे सांगते नंतर तुला!...वाह काय शेर आहे! सुंदर!