शाहिरांची अथांग विहीर : पुरुषोत्तम बोरकर

 Image may contain: 2 people


‘कलन्दरी है कि रखता है दिल गनी अंजुम
कोई दुकां, न कोई कारखाना रखता है’

अशा ओळी सर्वार्थाने जगणारे, कलंदरीलाच हृदयाची श्रीमंती मानणारे माझे मित्र म्हणजे शाहीर सुरेशकुमार वैराळकर । पुण्यातील रंगत - संगत प्रतिष्ठानतर्फे यंदाचा शायर भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आमच्या पस्तीस वर्षाच्या मैत्रीतील काही आठवणीचा हा शब्दगुच्छ।.

‘ना ताब हिज्र मे है, ना आराम वस्ल मे
कम्बख्त दिल को चैन नही है किसी तरह’

या ओळींमधील अस्वस्थता फार कमी लोकांमध्ये आढळते. फार कमी लोकांना अशी अस्वस्थता छळत असते. या अस्वस्थतेमागे एक सृजनशील आवेग सदैव उचंबळत असतो. ही सृजनशीलता सदैव काहीतरी नवे करायला सांगत असते. उद्युक्त करत असते.

तर अशा सदैव अस्वस्थ उर्फ सृजनशील राहणार्‍या माझ्या मोजक्याच काही मित्रांमध्ये शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे नाव अग्रेसर आहे। ...

शाहिरांचे मूळ गाव पाणेरी हे  जिल्ह्यातील एक लहानसे खेडे आहे. या गावातून झेप घेऊन सुरेशकुमार शब्दाची शेती करण्यासाठी व्यवहाराच्या दुनियादारीत उतरला आणि पुढे केव्हातरी मला भेटून माझा मित्र बनला.

ही भेट साधारण १९७९ च्या सुमारास अकोल्याला झाली होती. या काळात मी ‘शिवशक्ति’ मधून भरभरून  लिहित होतो. त्या  कारणे कथा-कवितांचा पाऊसच  होता. नवोदित उत्साह नायगार्‍याच्या धबधब्याप्रमाणे उसळत, कोसळत होता. साहित्यसंमेलने, कविसंमेलने यात सहभागी होण्यात धन्यता वाटत होती. मी यावेळी ‘सहकार जग’ मासिकाचे सह संपादन करायचो. तर अशा मंतरलेल्या काळात तमासगिरांच्या संघटनेसाठी अध्यक्ष श्री मधुकर नेराळे आणि सचिव साहीर सुरेशकुमार वैराळकर हे अकोल्यात आले. विदर्भातील तमासगिरांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने अकोल्यात मेळावा घेण्यात आला त्यावेळी कविकुळातील असल्यामुळे आमचे मैत्र जुळले आणि आजच्या तारखेपर्यंत ते परस्परांना कलात्मकरीत्या समृद्ध करत प्रवाहितच होत राहिलेले आहे.

पुढे मी निखळ कवितेला वाहिलेले एक साप्ताहिक सुरू केले. ‘ शोधयात्रा’ हे या साप्ताहिकाचे नाव गाव शाहिरांच्या अनेक कवितांना मी भरभरून प्रसिद्धी दिली. पुढे जगण्याच्या धावपळीत त्याचे हे लेखन कमी झाले. कारण शाहिरांची नोकरी पी. ए. म्हणून मंत्री जाधवराव, खासदार स्व. तुपे, आमदार कमलताई ढोले-पाटील अन आता आमदार श्री बाबर यांच्या सेवेत अडीच तपांचा काळ निघून गेला. पण याला समांतर कविकुळातील अनेक उपक्रम घडतच राहिले. स्वत:ची कविता बाजुला ठेवून महाकवी सुरेश भट यांच्या कार्यक्रमांचे संचालन शाहिरांनी आरंभिले समग्र सुरेश भट मुखोद्गत असल्यामुळे त्यांचे संचालनकार्य हे अखेरपर्यंत बहरदार होत राहिले.

महाकवी सुरेश भटांसोबतचे दिर्घकालीन सख्य हे शाहिरांच्या आयुष्यातील एक ‘सोनेरी पान’ आहे. या त्यांच्या मैत्रीचा गाभा म्हणजे उभयतांचा कलंदरी स्वभावच होय. यात शंकाच नाही. या मैत्रीबद्दलची कृतज्ञता म्हणून पुण्यात त्याने ‘सुरेश भट गझलसंच’ स्थापन कलंदरपणाची नाळ तुटू दिलेली नाहीय.

आभाळाएवढे मन, अवघ्या जगाबद्दल प्रचंड प्रेम, सामाजिक बांधिलकीची तीव्र ओढ, कोणत्याही नव्या उपक्रमात उडी मारायची सदैव तयारी आणि अन्यायाविरूद्ध लढण्याची वृत्ती : ही सुरेशकुमारांची जीवन वैशिष्ट्ये आहेत. त्याचे घर नेहमी मित्र आणि कार्यकर्त्यांनी गजबजलेले असते. कारण हा शाहीर माणूसघाणा नसून माणुसकीबाणा जपणारा कलंदर वृत्तीचा पण प्रापंचिक प्रकृतीचा गृहस्थ आहे. एक कलावंत म्हणून त्याने समाजाला दिलेले योगदान आभाळाएवढे आहे. कारण संपूर्ण आयुष्याची किंमत मोजूनच असे महत्कार्य माणसाच्या हातून घडत असते.

त्यांच्यातला अस्सल कलावंत पावलोपावली भेटत राहिला.

‘शायद किसी राही को साये की जरूरत हो, 
इस वास्ते ऐ यारो हम धूप में चलते है’ 

या ओळी कवीने शाहिरांसारख्या खर्‍याखुर्‍या कलंदराला पाहूनच लिहिलेल्या असाव्यात असे वाटते. मूलत: सेवेची तीव्र ओढ आणि परदु:खाबद्दल वाटणारे ममत्वच माणसाला माणूस बनवत असते.

'एक होता विदुषक’ या चित्रपटातील त्याची भूमिका म्हणजे आम्हासाठी अभिमानाचा विषय झाला होता. तसेच शाहिराचे शुद्ध मराठी ऐकणे हाही अभिमानाचा विषय आहेच. मराठी बोलताना एकाही इंग्रजी शब्दाची भेसळ येथे होत नाही,हे विशेष!

शाहिरांचे आणखी एक स्वभाववैशिष्ट्य ! आमदार-खासदार-मंत्र्यांच्या वर्तुळात आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये समरसून वावरत असल्यामुळे त्यांच्या प्रचंड ओळखी झालेल्या आहेत. सहसा लोक अशा ओळखीचा उपयोग दुसर्‍यांना होऊ देत नाहीत. पण शाहिरांचे वागणे याउलट आहे. कुण्याही वी. आय. पी. चा फोन नंबर ते मागितल्याबरोबर पुरवितात. शक्य असेल तर स्वत:च मध्यस्थ राहून मित्रांची अडचण सोडवतात. असा अर्ध्या रात्री धावून जाणारा मित्र दुर्मिळच !

स्वत:च्या लिखाणाकडे दुर्लक्ष करून शाहिरांनी अनेक नवोदित गझलकारांना, साहित्यिकांना समोर आणले. त्यांना वाड्मयीन दृष्टी दिली. हा त्यांचा त्याग फार मोठा आहे. असे मला वाटते. कारण ते लिहिले राहिले असते. तर त्यांचीही ग्रंथसंपदा भरपूर झाली असती. टॉप टेन लेखकांमध्ये त्यांचाही समावेश झाला असता. अनेक पुरस्कार आणि साहित्यिक प्रतिष्ठा मिळाली असती. आपल्यातील लेखकाला बाजूला ठेवून त्यांनी अनेकांना जागा करून दिली. व्यावहारिकदृष्ट्या हा वेडेपणाच होता. पण शाहिरांनी तो केला आणि आपली कलंदरी मुद्रा काळावर कोरली.

‘जबतक मै कुवे में था, तो मेंढक था 
अब मै से बाहर आया तो पंछी बना
तब से मेरी उडान जारी है
और मै उडताही जा रहा हू’

अशी विशाल जीवनदृष्टी त्यांच्यामुळेच अनेकांना मिळाली.

शाहिरांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय ओपन हार्टेड आहेत. राजकारणी लोकांमध्ये इतकी वर्षे राहूनही त्यांना भ्रष्टाचाराचे वावडे आहे.

‘एकेक युद्ध माझे मी हारलो तरीही,
 मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी’

हा शेर म्हणजे त्यांचे स्फुर्तिस्थान आहे. त्यांच्या मनगटात झगडण्याचे बळ निर्माण होते ते संघर्षामुळेच. त्यांच्या पावलात बळ साठत होते ते काटे रूतल्यामुळेच. त्यांना मार्ग सुचत होता. तो खड्डयात पडल्यामुळेच ।

‘उससे किसीने नही कहां था,
'तुम पेड हो जाओ ',
वो पेड जो बना है, अपने मर्जीसे है,
और गैरोको यही बात खटकती है ।...’

सार्वजनिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीला आणखी दोन गुणांची आवश्यकता असते. शुभ्रधवल चारित्र्य आणि आर्थिक पारदर्शकता !...

‘लिबास भीग न जाये, बदन गिला न हो,
ये शर्त है और समंदर के पार जाना है’

या कवितेच्या ओळीप्रमाणे जगण्याचा हा भवसागर अत्यंत संयम ठेवून पार करावा लागतो. शाहिरांनी याच पद्धतीने हा समंदर पार करून आपली आतापर्यंतची वाटचाल निष्कलंकपणे केलेली आहे.

शाहिरांच्या या फकिरी, सेवाभावी प्रवासाला सौ. प्रभा वहिनींची घरातुनही साथसंगत आहे. सहकार्य आहे. त्यामुळे गृहखात्याबद्दलची कृतज्ञताही मी व्यक्त करतो. परिणामी शाहिरांची अथांग विहीर सर्वच तहानलेल्यांना तृप्त करत असून तिला भविष्यात बोअर करावे लागणार नाही याची मला खात्री आहे.

मला सख्खा भाऊ नाही. मात्र असलाच तर तो शाहिरांसारखाच असावा. नव्हे शाहीर सुरेशकुमार वैराळकर असावा असे अंत:करणातून वाटते.

आमच्या 30 वर्षाच्या मैत्रीचा हा मी काढलेला निष्कर्ष :

आज घडीला शाहीर म्हणजे स्वत:च एक सांस्कृतिक संस्था झालेले आहेत. एकसष्टी पार केलेली आहे. यानिमित्ताने त्यांनी भोगलेला संघर्ष  पुस्तकरूपाने नव्या पिढीसमोर आला तर महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्याचे मूल्य अपरंपार राहील. असे वाटते. एवढे करावेच अशा शुभेच्छांसह ...
_________________________________________________________
□ पुरुषोत्तम बोरकर / दि.२१ डिसे.२०१३

No comments:

Post a Comment