हेमंत राजाराम : पाच गझला

Image may contain: Hemant Rajaram
१.
धुमसणा-या लाकडातुन धूर येऊ लागतो
फुंकल्यावर, बासरीतुन सूर येऊ लागतो

पोट भरल्यावर जगाशी भांडतो कवितेतुनी
दु:खितांचा कळवळा भरपूर येऊ लागतो

कोरडे आभाळ जेव्हा वावराला हासते
पापण्याआडून तेव्हा पूर येऊ लागतो 

धावतो शहरात, थकतो, जागतो रात्री तुझ्या         
आठवांचा अश्व मग चौखूर येऊ लागतो

भेटणे सोडा, तिच्या तर आठवानेही कसा
चेह-यावरती अचानक नूर येऊ लागतो

२.
मी म्हटले होते तसेच घडले बरं का !
त्यानंतर माझे म्हणणे पटले बरं का!

मातीवर माया केली घाम निथळला
त्यामुळेच माझें कपडे मळले बरं का !

संपन्न सुखी मातीत रोपटे सुकले...
ते... उजाड माळावरचे जगले बरं का!

ग्रहयोगच नव्हता कुंडलीत माझ्या पण
स्वप्नात तरीही इमले रचले बरं का !

तू खूप मनावर घेतलेस की मित्रा...
बोलले तुझ्याशी नुसते हसले बरं का !

ही वणवण, चणचण,धडपड, तडफड, चडफड
हेमंत स्वतःला खूप रमवले बरं का!

३.
प्रश्नांना टाळू नकोस म्हणजे झाले !
डोक्यावर चढवू नकोस म्हणजे झाले !

मी मोठा होइन याची कशास चिंता
तू छोटा होऊ नकोस म्हणजे झाले !

फुकटात बियाणे मिळेलही पेराया
पण अफवा पिकवू नकोस म्हणजे झाले !

माहितीच आहे कुवत तुझ्या अकलेची
तू तारे तोडू नकोस म्हणजे झाले !

पटणारच नाही तुला तरी सांगू का?
कोणाला सांगू नकोस म्हणजे झाले !

४.
कोण जाणे मी स्वतःला कोण समजत राहिलो
मी जसा नव्हतो तसा दुनियेस वाटत राहिलो

भरवसा येत्या क्षणाचा वाटला होता कुठे
पण क्षणावर त्या पुन्हा विश्वास ठेवत राहिलो

उंच जाण्याची सजा ही छाटला गेलो; तरी-
खोल गेलो मग तळाशी ओल शोधत राहिलो

जन्मले मी जन्मता मरणारही माझ्यासवे
आत माझ्या या जगाला मीच जगवत राहिलो

अक्षरांचा होत जावा शब्द सुंदर शेवटी
जन्मभर येथे स्वतःला फक्त गिरवत राहिलो

५.
बांधावरी मनाच्या निजलेय शेत हे
स्वप्ने नव्या सुगीची बघतेय शेत हे

दुखणे जुनेच त्याचे ऐका तरी जरा 
रानातुनी मनाच्या कण्हतेय शेत हे

नाही हमी कशाची पिकवायचे तरी
दुखवीत अंग सारे खपतेय शेत हे

आता पुन्हा कधीही नाही पिकायचे
मागे इमारतींच्या लपलेय शेत हे

दुष्काळ काळ मोठा आहे तरी उभी
म्हणुणीच बाभळीला जपतेय शेत हे

शहरातल्या सुखाने केल्या मशागती
वाटे नकोच शेती शिकतेय शेत हे

शेतातुनी मनाच्या पिकती कळा अता
सांगू किती मनाचे दुःखतेय शेत हे
.............................................
हेमंत राजाराम
३, अश्विनी निवास, ३ रा मजला,

महात्मा फुले मार्ग, डोंबिवली (पश्चिम)
जिल्हा- ठाणे- ४२१२०२
संपर्क: ८१६९७१९३८९ / ८४५४८६३६५४

No comments:

Post a Comment